भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई.

पार्श्वभूमी : २० ऑक्टोबर १९६२ रोजी तवांग विभागातील नामकाचू नदी ओलांडून चिनी सैन्याचे आक्रमण लोहित आणि लडाख विभागांतही पसरले. २४ ऑक्टोबरपर्यंत त्यांनी तवांग तसेच वलाँगपर्यंत कूच करून लडाखमध्ये १९५९च्या ताबारेषेपर्यंतची बहुतांश भारतीय ठाणी काबीज केली होती आणि त्यानंतर सुमारे तीन आठवड्यांचा एक सामरिक विश्राम (strategic pause) घेतला होता. यामागे काही लष्करी कारणेही होती. पुढील चढाई हाती घेण्याआधी सीमेपासून तवांगपर्यंत सुमारे १६ किमी. लांबीच्या पायवाटेचे मोटारगाड्यांना वापरण्याजोग्या रस्त्यात रूपांतर करणे आवश्यक होते. रस्त्याशिवाय त्यांची अन्नपदार्थ आणि दारूगोळ्याची रसद, तसेच तोफखाना (artillery) ब्रिगेड पुढे येऊ शकत नव्हते. तीन-चार हजार मजुरांच्या साहाय्याने रस्ता बांधणीचे काम युद्धस्तरावर सुरू झाले. नामकाचू ते तवांग हा कामचलाऊ रस्ता १५ नोव्हेंबरपर्यंत तयार झाला.

भारतीय लष्कराची मोर्चेबंदी : ४ इन्फन्ट्री डिव्हिजनच्या सुमारे १२ हजार शिबंदीने सेला-धिरांग-बोमदिला या रस्त्यावर संरक्षणफळी उभी केली होती. त्यातील ६२ इन्फन्ट्री ब्रिगेडच्या पाच इन्फन्ट्री बटालियन, तोफखान्याची एक पलटण आणि इतर साहाय्यक तुकड्या सेला ते सेंगे यांदरम्यान तैनात होत्या. ६५ इन्फन्ट्री ब्रिगेडच्या दोन इन्फन्ट्री बटालियननी धिरांग-लिमाडाँग यांमध्ये मोर्चेबांधणी केली होती. बोमदिला-थेंबांग-पोशिंगला यांच्या संरक्षणाची जबाबदारी ४८ इन्फन्ट्री ब्रिगेडच्या तीन बटालियनवर सोपवण्यात आली होती. ४ इन्फन्ट्री डिव्हिजन मुख्यालय आणि त्यांची तोफखाना ब्रिगेड धिरांगमध्ये होती. तेथील शिबंदीची संख्या ५ हजाराच्या आसपास होती. त्यांच्या संरक्षणासाठी सेलामधील मोर्चाबंदीतून तीन कंपन्या आणण्यात आल्या होत्या. हे अयोग्य होते. त्यामुळे सेलाच्या संरक्षणक्षमतेत बाधा येणे स्वाभाविक होते. पिछाडीस तेजपूरजवळ असलेल्या मिसामारीमधील ६७ इन्फन्ट्री ब्रिगेडला ४ इन्फन्ट्री विभागाचे राखीव दल म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

चिनी संख्याबळ : पुढील आक्रमणासाठी ४१९ तिबेट विभागाच्या १६२, १६४ आणि १६५ इन्फन्ट्री पलटणी, ११ इन्फन्ट्री विभागाच्या ३२ आणि ३३ इन्फन्ट्री पलटणी, ५५ इन्फन्ट्री विभागाच्या १५४, १५५ आणि १५७ पलटणी, इतर दोन इन्फन्ट्री बटालियन, तीन तोफखाना, एक अभियांत्रिकी पलटण मिळून सुमारे २२ हजार सैनिकांची शिबंदी तयार ठेवली होती. भारताच्या तीन इन्फन्ट्री ब्रिगेडविरुद्ध लढण्यास नऊ चिनी इन्फन्ट्री ब्रिगेड तयार होत्या. संकेतानुसार चिन्यांची ही संख्या वाजवी प्रमाणातच होती.

