महापात्रा, केलुचरण :  (८ जानेवारी १९२६ – ७ एप्रिल २००४). ओडिसी नृत्याचे प्रवर्तक. त्यांचा जन्म रघुराजपूर या छोट्या गावात (जगन्नाथपुरी, जिल्हा ओडिशा) एका पट्ट चित्रकारांच्या घराण्यात झाला. रघुराजपुरमधील चित्रकारांची ही कला आगळी-वेगळी असून या प्रकारच्या चित्रकारीमध्ये तलम कापडावर विविध संस्कार करून त्यावर पारंपरिक धार्मिक चित्रे नैसर्गिक रंगांनी रंगविली जातात. केलुचरण यांचे वडीलही असे चित्रकार आणि मर्दलवादक होते. वयाच्या नवव्या वर्षी गावातील बालचंद्र साहू यांच्या ‘गोटिपुआ आखाड्यात’ त्यांनी प्रवेश मिळविला; तथापि वडिलांनी त्यांना मोहन सुंदरदेव गोस्वामी यांच्या ‘रासलीलां’त घातले. हा समूह गावोगाव दौरा करून नृत्यनाट्याचे कार्यक्रम करीत असे. यातून त्यांची अभिनय, नृत्य व नाट्यतंत्र यांत जडणघडण झाली.

कलाक्षेत्रातील केलुचरण यांचा प्रवास तबला आणि मर्दलच्या शिक्षणाने सुरू झाला. केलुचरण यांच्या अध्ययनाचा १९४६ ते १९५२ हा महत्त्वाचा काळ होता. या काळात त्यांनी कटकच्या प्रसिद्ध अन्नपूर्णा कलासमूहात पंकज चरण आणि दुर्लभ चंदा तसेच गुरू मोहन गोस्वामी यांच्या रासलीला समूहाबरोबर अनेक नाटकांमध्ये कामे केली. दयाल शरण यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. मुद्रांचा अभ्यास झाला. पंकज चरण दास दिग्दर्शित देवी भस्मासुर आणि दशावतार या नृत्यनाटकातील त्यांची नृत्यनाट्ये विशेष गाजली. याचवेळी त्यांची साथीदार नर्तिका लक्ष्मीप्रियाशी ओळख झाली. त्यांनी देवी भस्मासुरमध्ये मोहिनीची भूमिका साकारली होती. लक्ष्मीप्रिया यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. विवाहानंतर उभयता जगन्नाथपुरीला गेले. तिथे त्यांनी ‘महारी’ आणि ‘गोटिपुआ’ या नृत्यप्रकारांवर संशोधन केले. महारी आणि गोटिपुआ या दोन्ही पद्धतींचा सखोल अभ्यास करून महारीतील भक्तिभाव, तर गोटिपुआतील तंत्र या दोन्हींचा समन्वय साधून जणू एक नवीन आकर्षक पद्धती त्यांनी निर्मिली. त्यांच्या या नृत्यप्रकार संशोधनातून उपेन्द्र भांजा हे पहिले ओडिसी नृत्यनाट्य त्यांनी सादर केले. त्यानंतर त्यांना ओडिसी नृत्यगुरू म्हणून मान्यता मिळाली. कोणार्कमधील सुंदर शिल्पे त्यांनी नृत्याद्वारे जिवंत करण्याचा ध्यास घेतला. त्यांचा दृष्टिकोन काव्यात्मक असल्यामुळे आपोआपच नृत्य आणि शिल्प या कलांकडे ते आकर्षित झाले. त्यांनी शिल्पकल्पेतून प्रेरणा घेऊन आपल्या नृत्यामध्ये त्या मुद्रा व हस्तमुद्रा जिवंत करण्याचे प्रयत्न केले. वसंता, शंकराभरणम्, मोहना, सावेरी, अरभी, कल्याणी अशा विविध रागांमधून पल्लवी ही नृत्यरचना त्यांनी डौलदार हालचालींमधून गुंफली, तसेच कवी जयदेव यांच्या गीतगोविंदम् मधील अनेक अष्टपदी त्यांनी अभिनयाद्वारे सादर केल्या. ललित अभिनय रचनांमधून त्यांनी राधा व कृष्ण यांचे नाते लोकांसमोर मांडले.

केलुचरण यांनी ‘कला विकास केंद्र’ या ओडिशातील पहिल्या नृत्य संगीत विद्यालयात १९५३ पासून अध्यापनास सुरुवात केली. सुरुवातीस त्यांनी ओडिसी नृत्यप्रकाराची शास्त्रीय बैठक निश्चित केली. या संस्थेत सु. १५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. तसेच ओडिसी नृत्यशैलीतील अनेक नृत्यनटिका त्यांनी दिग्दर्शित केल्या. उदा. पंचपुष्प, कृष्ण गाथा, गीतगोविंदम्, उर्वशी, सखीगोपाल, कोणार्क मिश्रा इत्यादी. या काळात संयुक्ता पाणीग्रही, कुमकुम मोहंती, प्रियंवदा मोहंती, सोनल मानसिंग, मिनाती मिश्रा, माधवी मुद्गल यांच्यासारखे उत्तम कलाकार त्यांनी घडविले. ओडिसी नृत्यातील २०० हून अधिक एकल नृत्यरचना त्यांच्याच आहेत. केलुचरण यांनी ‘कला विकास केंद्र’ सोडल्यानंतर १९८० पासून भारतभर दौऱ्यास प्रारंभ केला आणि ओडिसीचे शिक्षण दिले. देशातल्या मोठमोठ्या सांस्कृतिक केंद्रांतून त्यांनी या नृत्यप्रकाराची व्यवस्था लावण्याचे मोठे कार्य केले. ते उत्तम तबला व मर्दलवादक तसेच नृत्य-रचनाकार होते. ताल-लयीची अत्यंत विकसित, नाजूक, गुंतागुंतीची व चित्तवेधक विविध रूपे त्यांच्या नृत्यशैलीतून दृग्गोचर होत असत. त्यांनी ‘नृत्य’ ही ओडिसी शैलीचे प्रशिक्षण देणारी संस्था भुवनेश्वरमध्ये स्थापना केली. त्यांचे पुत्र रतीकांत महापात्रा तेथे युवा पिढीला घडविण्याचे कार्य करत आहेत.

केलुचरण यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी काही महत्त्वाचे पुरस्कार पुढीलप्रमाणे : भारत सरकारकडून पद्मश्री (१९७५), पद्मभूषण (१९८२) व पद्मविभूषण  २००० हे सन्मान, मध्य प्रदेश राज्याचा कालिदास सन्मान (१९८७) आणि आसाम राज्याचा शंकरदेव पुरस्कार (२००१) इत्यादी.

केलुचरण यांचे वृद्धापकाळाने भुवनेश्वर येथे निधन झाले.

             समीक्षक : सु. र. देशपांडे