श्रीदेवी : (१३ ऑगस्ट १९६३ – २४ फेब्रुवारी २०१८). भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटातून अनेक कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्रीदेवी. त्यांचा जन्म तमिळनाडूमधील शिवकाशी येथे झाला. श्रीअम्मा यंगेर अय्यपन हे त्यांचे मूळ नाव. त्यांचे वडील शिवकाशी येथे वकिलीचा व्यवसाय करीत होते. कंधान करुणाई या तमिळ चित्रपटाद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी बाल कलाकार म्हणून श्रीदेवी यांनी अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. लहान श्रीदेवींना मलयाळम् भाषेतील पोम्बट्टा (१९७१) या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा ‘केरळ राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाला. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी राणी मेरा नाम (१९७२) या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी बी. नागी रेड्डी निर्मित आणि सेतू माधवन दिग्दर्शित ज्युली ( १९७५) या हिंदी चित्रपटात नायिका लक्ष्मी हिच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती.
के. बालचंदर दिग्दर्शित मूंदरू मुदीचू (१९७६) या तमिळ चित्रपटात श्रीदेवी यांनी वयाच्या तेराव्या वर्षी प्रसिद्ध अभिनेते कमल हसन आणि रजनीकांत यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यांनी स्वतःला दक्षिण भारतीय सिनेमाच्या अग्रगण्य अभिनेत्रींपैकी एक म्हणून चित्रपटसृष्टीत स्थापित केले. कमल हसन आणि श्रीदेवी यांची जोडी प्रेक्षकांना आवडली. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये ३० चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. १६ वायथिनिले (१९७७), थुलावर्शम (१९७६), अंजिकरम (१९७७), सिगाप्पू रोजाक्कल (१९७८), पडहारेल्ला वायसु (१९७८), वेतागडू (१९७९), वरुमईन निराम शिवप्पू (१९८०), मिनदम कोकिला (१९८१), प्रेमाभिषेकम (१९८१), मुनद्रम पिराई (१९८२), आखरी पोराटम (१९८८), जगडेका वीरूदु अतिलोका सुंदरी (१९९०) आणि क्षणाक्षणम् (१९९१) इत्यादी श्रीदेवींचे तमिळ भाषेमधील गाजलेले चित्रपट आहेत.
१९७९ साली भारती राजा दिग्दर्शित सोलवा सावन या हिंदी चित्रपटामध्ये श्रीदेवींनी मुख्य भूमिका केली. तमिळ चित्रपटाचे हे हिंदी रूपांतर होते. अमोल पालेकर या चित्रपटाचे नायक होते. ग्रामीण भागातील एक भावपूर्ण गोष्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटाला यश प्राप्त झाले नाही. जितेंद्रसोबतच्या हिम्मतवाला (१९८३) या चित्रपटातून श्रीदेवींनी सौंदर्य आणि नृत्य या गुणांवर रसिकांचे लक्ष वेधून घेतले. हा चित्रपट रौप्यमहोत्सवी झाल्याने श्रीदेवीना हिंदी चित्रपटसृष्टीत सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. त्यांच्या सुरुवातीच्या हिंदी चित्रपटांमध्ये ‘रेखा’ व ‘नाझ’ या अभिनेत्रींनी त्यांच्यासाठी आवाज दिला.
मवाली (१९८३), जस्टीस चौधरी (१९८३), तोहफा (१९८४), नया कदम (१९८४), मकसद (१९८४), मास्टरजी (१९८५), आखरी रास्ता (१९८६), कर्मा (१९८६), नगीना (१९८६), नजराना (१९८७), मिस्टर इंडिया (१९८७), वक्त की आवाज (१९८७), निगाहे (१९८९) आणि चांदनी (१९८९) या यशस्वी हिंदी चित्रपटांमुळे लोकप्रिय अभिनेत्री म्हणून श्रीदेवींना ओळख मिळाली. या वाटचालीतच त्यांनी बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यामुळे श्रीदेवींची अभिनयाची जाण असलेली अभिनेत्री अशी ओळख पुढे आली. त्यांनी रवी टंडन दिग्दर्शित नजराणा या चित्रपटात स्मिता पाटील यांच्याबरोबरीने भूमिका साकारली. व्यावसायिक चित्रपटातील त्यांचा झपाटा आणि लोकप्रियता पाहून त्यांना ‘लेडी अमिताभ’ असेही म्हटले गेले. जाग उठा इन्सान (१९८४), बलिदान (१९८५), औलाद (१९८७), सल्तनत (१९८६), भगवानदादा (१९८६), रामअवतार (१९८८), शेरनी (१९८८), नाकाबंदी (१९९०), रूप की रानी चोरों का राजा (१९९३), आर्मी (१९९६) अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारली. त्यांचे हे चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरले.
