बॅलड : यूरोपीय, विशेषतः इंग्रजी लोकसाहित्यातील एक पारंपारिक काव्यप्रकार. मौखिक परंपरेने प्रसृत होणारे कथाकाव्य अशीही बॅलडची सोपी व्याख्या केली जाते. यापेक्षा अधिक नेमकेपणाने केलेली, छोट्या कडव्यांतून लोकप्रिय कथा जोमदार पद्धतीने मांडणारा एक काव्यप्रकार, अशीही एक व्याख्या आहे. या काव्याची मूळ रचना एकाच कवीची असावी असे मानले, तरी कालौघात मूळ रचनेच्या संहितेत व बाह्यांगात अनेक बदल घडतात व एकाच बॅलडचे अनेक पाठ तयार होतात. बॅलडला एक साहित्यप्रकार व एक संगीतरचनाप्रकार असे दोन्ही संदर्भ असतात. ज्या मूळ धातूपासून बॅलड हा शब्द निघाला, त्या ‘Ballare’ या लॅटिन-इटालियन भाषेतील धातूचा अर्थ ‘नृत्य करणे’ असा आहे म्हणून बॅलडचा आणखी एक अर्थ नृत्यगीत असाही आहे.
पारंपारिक बॅलड हे वस्तुनिष्ठ व नाट्यपूर्ण असते. त्याचा प्रारंभ उत्कर्ष बिंदूपासून केलेला असतो व नेटक्या संवादांतून व प्रसंगांतून त्याचा विकास होतो. कवीच्या व्यक्तीगत भावना, प्रवृत्ती इत्यादींची छाया त्यावर पडलेली नसते. कथेत स्वभावरेखाटन अगर मनोविश्लेषण यांना फारसा वाव नसतो. बॅलडची रचना पारंपारिक वृत्तांत व छंदांत केलेली असते. धृपदाची मांडणी परिणामकारक, साधी व कधीकधी चढत्या श्रेणीची असते. बॅलडची भाषा ठाशीव, साचेबंद असते. तीत ठराविक विशेषणे, उपमा, अलंकार यांचा उपयोग केलेला असतो. बॅलडमध्ये शौर्याच्या, धीरोदात्त व साहसी कृत्यांच्या, देशभक्तीच्या, सरहद्दीवरील चकमकींच्या, अद्भुत व अतिमानवी जगातील घटनांच्या, हद्दपार केलेल्या शूर पुरुषांच्या (आउटलॉज) व धाडसी दरोडेखोरांच्या कथा सांगितलेल्या असतात.
पाश्चात्य देशांत बॅलडची सुरुवात अकराव्या-बाराव्या शतकांत झाली. तेराव्या शतकातील ज्यूडास हे इंग्रजी भाषेतील सर्वांत जुने बॅलड समजण्यात येते. सोळाव्या-सतराव्या शतकांत हा काव्यप्रकार भरभराटीस आला होता. सर पॅट्रिक स्पेन्स हे प्राचीन बॅलड नमुनेदार मानण्यात येते. दुष्टांचे निर्मूलन व दीनांचे रक्षण करणाऱ्या रॉबिन हूड ह्या साहसी दरोडेखोराचे बॅलड इंग्लंड मध्ये अत्यंत लोकप्रिय झाले. इंग्रजीत फ्रॅन्सिस जे. चाइल्ड यांच्या संपादनाखालीस पाच खंडात प्रसिद्ध झालेला इंग्लिश अँड स्कॉटिश पॉप्युलर बॅलड्स हा संग्रह अधिकृत मानला जातो (१८८२–९८). या संग्रहात सु. ३०५ बॅलड असून, त्यांपैकी काहींचे २५ वेगवेगळे पाठ दिलेले आहेत.
‘ब्रॉडसाइड बॅलड’ नावाचा एक प्रकार इंग्लंडमध्ये सोळाव्या शतकात रूढ झाला. ते कागदाच्या एका बाजूला छापून विकण्यात येत असे. वर्तमानकालीन घटनेवर हे रचलेले असे. ‘लिटररी बॅलड’ हा दुसरा प्रकार. आधुनिक काळात एका कवीने जुन्या धर्तीवर मुद्दाम केलली रचना म्हणजे लिटररी बॅलड. कोलरिजचे राइम ऑफ एन्शंट मरिनर व कीट्सचे ला बेल दाम सॅन्स मेर्सी ही एकोणिसाव्या शतकातील इंग्रजीमधील या प्रकारच्या वाङ्मयीन रचनेची प्रख्यात उदाहरणे होत.अमेरिकेतील लाकूड कामगार आणि गुरांचे कळप बाळगणारे व निपुण घोडेस्वार म्हणून प्रसिद्ध असलेले गोपालक यांनीही या स्वरूपाची रचना आधुनिक काळात केली. बॉनी अँड क्लाइड हे बॅलड अमेरिकेत अतिशय गाजले. मराठीतील पोवाडा हा काव्यप्रकार विषय, तंत्र आणि रचना ह्यांबाबतीत बॅलडच्या जवळपास येतो.
संदर्भ :
- Fowler, D.C. A literary History of the popular Ballad,Durham,N.C.,1968.
- Honderson, T. F. The Ballad in Literature, Folcroft, Pa., 1973.