हल्ल्याची योजना : तवांग-बोमदिला या अक्षावरील (अॅक्सिस) सेला आणि बोमदिला या भारतीय सैन्याच्या दोन प्रमुख बालेकिल्ल्यांपर्यंत पोहोचण्याच्या वेगवेगळ्या मार्गांकरवी एकाच वेळी चाल करून त्यांना वेढा घालणे आणि त्यांचा एकमेकांशी संपर्क तोडणे हा चिन्यांच्या रणनीतीचा गाभा होता. (नकाशा पहा). अशा प्रकारे या मोर्चेबंदीमधील वेगवेगळ्या ठाण्यांना एकटे पाडून मग त्यांच्यावर पद्धतशीर हल्ले चढवले तर ती टिकू शकणार नाहीत, याबद्दल त्यांना शाश्वती होती. यानुसार चिन्यांनी तवांग-जंग-सेला या मुख्य रस्त्याबरोबरीने तवांग-त्सेला-पोशिंगला-थेंबांग या पायवाटेचा, त्याचप्रमाणे तवांगहून रस्याच्या पश्चिमेकडून तडक धिरांगला जाणाऱ्या पायवाटेचा वापर करण्याचे ठरवले होते. तसेच धिरांग आणि बोमदिलाहून दक्षिणेकडे जाणाऱ्या पायवाटांवरही आपले दस्ते पाठवण्याचे त्यांनी योजले होते. प्रत्यक्षात ही रणनीती अत्यंत परिणामकारक ठरली.

या रणनीतीवर आधारलेल्या योजनेनुसार ५५ इन्फन्ट्री विभागाच्या तीन इन्फन्ट्री पलटणीसह तवांग-सेला या मुख्य रस्त्यामार्गे आगेकूच करून सेलावर चढाई करणार होती. त्याबरोबरच ४१९ तिबेटन विभागाच्या तीन पलटणी तवांग-सेला रस्ता आणि भारत- भूतान आंतरराष्ट्रीय सीमा यांच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेतून (गॅपमधून) तवांग, सेला आणि धिरांग येथे पोहोचून सेंगे आणि धिरांग यांवर दक्षिणेकडून हल्ला चढवणार होत्या. त्याच वेळी ११ इन्फन्ट्री विभागाच्या तीन पलटणी उत्तरेकडील ऱ्हो-त्सेला-थेंबांग या लांब आडवळणीमार्गे धिरांग आणि बोमदिला रस्त्यामधोमध अवतरून रोड ब्लॅाक घालणार होती. अशा प्रकारे चिनी हालचाली चालू झाल्यानंतर काही तासांतच सेला, सेंगे, धिरांग आणि बोमदिला या सर्वांची चहूबाजूंनी कोंडी होऊन त्यांच्यावर सर्व दिशांनी चिनी हल्ले होणार होते.

लढाई : या चढाईसाठी सर्व तुकड्यांची जुळवाजुळव आणि तयारी १० ते १५ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आली. १५ नोव्हेंबरला तिन्ही चिनी विभाग आपल्या नियोजित अक्षांवर मार्गस्थ झाल्या. ५५ विभाग तवांग-जंग-सेला रस्त्यामार्गे, ४१९ विभाग रस्त्याच्या पश्चिमेस ‘भूतान गॅप’ मधून धिरांगकडे आणि ११ विभाग ऱ्हो-त्सेला-थेंबांग या ‘बेली ट्रेल’मार्गे (१९१४ मध्ये मॅकमहोन रेषेची आखणी करायच्या वेळी कॅप्टन बेली याच मार्गे गेले होते म्हणून हे नाव पडले) सेंगे-धिरांग आणि बोमदिलाकडे आगेकूच करू लागल्या. या चालीकरवी चिन्यांना भारतीय ४ इन्फन्ट्री विभागाला तीन बेटांमध्ये बंदिस्त करण्यात यश आले. सेलावरील हल्ला ४१९ तिबेटियन विभागाच्या १५४ पलटणीने आणि ५५ विभागाच्या १६३ व १६५ पलटनींनी दोन बाजूंनी चढवला. त्यांना तोफखान्याचे मुबलक साहाय्य लाभले. हल्ले १८ नोव्हेंबरला सकाळी साडेआठला चालू झाले आणि त्याच दिवशी संध्याकाळी सहापर्यंत सेला संरक्षणफळीचा पाडाव झाला होता.