श्रीदेवींनी मुनद्रम पिराई (१९८२) या चित्रपटामध्ये स्मृतिभ्रंशाने ग्रस्त असलेल्या महिलेची भूमिका साकारली. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना तमिळनाडू राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याच चित्रपटाचे हिंदी रूपांतर सदमा (१९८३) हा चित्रपट होय. या चित्रपटातील बालिश रेश्माच्या भूमिकेसाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले. कमल हसनसारख्या कसलेल्या अभिनेत्यासह श्रीदेवी यांनी या चित्रपटात काम केले. व्यावसायिक पातळीवर जरी हा चित्रपट अयशस्वी ठरला असला, तरी श्रीदेवींना त्यातील अभिनयामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. त्यातील ‘सुरमयी अंखियों मैं’ हे गाणे लोकप्रिय झाले. १९८१ चा तमिळ चित्रपट मिनडम कोकिलामधील भूमिकेकरिता त्यांना सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. के. बालचंदर, भारथी राजा, एस. पी. मुत्थुरामन या प्रथितयश चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांसोबत त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले.
१९८३ ते १९९७ या कालावधीत श्रीदेवी यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. शेखर कपूर दिग्दर्शित मिस्टर इंडिया (१९८७) या चित्रपटामध्ये वृत्तपत्र निवेदिका ही त्यांची भूमिका लोकप्रिय झाली. त्यातील त्यांची गाणी व नृत्य गाजले. पंकज पराशर दिग्दर्शित चालबाज (१९८९) या चित्रपटातील अभिनयामुळे त्यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटामध्ये त्यांनी दोन जुळ्या बहिणीच्या भूमिका साकारल्या, जी पात्रे पूर्णपणे भिन्न होती. यश चोप्रा दिग्दर्शित चांदनी (१९८९) हा त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण चित्रपट होय. यश चोप्रा यांनी त्यांच्या नृत्य आणि अभिनय कौशल्यासह त्यांचे सौंदर्य अचूक टिपले आणि त्या बॉलिवूडची ‘चांदनी’ म्हणून व्यापकपणे ओळखल्या जाऊ लागल्या. यश चोप्रा दिग्दर्शित लम्हे (१९९१) या त्या काळाच्या पुढच्या धाडसी प्रेमकथा असलेल्या चित्रपटात श्रीदेवी यांनी भिन्न स्वभाव आणि भिन्न वयाच्या दोन भूमिका साकारत आपल्या अभिनयाची चतुरस्रता दाखवली. खुदा गवाह (१९९२), गुमराह (१९९३), लाडला (१९९४) आणि जुदाई (१९९७) या चित्रपटांतील भूमिकांमुळे त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. विशेष म्हणजे चालबाज, लम्हे, खुदा गवाह आणि गुरुदेव अशा चार चित्रपटात श्रीदेवी यांनी दुहेरी भूमिका साकारली.
१९९६ मध्ये श्रीदेवी यांनी निर्माता बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केले. त्यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. त्यानंतर काही काळ त्या चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्या. खुशी आणि जान्हवी या आपल्या मुलींच्या पालनपोषणात त्या रमल्या.
श्रीदेवींनी काही वर्षांनी ‘मालिनी अय्यर’ (२००४) या छोट्या पडद्यावरील मालिकेतील भूमिकेनंतर गौरी शिंदे दिग्दर्शित इंग्लिश विंग्लिश (२०१२) या चित्रपटामधून पुनरागमन केले. त्यांनी साकारलेले शशी गोडबोले हे पात्र अनेक भारतीय गृहिणींशी संबंधित होते. इंग्रजी भाषा बोलण्याचे कौशल्य नसल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळूनही सतत अपमान होणाऱ्या गृहिणीची व्यक्तिरेखा त्यांनी यात उत्तम वठवली. बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण करून देखील श्रीदेवी यांच्या अभिनयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअरचे नामांकन मिळाले. त्यानंतर श्रीदेवी यांनी त्यांची निर्मिती असलेला मॉम (२०१७) हा चित्रपट केला. हा त्यांचा ३०० वा चित्रपट होता. या थरारपटामध्ये त्यांची आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी विविध डावपेच रचणारी आई अशी भूमिका होती. यातील श्रीदेवी यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.
भारतीय चित्रपटसृष्टीतील “प्रथम महिला सुपरस्टार” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांना २०१३ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित केले.
संयुक्त अरब अमिरात दुबईमध्ये एका कार्यक्रमप्रसंगी गेल्या असता एका हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा स्नानकक्षामध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला.
समीक्षण : दिलीप ठाकूर