जॅक्सन, मायकल : (२९ ऑगस्ट १९५८ – २५ जून २००९). जगप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक, गीतकार आणि नर्तक. ‘‘किंग ऑफ पॉप’’ याबरोबरच द ग्लोव्ह वन, वॉको जॅको, एमजे, जॅको, मिकी माईक, ऍपलहेड, स्मिली अशा अनेक टोपणनावानेही ते प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म अमेरिकेतील शिकागोजवळील इंडियाना येथील गॅरी या गावात झाला. जॅक्सन स्ट्रीटवर एका श्रमिक वर्गातील आफ्रिकन-अमेरिकन कुटुंबामध्ये जन्मलेले मायकल हे जॅक्सन कुटुंबातील नऊ मुलांपैकी आठवा मुलगा होते. त्यांना रेबी, ला तोया आणि जेनेट या तीन बहिणी आणि जॅकी, टीटो, जर्माइन, मार्लन आणि रँडी हे पाच भाऊ. त्यांची आई कॅथरीन एस्तेर जॅक्सन या क्लॅरिनेट आणि पियानो वाजवत असत. त्यांचे वडील जोसेफ हे निवृत्त मुष्टियोद्धा होते. चरितार्थाकरिता ते क्रेन ऑपरेटरचे काम करीत. तसेच स्थानिक ‘रिदम अँड ब्लूज’ बँडमध्ये गिटार वाजवित असत. जोसेफ आणि त्यांचे भाऊ ल्यूथर यांनी इतर सहकाऱ्यांसमवेत ‘द फॅल्कन्स’ नावाचा बँड काढला. काही कालावधीनंतर तो बंद पडला; पण त्यांच्या गाण्याच्या तालमींमुळे या मुलांच्या मनात गायन, वादन यांबद्दल आकर्षण निर्माण झाले व त्यांचे संगीताचे उपजत कलागुण हळूहळू वाढीस लागले. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना घरीच संगीताचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या वडिलांनी या भावंडांना गायन, नृत्य, प्रत्यक्ष रंगमंचावर कसे वावरावे, सादरीकरण कसे करावे यांचे प्रशिक्षण दिले; पण याचबरोबर या सर्व भावंडांचे बालपण त्यांच्या वडिलांच्या विक्षिप्त स्वभावामुळे अतिशय खडतर परिस्थितीतही गेले. यामुळे बहुतांशी मुलांचा स्वभाव विशेषत: मायकल यांचा स्वभाव काही प्रमाणात मनस्वी बनला.

वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मायकल आणि त्यांची चार भावंडे मिळून ‘जॅक्सन ब्रदर्स’ या नावाने संगीताचे कार्यक्रम करीत होती. त्यावेळी मायकल १० वर्षांचे होते. तत्कालीन तरुणांना आकर्षक वाटणारी दिलखेचक वेशभूषा आणि वेगळी केशभूषा (अफ्रोस – केसांची डोक्यावर गुच्छासारखी असणारी रचना), त्वेषाने आणि वेगवान हालचालींनी भरलेले नृत्य या वैशिष्ट्यांसह तरुण आणि उत्साही मंडळींनी भरलेला असा हा समूह अल्पावधीतच खूप यशस्वी झाला. पुढे त्यांच्या बँडचे नामकरण ‘जॅक्सन 5’ असे करण्यात आले. ऑगस्ट १९६७ मध्ये हार्लेम येथील सुप्रसिद्ध अपोलो थिएटरमध्ये त्यांना कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. तेथील अमॅच्युअर शो या कार्यक्रमात भाग घेण्यास मिळणे, ही कलाकारांसाठी एक पर्वणी असायची. तेथील कार्यक्रमामुळे या बंधूंनाही प्रसिद्ध कलाकार म्हणून मान्यता मिळाली. ‘स्टीलटाउन’ या संस्थेच्या नावाखाली पहिल्यांदा या बँडची ‘बिग बॉय’ बॅक्ड विथ ‘यू हॅव चेंज’ आणि ‘वी डोन्ट हॅव टू बी ओव्हर 21 टू फॉल इन लव्ह’ बॅक्ड विथ ‘जॅम सेशन’ ही दोन गाणी ध्वनिमुद्रित झाली. यानंतर काही कालावधीतच अमेरिकेतील एक प्रसिद्ध ध्वनिमुद्रिका संस्था मोटाऊन रेकॉर्ड्स या संस्थेचे अध्यक्ष ज्युनिअर बेरी गॉर्डी यांनी या बँडबरोबर मोठ्या रकमेचा करार केला (१९६८). या संस्थेबरोबर ‘जॅक्सन 5’ यांनी आय वाँट यू बॅक, एबीसी, द लव्ह यू सेव्हआय विल बी देअर, ममाज पर्ल, नेव्हर कॅन से गुडबाय, मेबी टुमॉरो  या अत्यंत यशस्वी ध्वनिमुद्रिका केल्या. ‘आय वाँट यू बॅक’ हे या संस्थेबरोबरचे त्यांचे पहिलेच गाणे अतिशय लोकप्रिय झाले. अमेरिकेतील ‘बिलबोर्ड्स टॉप 100’ (अमेरिकेतील सर्वांत लोकप्रिय ध्वनिमुद्रिका आणि गीतांची क्रमवारी प्रसिद्ध करणारे मान्यताप्राप्त साप्ताहिक) या संगीत मानांकनात हे गाणे पहिल्या क्रमांकावर गेले. अमेरिकेत या गाण्याच्या संग्रहाच्या जवळपास वीस लक्ष आणि अमेरिकेबाहेर चार लक्ष प्रतींची तडाखेबंद विक्री झाली. पुढच्या एबीसी या संग्रहाच्या बावीस लक्ष प्रतींची विक्री झाली.

१९७१ च्या सुमारास मायकलनी मोटाऊन या संस्थेसोबत ‘गॉट टू बी देअर’ हे पहिले एकल गीत ध्वनिमुद्रित केले. या गाण्यापासून त्यांचा स्वतंत्र एकल कलाकार म्हणून प्रवास सुरू झाला. याच्या संग्रहाच्या जगभरात सु. पंधरा लाख प्रती विकल्या गेल्या. त्यानंतरच्या ‘बेन’ आणि ‘रॉकिन रॉबिन’ (१९७२) या त्यांच्या गाण्यांच्या संग्रहालाही असाच प्रतिसाद मिळाला. यानंतरच्या काळात मायकल आपल्या गाण्यांचे स्वतंत्रपणे ध्वनिमुद्रण करू लागले. त्यांची भावंडे नंतर स्वतंत्रपणे पार्श्वगायन करायची. त्यानंतर मायकल यांचे म्युझिक अँड मी (१९७३), फॉरेव्हर मायकल (१९७५) हे दोन एकल संग्रह प्रकाशित झाले. अमेरिकेतील प्रसिद्ध संगीत – नृत्य दूरचित्रवाणी कार्यक्रम ‘सोल ट्रेन’ यावर त्यांनी ‘डान्सिंग मशीन’च्या अभिनयाने केलेले रोबोट नृत्य लोकप्रिय ठरले.

