ठक्कुर फेरू : (इ. स. तेरावे-चौदावे शतक). मध्ययुगीन भारतातील एक प्रसिद्ध लेखक आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या (खल्जी) (कारकिर्द १२९६–१३१६) पदरी असलेला खजिना व टाकसाळ विभागाचा अधिकारी.  हरयाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील कलियाणा (फेरूच्या लेखनातील कन्नाणा किंवा कन्नाणपूर) हे त्याचे गाव होते. त्याचा जन्म श्वेतांबर जैन पंथातील ‘खरतरʼ या उपपंथाच्या एका अनुयायी कुटुंबात इ. स. १२७० च्या सुमारास झाला. त्याच्या वडिलांचे नाव ठक्कुर चंद्र. फेरूला हेमपाल नावाचा एक पुत्र असल्याचा उल्लेख आढळतो. जैन धार्मिक शिक्षणाखेरीज त्याने खगोलशास्त्र, गणित, ज्योतिष, स्थापत्य इ. अनेक शास्त्रीय विषयांचेही अध्ययन केले.

त्याने खरतरपंथाशी संबंधित खरतरगच्छयुगप्रधानचतुःपदिका (१२९१), खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावर ज्योतिषसार (१३१५), मूर्तिशास्त्र आणि स्थापत्यशास्त्रावर वास्तुसार (१३१५), आणि रत्नशास्त्रावर रत्नपरीक्षा (१३१५) हे ग्रंथ लिहिले. यांशिवाय धातू आणि सुगंधी द्रव्यांवर धातूत्पत्ती, गणितावर गणितसारकौमुदी आणि नाण्यांची परीक्षा आणि विनिमयदर यांवर आधारित द्रव्यपरीक्षा हे ग्रंथ लिहिले (१३१५-१८). यांतील द्रव्यपरीक्षा हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. कुतुबुद्दीन मुबारकशाह (कारकिर्द १३१६-१३२०) या अल्लाउद्दीन खिलजीच्या मुलाच्या पदरी फेरू दिल्लीच्या टांकसाळीत मोठ्या पदावर असल्याने यातील निरीक्षणांना प्रत्यक्षानुभवाची जोड आहे.

फेरूची ग्रंथरचना अपभ्रंश भाषेत आहे. संस्कृतातील शास्त्रीय ग्रंथरचनेपेक्षा तिची काही वैशिष्ट्ये आहेत. बहुतांश संस्कृत ग्रंथकार स्वत:चे मत मांडतानाही, आपण पूर्वाचार्यांच्या मतांचा सारांशच देतो आहोत, अशी भूमिका घेऊन स्वत:चे वेगळेपण अधोरेखित करत नसत. त्यात स्थलकालविषयक संदर्भही अभावानेच देत. फेरू मात्र याला फाटा देऊन स्थलकालवाचक माहितीखेरीज, स्वत:च्या प्रत्यक्षानुभवाचा दाखला अनेक ठिकाणी देतो. त्याने वापरलेली वजनेमापेही इ. स. १३-१४ व्या शतकात दिल्ली-हरयाणा भागात वापरात असलेली आहेत.

फेरूच्या धातूत्पत्ती या ग्रंथात पितळ, तांबे, शिसे इत्यादी धातू व मिश्रधातूंचे निष्कर्षण व शुद्धीकरणाबद्दल विवेचन आहे. त्या शिवाय कापूर, चंदन, केशर इत्यादी सुगंधी द्रव्ये, त्यांची उत्पत्तीस्थाने, शुद्धीकरण, विविध गुणधर्म, प्रकार आणि त्यांच्या किमतीही दिलेल्या आहेत. यावरून या वस्तूंच्या व्यापाराशी फेरू व त्याच्या कुटुंबाचा जवळून संबंध आला असावा, असे दिसते. रत्नशास्त्रावरील बुद्धभट्ट, बृहस्पती आणि इतरांच्या ग्रंथांवर आधारित त्याने रत्नपरीक्षा हा ग्रंथ लिहिला. त्यात तो अल्लाउद्दीन खिलजीच्या खजिन्यातील अफाट संपत्तीचे तज्ज्ञांनी केलेले विश्लेषण स्वत: पाहिल्याचे नमूद करतो. या ग्रंथाची एकूण रचना पारंपरिक ग्रंथांप्रमाणे असली, तरी विविध रत्नांच्या तत्कालीन किमतीही त्याने दिलेल्या आहेत. त्यात वाढत्या वजनाप्रमाणे भूमितीश्रेणीने वाढणाऱ्या किमती येतात.

