पेंढारकर, भालजी : (३ मे १८९८ – २६ नोव्हेंबर १९९४). भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणाऱ्या चित्रकर्मींमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक आणि गीतकार. भालजींचा जन्म कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन सहायक शल्यचिकित्सक डॉ. गोपाळराव आणि राधाबाई पेंढारकर यांच्यापोटी कोल्हापुरात झाला. निर्माते – अभिनेते बाबूराव पेंढारकर हे त्यांचे ज्येष्ठ बंधू. चाकोरीबद्ध शालेय शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी तरुणवयातच कोल्हापूर सोडले. सुरुवातीच्या काळात पुण्यात केसरी या वृत्तपत्रात नोकरी, छत्रपती शाहूमहाराजांच्या रायबाग कॅम्पमध्ये वास्तव्य आणि सैन्यात भरती काहीशी अशी भटकंती करत ते कोल्हापूरला परतले.

भालजी पुण्यात असताना त्यांनी केसरीचे अंक घरोघरी पोहोचवणे, विकणे अशी कामे केली; पण त्यातून उरलेल्या वेळात त्यांनी केसरीचे जुने अंक – विशेषतः लोकमान्य टिळकांचे जहाल अग्रलेख, चिपळूणकर, मोडक, विजापूरकरांच्या ग्रंथमाला, पुस्तके, चरित्रे असे साहित्य वाचले. त्यांच्यातल्या लेखकावर ह्या सगळ्यांचे संस्कार झाले. १ ऑगस्ट १९२० रोजी टिळकांचे निधन झाले, तेव्हा व्यथित झालेल्या भालजींनी लोकमान्यांचा स्वर्गीय संदेश ही पुस्तिका लिहून प्रकाशित केली आणि चौकाचौकात विकली. भालजींच्या लिखाणाचा श्रीगणेश अशाप्रकारे झाला. पुण्यातल्या ‘लक्ष्मी’ थिएटरचे व्यवस्थापक रुस्तमजी मोदी (सोहराब मोदींचे बंधू) यांनी त्या काळी मूकपटांच्या वरच्या भागात इंग्रजी उपशीर्षकांची मराठी भाषांतरे देण्याची पद्धत सुरू केली होती. भालजींना वर्तमानपत्रात स्फुटे लिहिण्याबरोबरच हे मराठी भाषांतराचे कामही मिळाले. पुढे त्यांनी सिनेमा समाचारमधून चित्रपटांची परीक्षणेही लिहिली. १९२१ च्या सुमारास ते गणेशपंत ऊर्फ बाबाराव सावरकरांच्या संपर्कात आले. भालजींवर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर ऊर्फ तात्यारावांच्या आणि बाबाराव सावरकरांच्या विचारसरणीचा प्रभाव पडला, परिणामस्वरूप त्यांनी ‘हिंदुस्तान मंडळा’त सामील होत क्रांतिकार्याची शपथ घेतली आणि पुढे तेच त्यांच्या जीवितकार्याचे सूत्र बनले.

याकाळात भालजींनी संगीत कायदेभंग, भवितव्यता, क्रांतिकारक, राष्ट्रसंसार, आसुरी लालसा आणिअजिंक्यतारा ही सहा नाटके लिहिली, त्यांत अभिनयही केला. त्यांनी असीरे हर्स या उर्दू नाटकाचे केलेले मराठी रूपांतर आसुरी लालसा (१९२५) हे रुस्तमजी यांच्या आर्य सुबोध नाटक मंडळीतर्फे रंगमंचावर आले आणि खूप गाजले. पुढे भालजींनी मार्कंडेय (अपूर्ण), रजहृदय, उदयकाळ, जुलूम, राणीसाहेब, खूनी खंजर, बाजीराव-मस्तानी, वंदे मातरम् –आश्रम, बाजबहाद्दूर अर्थात राणी रूपमती या मूकपटांचे लेखन आणि त्यातल्या काहींचे दिग्दर्शनही केले. बकंभट या व्यंगपटाचे लेखन-दिग्दर्शन केल्यानंतर त्यांनी सरस्वती सिनेटोन या चित्रसंस्थेच्या श्यामसुंदर (१९३२) या पौराणिक बालचित्रपटाची दिग्दर्शन-पटकथा-संवाद-गीते अशी आघाडी संभाळली. भारतीय चित्रपटसृष्टीतला हा पहिला बालचित्रपट हिंदी आणि बंगालीमध्ये निर्माण झाला होता, तसेच पहिला रौप्यमहोत्सवी चित्रपट होण्याचा मानही त्याने मिळवला. भालजींनी कोल्हापूर सिनेटोन, श्याम सिनेटोन, अरुण पिक्चर्स, सरस्वती सिनेटोन, शालिनी सिनेटोन इत्यादी चित्रसंस्थांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची किंवा कथा-पटकथा-संवाद यांची जबाबदारी सांभाळली.