‘जॅक्सन 5’ नी अमेरिकेतील प्रथितयश ध्वनिमुद्रिका संस्था सीबीएस-एपिक यांच्याशी मोठ्या रकमेचा करार केला (१९७५). या संस्थेने १९७७ मध्ये त्यांच्या द जॅक्सन्स आणि गोइन प्लेसेस या दोन ध्वनिमुद्रिका काढल्या. यामध्ये मायकलनी ‘ब्ल्यूझ अवे’ आणि ‘डिफ्रंट काईंड ऑफ लेडी’ ही गाणी लिहिली. त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली; पण यांचा समावेश असलेल्या या ध्वनिमुद्रिकांना मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्याकाळच्या सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक असलेल्या द व्हिझ या चित्रपटात मायकलनी ख्यातनाम गायिका व अभिनेत्री डायना रॉससोबत काम केले; पण हाही चित्रपट आपटला. त्यापुढचा त्यांचा ईझ ऑन डाऊन द रोड हाही चित्रपट फारसा चालला नाही. पुढे सीबीएससोबत त्यांनी तिसरी डेस्टिनी ही यशस्वी ध्वनिमुद्रिका काढली. यातील ‘शेक युवर बॉडी डाऊन टू द ग्राउंड’ हे मायकल-रँडी या जोडगोळीने लिहिलेले डिस्को धाटणीचे गाणे तर पॉप संगीताच्या याद्यांवर ७ व्या स्थानापर्यंत गेले. आजही हे गाणे एक श्रेष्ठ नृत्यानुकृत गाणे मानले जाते. २८ जुलै १९७९ ला मायकलचे ‘डोन्ट स्टॉप टिल यू गेट इनफ’ हे दृकश्राव्य माध्यमातील पहिले एकल गीत प्रकाशित झाले. हे गाणे अवघ्या तीन महिन्यांत अमेरिकेतील महत्त्वाच्या बहुतांश संगीत मानांकनात प्रथम क्रमांकावर गेले. या गाण्याचा समावेश असलेली ऑफ द वॉल या ध्वनिमुद्रिकेतील इतरही गाणी आणि मायकलची अदाकारी रसिकांना भावली. यामुळे एक तरुण आणि परिपक्व गायक म्हणून मायकल लोकांसमोर आले. या संग्रहाला एक ग्रॅमी पुरस्कारही मिळाला. याच्या जगभरात २० दशलक्ष प्रती विकल्या गेल्या. १९८० च्या उत्तरार्धात मायकल यांनी जॅक्सन समूहाच्या ‘कॅन यू फील इट’ या गाण्याच्या दृकश्राव्यफितीची रचना केली. यानंतर त्यांचा ट्रायम्फ हा संग्रह प्रसिद्ध झाला. याच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी अमेरिकेत ३९ शहरांत कार्यक्रम केले. तेथे त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला.

१ डिसेंबर १९८२ रोजी मायकलचा थ्रिलर हा अभूतपूर्व यशस्वी एकल संग्रह प्रदर्शित झाला. यातील बिली जीन, द गर्ल इज माइन, थ्रिलर, बीट इट, ह्यूमन नेचर इत्यादी सात गाणी खूप गाजली. जगभरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या या ध्वनिमुद्रिकेने ६६ दशलक्ष खपाचा टप्पा गाठला. बिलबोर्ड्सच्या यादीवर हा संग्रह ३७ आठवडे पहिल्या क्रमांकावर आरूढ होता. यामुळे ध्वनिमुद्रणाच्या क्षेत्रात सर्वाधिक मानधन घेणारा २५ वर्षांचा तरुण म्हणून मायकलची ख्याती पसरली. थ्रिलर या संग्रहाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली.

१९८३ मध्ये जॅक्सन बंधू ‘मोटाऊन २५ : यस्टरडे, टुडे अँड फॉरेव्हर’ या कार्यक्रमासाठी पुन्हा एकत्र आले. या कार्यक्रमात ‘बिली जीन’ या गाण्यावर मायकलनी एकट्याने केलेले सादरीकरण नेत्रदीपक असे होते. स्फटिकांनी सुशोभित केलेला हातमोजा घालून त्यांनी इतर नृत्यप्रकारांसोबतच त्यांचा जगप्रसिद्ध असा, जेरॉन कॅन्डिडेड उर्फ कॅस्पर यांनी त्यांना शिकवलेला, मूनवॉकही सादर केला. या कार्यक्रमात प्रेक्षकांचा जल्लोषही टिपेला पोहोचला होता. कार्यक्रमातील या सादरीकरणाला एमी पुरस्काराचे नामांकन मिळाले. २६व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांमध्ये थ्रिलरने आठ ग्रॅमी पुरस्कार जिंकले (१९८४). एका वर्षी आठ ग्रॅमी पुरस्कार जिंकणे हा अमेरिकेतील प्रसिद्ध सँताना बँडसोबतचा जॅक्सन यांचा एक विक्रम आहे.