गणितसारकौमुदी हा फेरूने रचलेला सर्वांत मोठा ग्रंथ असून, यात पाच अध्याय आणि ३११ श्लोक आहेत. अपभ्रंश भाषेतील हा पूर्णपणे गणिताला वाहिलेला पहिलाच ग्रंथ असून, यात विविध प्रकारच्या गणिती सूत्रांची माहिती दिलेली आहे. पहिल्या तीन अध्यायांत मूलभूत गणिती क्रिया, अपूर्णांक, श्रेढी, गुणोत्तर, द्विमितीय आणि त्रिमितीय भूमिती इत्यादी प्रकारांचे विवेचन येते. चौथ्या व पाचव्या अध्यायांत फेरूला जाणवलेली काही अनुभवसिद्ध तथ्ये व वेगाने आकडेमोड इ. करण्यासाठीच्या काही युक्त्या दिलेल्या आहेत. त्यात आर्थिक विषयांशी संबंधित अंकगणित, गणिती कोडी, विक्रम संवत ते हिजरी व उलट असे तारखांचे रूपांतरण, तसेच जादूच्या चौरसांची रचना व वर्गीकरण इत्यादी विषय येतात. त्रिमितीय भूमितीमध्ये घुमट, मिनार, कमानी, इत्यादींचे घनफळ काढण्याची सूत्रे आहेत. हा ग्रंथ लिहीत असतानाच दिल्लीतील कुव्वत-उल-इस्लाम या मशिदीचे आवार वाढविण्यासाठी घुमट आणि कमानींचा प्रथमच वापर करण्यात आला असल्याने हा संदर्भ रोचक आहे. अखेरीस विविध धान्ये व डाळींचे दर बिघा उत्पादनही दिलेले आहे. उसाच्या रसापासून मिळणारे अनेक पदार्थ व त्यांचे प्रमाण आणि दुधापासून मिळणाऱ्या तुपाचे प्रमाणाचेही तपशील यात येतात. इ. स. चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धातील दिल्ली-हरयाणा-राजस्थान प्रदेशासाठीची ही माहिती असून, त्या प्रदेशाचा तत्कालीन आर्थिक इतिहास अभ्यासण्याकरिता त्याचा हा ग्रंथ उपयुक्त आहे.

द्रव्यपरीक्षा हा फेरूचा प्रसिद्ध ग्रंथ. फेरूनेच सांगितल्याप्रमाणे, दिल्लीच्या टांकसाळीतील नाण्यांची शुद्धता पारखण्याच्या त्याच्या प्रत्यक्ष अनुभवावरून त्याने हा ग्रंथ त्याचा मुलगा आणि लहान भाऊ यांच्याकरिता लिहिला होता. या ग्रंथात एकूण १४९ श्लोक आहेत. पहिल्या विभागात ५० श्लोक असून, त्यात नाण्यांची शुद्धता पारखण्याच्या पद्धतींचे विवेचन येते. तत्कालीन समाजात वेगवेगळ्या राजवटींची नाणी प्रचलित असून, त्यांमधील विनिमयदर हा त्यांतील धातूच्या शुद्धतेवर आधारित होता. त्यामुळे नाण्यांची शुद्धता तपासण्याला मोठेच महत्त्व होते. कसोटीच्या दगडाखेरीज सोने वितळवूनही शुद्धता तपासत असत. दुसऱ्या भागातील ९९ श्लोकांत फेरूने एकूण २६० प्रकारच्या नाण्यांची माहिती दिलेली आहे. यात, त्या नाण्यांमधील धातू, त्यांचे प्रमाण, वजन, शुद्धता, ती नाणी पाडणाऱ्या राजसत्तेचे नाव, कोणत्या शहरात पाडली त्याचे नाव, त्याशिवाय नाण्यांवरील चिन्हे/आकृत्या इत्यादी बरेच तपशील आहेत. प्राचीन तसेच मध्ययुगीन भारतातील हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो.

संदर्भ :

  • Sarma, Sreeramula Rajeswara, A Jain Assayer at the Sulṭān’s Mint. Ṭhakkura Pherū and his Dravyaparīkṣā, Jaina Studies : Proceedings of the DOT 2010 Panel in Marburg, Germany, 2012.

                                                                                                                                                                          समीक्षक : प्रमोद जोगळेकर