जसहरचरिउ: कवी पुष्पदंत (इ. स. चे दहावे शतक) ह्याने लिहिलेले अपभ्रंश भाषेतील लौकिक चरितकाव्य. त्याचे एकूण चार संधी किंवा विभाग आहेत. त्यात आलेली कथा अशी : यौधेय देशाच्या मारिदत्तनाम राजाला आकाशगमनसिद्धी प्राप्त करून घ्यावयाची असते. त्यासाठी भैरवानंद नावाच्या एका कापालिक आचार्याचा तो सल्ला घेतो. प्रत्येक प्राण्याची नर-मादी अशी एक एक जोडी देवी चंडामारीस बळी द्यावी, असे भैरवानंद राजाला सांगतो. मनुष्यप्राण्याची जोडी मिळविण्याच्या प्रयत्नात असलेले राजसेवक सुदत्तनामक जैन भिक्षूच्या शिष्यांपैकी अभयरुची आणि अभयमती ह्या भाऊबहिणींस धरून आणतात पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वांनी भारून जाऊन राजा मारिदत्त त्यांना त्यांची हकिगत विचारतो. त्यावर पूर्वजन्मी आपण उज्जैनचा राजा जसहर (यशोधर) होतो, असे अभयरुची सांगतो. अभयरुचीच्या ह्या पूर्वजन्माची म्हणजे राजा जसहराची कहाणी थोडक्यात पुढीलप्रमाणे : राजोपभोगांत मग्न असलेल्या राजाला एका रात्री आपली पत्नी अमृतमती ही दुर्वर्तनी असल्याचे समजते. परिणामतः तो विरक्त होऊन वनवासास जाऊ इच्छितो. आपल्या आईला– चंद्रमतीला–मात्र आपणास एक वाईट स्वप्न पडल्यामुळे आपण हे करीत आहोत, असे तो सांगतो. दुः स्वप्नाचा परिणाम नाहीसा व्हावा म्हणून देवीला पशू बळी देण्याची चंद्रमतीची इच्छा असते; परंतु जसहराचा विरोध लक्षात घेऊन कणकेच्या कोंबड्याचा बळी दिला जातो. जसहराची विरक्ती कायमच राहते. दीक्षा घेण्यापूर्वी झालेल्या निरोपाच्या मेजवानीची संधी साधून अमृतमती जसहराला व त्याच्या आईला विषप्रयोगाने ठार मारते. युवराज जसवई (यशःपती) गादीवर बसतो.

कणकेचा कोंबडा बळी दिल्याबद्दल राजा जसहर आणि त्याची आई ह्यांना अनुक्रमे मोर आणि कुत्रा मुंगूस आणि साप बकरा आणि बकरी कोंबडा आणि कोंबडी ह्यांसारखे जन्म मिळतात. अखेरीस ते राजा जसवई ह्याचे पुत्र-कन्या म्हणून जन्म घेतात. कालांतराने जसवई सुदत्तनामक जैन भिक्षूच्या प्रभावाने विरक्त होतो. ह्या भिक्षूकडूनच अभयरुची आणि अभयमती ही दोघे पूर्वजन्मीची कोण, हे त्याला समजते. अमृतमयी ही जसवईची आई पाचव्या नरकात असल्याचे भिक्षू सांगतो. त्यानंतर जसवई भिक्षू होतो. अभयरुची आणि अभयमती ही दोघे आपल्या पित्याच्या मार्गाने जाऊ इच्छितात पण वयाने लहान असल्यामुळे सुदत्ताच्या सल्ल्यानुसार क्षुल्लक श्रेणीतील शिष्य म्हणून सुदत्तापाशी राहतात.अखेरीस राजा मारिदत्त आणि भैरवानंद ह्यांनाही त्यांच्या पूर्वजन्मांची कहाणी समजते आणि ते जैन धर्माची दीक्षा घेतात. अहिंसेची महती पटविणारे हे लौकिक चरितकाव्य जैन साहित्यात फार लोकप्रिय आहे. त्याची भाषाशैली आणि रचना परिणतप्रज्ञ महाकवीला साजेशी आहे. डॉ. प. ल. वैद्य ह्यांनी ह्या चरितकाव्याचे संपादन केले आहे (१९३१).

संदर्भ :

  • https://jainqq.org/explore/001841/23