नोव्हेंबर १९८३ मध्ये मायकल जॅक्सन यांनी त्यांच्या भावंडांसोबत व्हिक्टरी टूरमध्ये सहभाग घेतला. याचे प्रायोजकत्व पेप्सीको कंपनीने घेतले होते. या कार्यक्रमात मद्य आणि अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधी कार्य करणार्‍या धर्मादाय संस्थांना आणि नशेत वाहन न चालविण्याच्या मोहिमेस मायकल जॅक्सन यांनी पाठिंबा दिला आणि सार्वजनिक सेवेच्या घोषणांसाठी त्यांचे ‘बीट इट’ हे गाणे विनामूल्य वापरण्याची परवानगी दिली. याकरिता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना खास पुरस्कार दिला. अमेरिकेतील मिसूरीमधल्या कान्सास या शहरातून कार्यक्रमाची सुरुवात आणि ९  डिसेंबर १९८४ ला लॉस एंजेल्स येथे या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यासोबतच सीबीएसने व्हिक्टरी नावाची जॅक्सनांची ध्वनिमुद्रिकाही प्रदर्शित केली. मायकल यांनी या दौऱ्यामधून मिळालेले त्यांचे मानधन सुमारे पाच दशलक्ष डॉलर्स स्वयंसेवी संस्थांना दान करून टाकले. व्हिक्टरी टूरवर असतानाच मायकलनी ४८ दशलक्ष डॉलर्स खर्चून ‘एटीव्ही म्युझिक पब्लिशिंग कंपनी’ विकत घेतली. ध्वनिमुद्रण व प्रदर्शन क्षेत्रातील एकट्या व्यक्तीने केलेला हा सगळ्यात मोठ्या सौद्यांपैकी एक सौदा मानला जातो.

१९८५ मध्ये मायकलनी अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत ‘वी आर द वर्ल्ड’ हा कार्यक्रम इथिओपियातील उपासमारीने ग्रस्त गरीब लोकांसाठीच्या मदतीकरिता केला. या गाण्याला ‘साँग ऑफ द इयर’ या पुरस्कारासह चार ग्रॅमी पुरस्कार मिळाले. लायोनेल रिचीसह मायकलनी लिहिलेल्या या गाण्याने ६३ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली.

थ्रिलरनंतर पाच वर्षांच्या प्रतिक्षेअंती जुलै १९८७ मध्ये मायकल यांचा बहुचर्चित बॅड हा संग्रह प्रदर्शित झाला. यामध्ये ‘आय जस्ट कान्ट स्टॉप लव्हिंग यू’, ‘बॅड’, ‘द वे यू मेक मी फील’, ‘मॅन इन मिरर’ आणि ‘डर्टी डायना’, ‘स्मूथ क्रिमिनल’ ही श्रवणीय गाणी समाविष्ट होती. बॅडमधील ‘आय जस्ट कान्ट स्टॉप लव्हिंग यू’ हे पहिले गाणे २७ जुलै १९८७ रोजी जगभर प्रदर्शित करण्यात आले. लागलीच ते अमेरिकेच्या पहिल्या स्थानावर विराजमान झाले. त्यानंतर या गाण्याने ब्रिटनच्या यादीमध्येही पहिले स्थान काबीज केले. या संग्रहामधील पाच गाणी प्रथम क्रमांकावर पोहोचली. १२ सप्टेंबर १९८७ मध्ये मायकलनी जपान येथील टोकियो शहरामधून बॅडच्या जागतिक दौऱ्याला सुरुवात करून १४ जानेवारी १९८९ अमेरिकेतील लॉस एंजेल्स येथे त्यांचा शेवटचा कार्यक्रम केला. यात साडेचार दशलक्ष रसिकश्रोत्यांनी सहभाग नोंदवला. या दीड वर्षात त्यांनी चार खंडातील १५ देशांमध्ये १२३ कार्यक्रम केले.