चिनी ११ इन्फन्ट्री विभागाची ‘बेली ट्रेल’मार्गे आगेकूच हा या लढाईतील सर्वांत सनसनाटी आणि घणाघाती डावपेच ठरला. ४ इन्फन्ट्री विभागाचे कमांडर मेजर जनरल पठाणिया यांनी जरी पोशिंगला-थेंबांगमार्गे काही चिनी दस्ते येण्याचा अंदाज केला होता, तरी चिन्यांची २-३ कंपन्यांपेक्षा अधिक शिबंदी या पायवाटमार्गे येऊ शकणार नाही, अशी त्यांना खात्री होती. त्यानुसार त्यांनी पोशिंगला आणि थेंबांग यांमध्ये काही प्लॅटून पाठवल्या होत्या; परंतु त्या तुकड्या पूर्णतया अपुऱ्या ठरल्या. चिनी ११ विभागाची चाल ही धिरांग आणि बोमदिला मोर्चाच्या विरुद्ध एक ‘धोबी पछाड’ ठरली आणि तिथली भारतीय मोर्चाबंदी अक्षरशः उलथून टाकली गेली. चिनी विभागाचा प्रत्येक जवान पाठीवर ३० किलोचे वजन घेऊन आपले हत्त्यार आणि दारूगोळ्यासह तब्बल सहा दिवस १६० किमी. पायी चालत होता. १० तारखेला निघून १५ नोव्हेंबरला पोशिंगला काबीज केली आणि १७ नोव्हेंबरला त्यांनी थेंबांगवर कब्जा केला. १७/१८ नोव्हेंबरच्या रात्री त्यांनी धिरांग-बोमडिला रस्त्यावरील एका पुलाचा ताबा घेतला. मग ४ इन्फन्ट्री विभागाचा दक्षिणेस जाण्याचा मार्ग पूर्णपणे खुंटला. या युद्धातील हा एक पाणलोट ठरला.

धिरांगच्या पूर्वेला पोहोचल्यावर ११ इन्फंट्री विभागाने तेथील भारतीय शिबंदीवर १८ नोव्हेंबरला सकाळी हल्ला चढवला. याच दिवशी सेलावरही चढाई होत होती. ३३ इन्फन्ट्री पलटणीने धिरांगवर पूर्व आणि आग्नेयेकडून हल्ला चढवला; तत्पूर्वी धिरांगमधील सर्व भारतीय तुकड्या तिथून निसटून गेल्या होत्या. त्यानंतर चिन्यांनी लागलीच बोमदिलावर हल्ल्याची तयारी केली. हल्ला चढवण्यापूर्वीच सर्व भारतीय तुकड्यांनी बोमदिलामधून गोंधळात घाईने माघार घेतली होती आणि १९ नोव्हेंबरच्या पहाटे चिन्यांनी बोमदिलाचाही ताबा घेतला. बोमदिलाच्या मदतीसाठी मिसामारीहून आलेल्या ३ जॅक लाइट इन्फन्ट्री बटालियनच्या एका तुकडीची चिन्यांशी चकमक झाली. जॅक  बटालियनचे जवान शर्थीने लढले. त्यानंतर चिनी ३३ इन्फन्ट्री पलटणीने कसोशीने पाठलाग सुरू ठेवला. चाकू मध्ये आधीच्या रात्री येऊन पोहोचलेल्या ६/८ जी. आर. बटालियनने त्यांना प्रतिकार केला; परंतु तो फार वेळ टिकू शकला नाही.

२० नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत भारताच्या ४ इन्फन्ट्री विभागाचे सैनिकी अस्तित्व संपुष्टात आले होते. २० नोव्हेंबर १९६२ ला चिनी जनरल मुख्यालयाने एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली आणि सर्व चिनी सैन्य ५ डिसेंबरपर्यंत मॅकमहोन रेषेपार परतले.

संदर्भ :

  • Kaul, B. M. The Untold Story, Bombay 1967.
  • Palit, D. K. War in High Himalaya : Indian Army Crisis, 1962, New Delhi, 1991.
  • Maxwell, Neville, India’s China War, Dehradun, 2013.
  • Sandhu, P. G. S. 1962 – The Battle of Sela-Bomdila : A View from other Side of The Hill, USI Journal, vols. 161, October – December 2011.
  • पित्रे, शशिकान्त, न सांगण्याजोगी गोष्ट : १९६२च्या पराभवाची शोकांतिका, पुणे, २०१५.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा