क्योकुतेई बाकिन : (४ जुलै १७६७-१ डिसेंबर १८४८). जपानी कादंबरीकार. संपूर्ण नाव ताकिझाबा बाकिन. जन्म एदो (आताचे टोकिओ शहर) येथे सामुराई श्रेणीच्या एका कनिष्ठ सरदार घराण्यात. बाकिन नऊ वर्षांचा असतानाच त्याचे वडील निवर्तले. वयाच्या चवदाव्या वर्षापासून तो स्वत:चा काहीतरी व्यवसाय शोधण्याचा प्रयत्न करू लागला. वैद्यकीत शिरण्याची त्याने धडपड केली पण ती अयशस्वी ठरली. पुढे तो कादंबरीलेखनाकडे वळला. सांता कायोदेन ह्या जपानी कादंबरीकाराचे मार्गदर्शन त्याला लाभले. लवकरच सांता कायोदेनच्या तोडीचा कादंबरीकार असा लौकिक त्याला प्राप्त झाला. ए

चिंझई यूमिहारीझुकी (१८॰५-१॰) आणि नान्सो सातोमी हाक्केनदेन  (१८१४-४१, इं. शी. सातोमी अँड द एट वॉरिअर डॉग्ज) ह्या त्याच्या दोन विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या होत. चिंझेई यूमिहारीझुकी  ही कादंबरी मिनामोतो तामेतोमो नावाच्या एका योद्धयाच्या व्यक्तिरेखेभोवती गुंफण्यात आलेली आहे, तर ‘सातोमी अँड द एट वॉरिअर डॉग्ज’ ही कादंबरी म्हणजे आठ योद्ध्यांची शौर्यगाथा आहे. हे आठ योद्धे म्हणजे परोपकार, न्यायबुद्धी, सौजन्य, प्रज्ञा, श्रद्धा, निष्ठा, आज्ञाधारकपणा आणि भक्तिपरायणता अशा आठ गुणांची प्रतीके होत. बाकिन हा व्यासंगी लेखक होता. व्यासंगाला उत्तम कल्पनाशक्तीची जोड मिळाल्यामुळे ‘सातोमी अँड द एट वॉरिअर डॉगज’ सारख्या भव्य साहित्यकृतींची निर्मिती तो करू शकला. त्याच्या कादंबऱ्यातून त्याच्या स्वच्छंदतावादी वृत्तीचा प्रत्यय येतो. आपल्या लेखनासाठी चिनी-जपानी आख्यायिका. इतिहास आणि लोकविद्या (फोकलोअर) ह्यांचा त्याने उपयोग करून घेतला. त्याची शैली प्रासादिक, डौलदार आणि लयबद्ध आहे. बाकिनने ‘किब्योशी’ आणि ‘योमिहोन’ हे कथात्मक साहित्यप्रकारही हाताळले. त्याने एकूण ३॰ पेक्षा अधिक दीर्घ कादंबऱ्या ह्या कथाप्रकारांत लिहिल्या. किब्योशी म्हणजे तरुणांसाठी लिहिलेल्या खास कथांची चित्रमय पुस्तके. प्रौढांसाठी लिहिल्या जाणाऱ्या कादंबऱ्याना योमिहोन (रीडिंग बुक्स) म्हणतात.

एदो येथे तो निधन पावला.

संदर्भ :

  • Encyclopedia Britannica

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.