१९८८ मध्ये मायकल यांचे मूनवॉक हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. याला स्टीफन डेव्हिस आणि जॅकलिन केनेडी ओनासिस यांनी प्रस्तावना दिलेली होती. हे आत्मचरित्र न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक विक्री झालेल्या यादीच्या अव्वलस्थानी पोहोचले. ऑक्टोबर १९८८ मध्ये त्यांनी मूनवॉकर ही चित्रफीत प्रदर्शित केली. ज्यामध्ये जॅक्सन यांच्या अभिनयाचे थेट प्रसारण आणि लघुपट होता.

मार्च १९८८ मध्ये मायकलनी कॅलिफोर्नियामधील सांता येनेझजवळ सायकामोर रॅन्च ही २७०० जागा खरेदी केली आणि त्याचे नेव्हरलँड रॅन्च असे नामकरण केले. ही जागा त्यांनी त्यांच्या कल्पनाचित्राप्रमाणे सजविली. यात विविध उंची वस्तू, पुतळे, उंच फिरते चक्र, खेळाचे मैदान, चित्रपटगृह आणि प्राणीसंग्रहालय, लहान मुलांकरिता विविध मनोरंजनाची खेळणी इत्यादींचा समावेश करण्यात आला होता.

जॅक्सन यांनी १९९२ मध्ये ‘हील द वर्ल्ड फाउंडेशन’ याची स्थापना केली. याद्वारे युद्ध, दारिद्र्य आणि आजाराने धोक्यात आलेल्या मुलांना मदत करण्यासाठी त्यांनी जगभरातील कोट्यवधी डॉलर्सची मदत पाठवली.

१९९२ रोजी डेंजरस ही आपली आठवी ध्वनिमुद्रिका मायकलनी प्रसिद्ध केली. याच्या जगभरात ३० दशलक्ष प्रती विकल्या गेल्या. १९९२ च्या अखेरीस डेंजरस ही बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्समध्ये जगभरातील सर्वाधिक विक्री होणारी ध्वनिमुद्रिका होती. याचदरम्यान त्यांनी त्यांचा डान्सिंग द ड्रीम हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. डेंजरसच्या दोन पर्वाच्या जागतिक दौऱ्याला जून १९९२ ला जर्मनी येथून सुरुवात झाली. मायकल यांनी या दौर्‍याचे प्रसारण हक्क एचबीओ वाहिनीला २० दशलक्ष डॉलर्सला विकले, हा विक्रम अजूनही कायम आहे. सोल ट्रेन अवॉर्ड्समध्ये मायकलच्या डेन्जरस या संग्रहाला आणि ‘रिमेम्बर द टाइम’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट संग्रह आणि सर्वोत्कृष्ट गाणे हे पुरस्कार मिळाले. वर्ल्ड म्यूझिक अवॉर्ड्समध्ये ‘वर्ल्ड्स बेस्ट सेलिंग रेकॉर्ड आर्टिस्ट ऑफ द ईरा’ हा पुरस्कार त्यांना मिळाला. मायकल जॅक्सन यांनी आपल्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये देशात व परदेशातही आपल्या पॉप संगीताच्या विविध दौऱ्याच्या माध्यमातून ९०० पेक्षाही अधिक कार्यक्रम सादर केले.

१९९३ आणि २००३ मध्ये मायकलवर लहान मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता; मात्र यांपैकी पहिल्या खटल्यावेळी त्यांनी हे प्रकरण सामोपचाराने मिटविले व दुसऱ्या प्रकरणात त्यांची खटल्यातून निर्दोष सुटका झाली (२००५). या प्रकरणानंतर मायकल यांना मानसिक वैफल्य आले. यानंतर त्यांनी नवीन गाण्यांचे व कार्यक्रमांचे प्रमाणही कमी केले.

