सांकलिया, हसमुख धीरजलाल : (१० डिसेंबर १९०८ – २८ जानेवारी १९८९). आधुनिक भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक आणि पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी. त्यांचे सुरुवातीचे बहुतेक शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी प्रथमश्रेणीत बी.ए. (१९३०) आणि एम. ए. (१९३२) या पदव्या संपादन केल्या. पुढे ते एलएल.बी.झाले. त्यानंतर पुढील  शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. त्यांनी लंडन विद्यापीठामधून ’गुजरातेतील पुरातत्त्व’ या विषयावर डॉक्टरेट पदवी मिळवली (१९३७). ‘प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी, विशेषतः पुराणांचे ऐतिहासिकत्व सिद्ध करण्यासाठी आपण कॉलेजपासूनच प्रेरित झालोʼ, असे सांकलिया यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. त्यासाठी त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. संस्कृतची त्यांची ही पार्श्वभूमी त्यांना प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्व यांच्या सखोल अभ्यासात उपयोगी पडली.

भारतात परतल्यानंतर सांकलियांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम), द एशियाटिक सोसायटी व हेरास इन्स्टिट्यूट येथे काही काळ काम केले. जुन्या डेक्कन कॉलेजचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर सांकलियांची प्राध्यापक या पदावर नेमणूक झाली (१९३९). सांकलियांनी हे पद स्वीकारणे हा क्षण भारतीय पुरातत्त्वाला निर्णायक वळण देणारा ठरला. गेल्या सहा-सात दशकांमध्ये भारतीय पुरातत्त्वाला जो वैज्ञानिक पाया प्राप्त झाला, त्याला सांकलियांचे द्रष्टेपण कारणीभूत ठरले. अनेक प्रलोभने नाकारून सांकलियांनी डेक्कन कॉलेजमध्येच राहून संस्थेची जोपासना करणे, विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणे व संपूर्ण भारतात पुरातत्त्वीय संशोधन करण्याची परंपरा निर्माण करणे या गोष्टींना प्राधान्य दिले. त्यांनी अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या पुरातत्त्वज्ञांनी गेली पन्नास वर्षे भारतीय पुरातत्त्वाच्या क्षेत्रात मोलाची भूमिका बजावलेली आहे. सांकलियांचे विद्यार्थी असलेले ज्येष्ठ पुरातत्त्व-अभ्यासक के. पदय्या यांनी सांकलियांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल पुढील गौरवोद्गार काढले आहेत : “Through his many-sided efforts, he sought to imprint the study of the past onto national consciousness.” यावरून सांकलियांची एकूण जीवनदृष्टी व त्यांची राष्ट्रवादी प्रेरणा समजते.

रॉबर्ट ब्रूस फूट यांच्या लेखनातून धागा निवडून सांकलियांनी साबरमती नदीच्या खोऱ्‍यात मेहसाणा जिल्हयात अनेक पुराश्मयुगीन व मध्याश्मयुगीन स्थळे शोधून काढली आणि गुजरातमधील लांघणज या मध्याश्मयुगीन स्थळाचे उत्खनन केले (१९४०). एखाद्या मध्याश्मयुगीन स्थळाचे हे भारतातील पहिले उत्खनन होते.त्यांनी गोदावरी नदीच्या खोऱ्यात प्रागैतिहासिक सर्वेक्षणाची सुरुवात केली (१९४३-४४). नाशिक जिल्ह्यात गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांमध्ये अनेक प्रागैतिहासिक स्थळे शोधून काढली. १९५२ मध्ये सांकलियांना  नाशिकजवळ गंगापूर येथे बेसाल्टचा वापर करून तयार केलेली अनेक प्रकारची पुराश्मयुगीन अवजारे मिळाली. सांकलियांनी प्रवरा नदीच्या खोऱ्यात सर्वेक्षणाचे काम हाती घेतले (१९५४-५५). तेथे त्यांना  पुराश्मयुगीन सांस्कृतिक कालखंडातील अवजारांचे तीन संच स्तरनिबद्ध (stratified context) प्रकारे मिळाले. त्या शोधामुळे बेसाल्ट उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी प्रागैतिहासिक मानवी वसाहतींचे पुरावे मिळणार नाहीत, हे रॉबर्ट ब्रूस फूट यांचे मत योग्य नसल्याचे सिद्ध झाले. या संशोधनाचा परिणाम म्हणून पूर्वी प्रागैतिहासिक अवशेष मिळणार नाहीत अशी समजूत असणाऱ्या अनेक भागांत प्रागैतिहासिक संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली.

प्रागैतिहासिक स्थळांचे सर्वेक्षण व संशोधन करत असतानाच सांकलियांचे लक्ष इतर सांस्कृतिक अवशेषांकडे होतेच. सांकलियांनी संशोधनाला प्रारंभ केला तेव्हा प्रागैतिहासिक व ऐतिहासिक कालखंडांमध्ये मोठी पोकळी होती. तत्कालीन भारताच्या वायव्य भागात सिंधू संस्कृतीच्या स्थळांचा शेाध लागल्याने काही प्रमाणात ही पोकळी कमी झाली होती. तसेच दक्षिण भारतात अनेक ठिकाणी नवाश्मयुगीन कुऱ्हाडी (celts) मिळाल्या होत्या; तथापि प्रागैतिहासिक काळ व गंगा-यमुना खोऱ्यातील चित्रित मृद्भांडी वापरणाऱ्या ग्रामीण संस्कृतींच्या काळादरम्यान काय घडले, हे जाणून घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज होती. सांकलियांनी या संदर्भात मोलाची भूमिका बजावली.

सांकलियांनी प्रवरा नदीच्या काठावरील जोर्वे येथे सर्वप्रथम ताम्रपाषाणयुगीन स्थळाचे उत्खनन केले (१९५०-५१). या ठिकाणी चाकावर घडवलेली व पक्की भाजलेली लाल रंगाची चित्रित मृद्भांडी मिळाली. यानंतर त्यांनी मध्य प्रदेशातील महेश्वरनावडातोली या नर्मदा नदीच्या दोन्ही काठांवरील स्थळांचे उत्खनन केले (१९५३–५९). त्या काळात नावडातोली हे आडव्या पद्धतीने उत्खनन (horizontal excavation) झालेले भारतातील सर्वांत मोठे पुरातत्त्वीय स्थळ होते. या उत्खननातून ताम्रपाषाणयुगीन खेडेगावाचा विस्तृत आराखडा हाती आला व लोकजीवनाची माहिती मिळाली. पुढे त्यांनी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे या ठिकाणी उत्खनन केले (१९५४-५६; १९५९–६१). या उत्खननामध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच नव्हे, तर प्रागैतिहासिक काळापासून ते मराठा कालखंडापर्यंतचा सलग पुरावा हाती आला.त्यानंतर त्यांनी राजस्थानातील आहाड या ताम्रपाषाणयुगीन स्थळाचे उत्खनन केले (१९६१-६२). या उत्खननाने ताम्रपाषाणयुगातील आहाड संस्कृतीच्या अभ्यासाचे नवे दालन उघडले गेले. महाराष्ट्रातील घोड नदीच्या काठावरील इनामगाव हे सांकलियांनी उत्खनन केलेले अखेरचे ताम्रपाषाणयुगीन स्थळ होय. सलग बारा वर्षे उत्खनन झालेले हे ताम्रपाषाणयुगीन स्थळ भारतीय पुरातत्त्वाच्या इतिहासातला एक मैलाचा दगड मानले जाते.

सांकलियांना प्रागैतिहासिक व इतिहासपूर्व काळात जरी मुख्य रस होता, तरी त्यांनी कोल्हापूर (१९४५-४६), नाशिक (१९५०-५१), त्रिपुरी (१९६६) येथील अनेक ऐतिहासिक स्थळांचे उत्खनन केले. ऐतिहासिक (पुराणांमधील) माहितीचा वापर करून काही पुरातत्त्वीय पुरावे मिळतात का, हे त्यांना पाहायचे होते.

पुरातत्त्वीय पुराव्यांचा अर्थ लावून प्राचीन मानवी व्यवहार व वर्तन यांच्यासंबंधी अनुमाने काढण्यासाठी विविध वैज्ञानिकांची मदत आवश्यक असते, हे सांकलिया जाणून होते.प्राचीन काळातील पर्यावरण, उदरनिर्वाहसाधने, कालमापन व स्तरचरनेचे विश्लेषण यांसाठी निरनिराळ्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर करावा लागतो. म्हणूनच लांघणज येथील उत्खननापासूनच सांकलियांनी वा.वा. केळकर, कुरुलकर, जे.सी. जॉर्ज, डी.आर. शाह, ज्युलिएट क्लटन-ब्रुक, केनेथ केनेडी व विष्णू-मित्रे अशा तज्ज्ञ वैज्ञानिकांचे वेळोवेळी सहकार्य घेतले. सांकलियांच्या दूरदृष्टीतूनच पुढील काळात डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्वीय विज्ञानाच्या विविध शाखांच्या संशोधन प्रयोगशाळा निर्माण झाल्या.

पुरातत्त्वीय पुरावे व लिखित साधने एकत्रितपणाने वापरली पाहिजेत, असा सांकलियांचा आग्रह होता. वैयक्तिक जीवनात धार्मिक असूनही त्यांनी लिखित साधनांमध्ये ऐतिहासिक सत्य असतेच, असे आंधळेपणाने कधीच मानले नाही. त्यांनी लिखित साधनांमधील सत्य शोधण्यासाठी व नंतरच्या काळात घुसलेले भाग (interpolation) ओळखण्यासाठी रामायणाचे सखोल संशोधन केले. रामायणाच्या लिखित संहितेमधील अंतर्गत पुरावे व पुरातत्त्वीय पुरावे यांची सांगड घालून त्यांनी रामायणाच्या रचनेचा काळ निश्चित केला. तो इसवी सनाच्या तिसऱ्‍या शतकापूर्वी फार मागचा नसावा, असे अनुमान त्यांनी काढले. रामायणात उल्लेख असणारी लंका ही आजचा श्रीलंका देश नसून ती मध्य भारतात एका छोट्या बेटावर होती, असे त्यांनी प्रतिपादन केले. सांकलियांच्या या मताला असणाऱ्या पुराव्यांचा विचार न करता अनेकांनी या मताला विरोध केला, तर काहींनी वृत्तपत्रीय लेखनातून सांकलियांची चेष्टाही केली; तथापि आजही त्यांच्या या संशोधनातील अनेक मुद्दे खोडून काढता येत नाहीत.

सांकलियांचे लेखन विपुल आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती आदी भाषांतील ३५ ग्रंथ, विविध सर्वेक्षण व उत्खननवृत्तांत, संशोधनपर नियतकालिकांमधील शोधनिबंध, वृत्तपत्रीय लेख यांचा समावेश होतो. पुरातत्त्वीय संशोधनातून मिळालेले ज्ञान सर्वसामान्यांना कळेल अशा प्रकारे मांडणे, ही संशोधकांचीच जबाबदारी आहे, असे ते मानत. बॉर्न फॉर आर्किऑलॉजी : ॲन ऑटोबायोग्रफी हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

पुणे येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  •       Misra, V. N.  ‘Hasmuskh Dhirajlal Sankalia (1908-1989): Scholar and Manʼ, Man and Environment XIV (2): 1-20, 1989.
  •       Paddayya, K. ‘Hasmuskh D. Sankaliaʼ,  The Encycleopedia of Archaeology, Santa Barbara, 1999.
  •       Paddayya, K., Joglekar, P. P., Basa, K. K. and Sawant, R. Eds. ‘Recent Research Trends in South Asian Archaeologyʼ, Proceedings of Birth Centenary Seminar, Deccan College, Pune, 2009.
  •       Sankalia, H. D. Prehistory and Protohistory of India and Pakistan, Mumbai, 1963.
  •       Sankalia, H. D. Ramayana Myth or Reality? New Delhi, 1973.
  •       Sankalia, H. D. Born for Archaeology, New Delhi, 1978.

समीक्षक – शरद राजगुरू