भालजी पेंढारकरांच्या बोलपटांच्या सुरुवातीलाच ‘बहु असोत  सुंदर…’हे महाराष्ट्रगीत असे.आकाशवाणी (१९३४), पार्थकुमार (१९३४), कालियामर्दन (१९३५), सावित्री (१९३६) अशी सुरू झालेली त्यांची कारकीर्द नेताजी पालकर (१९३९), थोरातांची कमळा (१९४१), वाल्मिकी (१९४६), मीठभाकर (१९४९), छत्रपती शिवाजी (१९५२), गाठ पडली ठका ठका (१९५६), मोहित्यांची मंजुळा (१९६३) अशी वळणे घेत गेली. साधी माणसं (१९६५), गनिमी कावा (१९८१) आणि शेवटचा शाब्बास सूनबाई (१९८६) असे तब्बल पंचेचाळीस चित्रपट त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले. ह्या चित्रपटांत ते दिग्दर्शन-कथा-पटकथा-संवाद किंवा निर्मिती या नात्याने कार्यरत होते. सुरुवातीला मूकपट, पुढे बोलपट आणि शेवटचे दोन रंगीत चित्रपट अशी त्यांची वाटचाल दिसते.

भालजींच्या त्या कालखंडात भारतावर ब्रिटिशांचे आधिपत्य होते. क्रांतीकारक वृत्ती असणाऱ्या भालजींनी सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट काढले; पण त्यांच्या चित्रपटात देवादिकांचे दर्शनमाहात्म्य, चमत्कार अशा गोष्टींपेक्षा एक वेगळी वाट जाणीवपूर्वक चोखाळलेली दिसते. श्यामसुंदर  या चित्रपटामधला जुलुमी कंसाविरुद्ध लढणारा कृष्ण तसेच यमाकडून पतीचे प्राण परत मिळवणारी सावित्री, राजसत्तेला आणि जनसत्तेला आव्हान देऊन सत्याशी प्रामाणिक राहणारी कान्होपात्रा  (१९३७), राजवैभवाचा त्याग करून संन्यास स्वीकारणारा गोपीचंद या व्यतिरेखा केंद्रस्थानी असणाऱ्या या चित्रपटांद्वारे भालजींनी पौराणिक कथा सांगण्यासोबतच त्यांना अभिप्रेत असलेला जीवनविचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये नंतर प्रसिद्ध झालेल्या अनेक अभिनेते व अभिनेत्रींना त्यांनी त्यांच्या चित्रपटांतून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आणलेले होते.

भालजींनी स्वातंत्र्यपूर्वकाळात पारतंत्र्याने जखडून टाकलेल्या मराठी माणसाला तेजस्वी राष्ट्रधर्माची शिकवण देण्याकरिता, मनामनांमध्ये स्फुल्लिंग चेतवण्यासाठी, कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. या चित्रपटांतून शिवाजी महाराजांचे स्वराज्यस्थापनेचे धाडस, जिजामातांची आणि दादोजी कोंडदेवांची शिकवण, परक्या सत्तेच्या जोखडातून महाराष्ट्रभूमीला सोडवण्यासाठी प्राण अर्पण करायला तयार असणारे शूर मावळे आणि प्रसंगी तलवार उचलून स्वातंत्र्याच्या लढाईत उडी घेणाऱ्या मराठमोळ्या वीरांगना यांचे चित्रण त्यांनी कुशलतेने केले. खटकेबाज संवाद, मराठमोळ्या कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, मने चेतवणारी द्वंद्वे आणि लढाया, खास मराठी शब्दसाज आणि संगीत असणारी गीते असे हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