मायकल जॅक्सन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसून येतात. पॉप संगीतातील एक जगप्रसिद्ध कलाकार, अतिशय दानशूर व्यक्तिमत्त्व तसेच सर्वाधिक मानधन मिळविलेला कलाकार, त्यांनी स्वत:वर केलेल्या अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया, त्याचबरोबर लोकप्रिय कलाकार असल्याने अनेक वादग्रस्त गोष्टींनी त्यांची कारकीर्द भरलेली होती. या सर्व गोष्टी त्यांच्या आयुष्यभर सोबतच होत्या.

मे १९९४ मायकल यांनी अमेरिकन गायक-अभिनेता एल्विस प्रेस्लीची गायक व गीतकार मुलगी लीसा मेरी प्रेस्ली यांच्यासोबत विवाह केला; मात्र डिसेंबर १९९५ मध्ये एका वर्षानंतर कौटुंबिक वादामुळे त्यांच्यात घटस्फोट झाला. नंतर त्यांनी १९९६ मध्ये परिचारिका म्हणून काम करत असलेल्या डेबी रोवी यांच्याशी विवाह केला. १९९९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मायकल यांना प्रिन्स ज्यूनियर, प्रिन्स द्वितीय हे दोन मुलगे आणि पॅरिस ही मुलगी आहे.

मायकल जॅक्सन त्यांच्या नवीन कार्यक्रमाच्या तयारीत असताना त्यांना जोरात हृदयविकाराचा झटका आला. वयाच्या ५० व्या वर्षी अमरिकेतील कॅलिफोर्निया येथे हृदयक्रिया बंद पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अतिरिक्त औषधांच्या सेवनामुळेही त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा असे निदान करण्यात आले होते.

मायकल  जॅक्सन यांच्या जीवनावर आधारित विविध चित्रपट आणि माहितीपट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये द विझ (१९७८), मायकल जॅक्सन थ्रिलर (१९८३), मेकिंग ऑफ मायकल (१९८३), मायकल जॅक्सन द लिजेंट (१९८८), कॅप्टन इ ओ (१९८६), मायकल जॅक्सन वन नाईट (१९९५), मायकल जॅक्सन नंबर वन्स (२००३), मिस कास्ट अवे आणि द आयलँड गर्ल्स (२००४), द वन (२००४), मायकल जॅक्सन अनमास्क्ड (२००९), मायकल जॅक्सन दिस इज इट (२००९), मायकल जॅक्सन व्हिजन (२०१०),  बॅड २५ (२०१२), मायकल जॅक्सन द लास्ट फोटो शूट (२०१४) इत्यादींचा समावेश आहे.

१९८९ मध्ये, जॅक्सनच्या ध्वनिफितींची विक्री, शिफारशी आणि मैफलींतून त्यांना मिळणारे वार्षिक मानधन सुमारे १२५ दशलक्ष डॉलर्स होते. ऑगस्ट २०१८  मध्ये फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार त्यांची एकूण कमाई ४.२ अब्ज डॉलर्स झाली होती. २०१६ मध्ये जॅक्सन इस्टेटकडून वार्षिक एकूण कमाईची अंदाजे किंमत ८२५ दशलक्ष डॉलर्स इतकी होती, त्यामुळे २०१९ मध्ये फोर्ब्सने जॅक्सनना २०१२ वगळता प्रत्येक वर्षी “जगातील अव्वल कमाई करणारी मृत कलाकार” म्हणून मान्यता दिली.

संदर्भ :

  • Campbell, Lisa D., Michael Jackson : The King of Pop, Branden,1993.
  • Jackson, Michael, Moonwalk, 1988.
  • Lewis Jones, Jel D., Michael Jackson, the King of Pop : The Big Picture : the Music! the Man! the Legend!, 2005
  • Vogel, Joseph, Man in the Music : The Creative Life and Work of Michael Jackson, New York,2011.

 

समीक्षक : सुधीर पोटे; वर्षा देवरुखकर