‘उत्पत्ती’ या बायबलमधील पहिल्या पुस्तकात सृष्टीच्या उत्पत्तीचे वर्णन आलेले आहे. ईश्वराने प्रथम मातीचा एक मनुष्य घडवून त्याच्या कुडीत प्राण ओतला (उत्पत्ती २.७). ह्या आद्य पुरुषाचे नाव ‘आदाम’ होय. हिब्रू भाषेत ‘आदाम’ म्हणजे ‘पुरुष.’ आदामची सहचारिणी एवा हिच्या निर्मितीबाबत बायबलमध्ये दोन वृत्तांत आहेत : (१) आदाम व एवा ह्या दोघांनाही ईश्वराने एकदमच निर्माण केले. (२) ईश्वराने आदामला गाढ निद्रा लावून, त्याची एक फासळी काढून घेतली आणि तिच्यापासून जी स्त्री बनविली, ती एवा होय. त्यांचा ‘आदम’ व ‘ईव्ह’ असाही उच्चार केला जातो.
काही भाष्यकारांच्या मते विवाहसंस्थेचे मूळ या वृत्तांतात सापडते. हिब्रू भाषेतील ‘हव्वा’ या शब्दापासून ‘एवा’ हा शब्द आला. आजच्या इराकमधील युफ्रेटिस व टायग्रिस या नद्यांच्या दुआबातील ईडनबागेत आदाम व एवा राहात होते. तेथील ज्ञानवृक्षाचे फळ त्यांनी खाऊ नये, अशी देवाने त्यांना आज्ञा केली होती; पण सर्परूपी सैतानाने भुरळ घातल्यामुळे एवाने तो ईश्वरी आदेश मोडून पाप-पुण्याचे ज्ञान देणाऱ्या तेथील वृक्षाचे अर्धे फळ प्रथम खाल्ले व अर्धे आदामला दिले. अशा प्रकारे ईश्वरी आदेशाचा भंग केल्यामुळे मनुष्याच्या पापमय जीवनास आरंभ झाला.
संदर्भ :
- Glazier, Michael; Hellwig, Monika, Eds. The Modern Catholic Encyclopedia, Ireland, 1994.
- Thomas, P. C. A Compact History of The Popes, Bombay, 1992.