भालजींनी कोल्हापूर छत्रपतींकडून कोल्हापूर सिनेटोन हा स्टुडिओ खरेदी केला आणि त्याचे नामकरण जयप्रभा स्टुडिओ असे केले (१९४५). तेथील वातावरण चित्रनिर्मितीस पोषक आणि नेहमी शिस्तप्रिय असेल याकडे भालजींचा कटाक्ष असे. तेथे त्यांनी अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांना घडवले आणि चित्रपटनिर्मितीचे कार्य दीर्घकाळ सुरू ठेवले. १९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये हा स्टुडिओ जाळला गेला. त्यात नुकतेच तयार झालेले मीठभाकर व बाळ गजबरांचा मेरे लाल या चित्रपटांच्या प्रतीही नष्ट झाल्या. या घटनेमुळे दीड-दोनशे अभिनेते, तंत्रज्ञ आणि कामगार यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला; मात्र भालजींनी आपली जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर जयप्रभा पुन्हा उभा केला व या चित्रपटांची पुनर्निर्मिती केली. जयशंकर दानवे आणि वि. ना. परांडेकर या भालजींच्या दोघा मदतनीसांनी मीठभाकर चे पटकथा-संवाद पुन्हा लिहून काढले. या चित्रपटाने चांगला व्यवसायही केला (१९४९). शहरातल्या जीवनाचा हव्यास सोडून खेड्यात परतलेले शेतकरी कुटुंब या चित्रपटात भालजींनी दाखविले आहे. याशिवायही अनेक सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.

भारताला स्वातंत्र्य मिळाले (१९४७). गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. जय भवानी (१९४७ ), शिलंगणाचे सोने (१९४९), छत्रपती शिवाजी (१९५२), महाराणी येसूबाई (१९५४), पावनखिंड (१९५६), नायकिणीचा सज्जा (१९५७), मोहित्यांची मंजुळा (१९६३), थोरातांची कमळा (१९६३), मराठा तितुका मेळवावा (१९६४), बालशिवाजी आणि गनिमी कावा (१९८१) अशी शिवचरित्रावर आधारित चित्रपटांची निर्मिती जयप्रभा स्टुडिओत सुरू राहिली. यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य, संयम आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी, यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली. चित्रपट ऐतिहासिक असो वा सामाजिक त्यांमध्ये माणसाची सत्वपरीक्षा हे केंद्रीभूत सूत्र आणि आचारविचारांची शुचिता, शक्ती आणि शौर्याची  उपासना, देशप्रेम आणि त्याग अशा मानवी मूल्यांचा विचार केंद्रस्थानी आहे. त्यांची प्रखर हिंदुत्वनिष्ठा आणि आणि राष्ट्रकार्याची आस या चित्रपटांतून दिसून येते.

भालजींनी कोल्हापूरमधल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मार्ग खुले करणाऱ्या विद्यापीठ हायस्कूलच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी १९८२ पर्यंत सांभाळली. चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार तसेच भारतीय चित्रपटक्षेत्रातल्या प्रदीर्घ कामगिरीसाठी त्यांना १९९२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार या चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. त्यांच्या साधी माणसं (१९६६) आणि तांबडी माती (१९७०) या चित्रपटांना सर्वोच्च मराठी चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

भालजींचे चार विवाह झाले. त्यांच्या पहिल्या पत्नी सावित्री यांच्या मृत्यूपश्चात त्यांनी सरला बिडकीन यांच्याशी विवाह केला. साहित्यिक-सिनेदिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर आणि सरोज चिंदरकर ही त्यांची अपत्ये. भालजींनी पुढे लीला चंद्रगिरी आणि बकुळा दैनी यांच्याशी विवाह केले. लीलाबाई मूकपटकालातल्या गाजलेल्या अभिनेत्री, पुढे त्या बोलपटातही चमकल्या आणि सैरंध्री (१९३३) ह्या भारतातल्या पहिल्या रंगीत बोलपटाच्या (मराठी-हिंदी ) नायिका होण्याचा मान त्यांना लाभला होता. कोकणातल्या खेड्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार निष्ठेने करणारे जयसिंग पेंढारकर, साहित्यिका माधवी देसाई आणि सदानंद पेंढारकर ही त्यांची अपत्ये. बकुळाबाईंनीही नेताजी पालकर  सारख्या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. नाट्यलेखक -अभिनेते बाळासाहेब दैनी हे त्यांचे सुपुत्र.

भालजींचे कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या अप्रगत अशा कालखंडात मूकपटापासून सुरुवात करत उत्तमोत्तम बोलपट निर्माण करून चित्रपटसृष्टीचा भक्कम पाया घालणारे सर्जनशील, प्रयोगशील चित्रपटकर्मी म्हणून त्यांचे नाव भारतीय कलेच्या इतिहासात कायमचे नोंदले गेले आहे.

संदर्भ : 

  • दानवे, जयश्री जयशंकर, हिरवी चादर रूपेरी पडदा, कोल्हापूर, १९९९.
  • पेंढारकर, भालजी, साधा माणूस, मुंबई, १९९३.
  • भोसले,यशोधरा, अपूर्व, अलौकिक, एकमेव, मुंबई, २००४.
  • http://www.bhaljipendharkarkendra.org/biography-bhalji-pendharkar-marathi.php

समीक्षक : अरुण पुराणिक