सिद्धसिद्धान्तपद्धति हा गोरक्षनाथांनी रचलेला ग्रंथ नाथयोगाच्या परंपरेत महत्त्वाचा मानला जातो. नाथयोगाचे तत्त्वज्ञान, परमात्म्याचे स्वरूप, विश्वोत्पत्तीचा सिद्धांत, अवधूत योग्याची लक्षणे इत्यादी या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. गद्य आणि पद्य अशा दोन्ही स्वरूपातील या ग्रंथामध्ये एकंदरीत ६ उपदेश म्हणजे अध्याय असून ३५० श्लोक व काही सूत्रे आहेत. पिंडोत्पत्ती, पिंडविचार, पिंडसंवित्ति, पिंडाधार, पिंडपदसमरसभाव, श्रीनित्यपिंडावधूत ही या अध्यायांची नावे आहेत.
पहिल्या उपदेशामध्ये असे सांगितले आहे की, सृष्टीच्या आरंभी केवळ अनादि, अनंत, अव्यक्त, अनाम असे ब्रह्म अस्तित्वात होते. त्याच्या शक्तीला इच्छाशक्ती वा निजा (स्वत:ची) शक्ती असे म्हणतात. त्या निजा शक्तीमधून क्रमाक्रमाने परा, अपरा, सूक्ष्मा आणि कुंडलिनी शक्ती उत्पन्न झाल्या. ह्या आविष्कारांच्या माध्यमातून पुढे परपिंडाची म्हणजेच शिवतत्त्वाची उत्पत्ती झाली. त्याची भैरव, श्रीकण्ठ, सदाशिव, ईश्वर, रुद्र, विष्णु आणि ब्रह्मा अशी रूपे आहेत. शिवरूपी आद्य पिंडापासून शिवाची शक्ती व्यक्त होता होता महाकाश, महाकाशापासून महावायू, महावायूपासून महातेज, महातेजापासून महासलिल, महासलिलापासून महापृथ्वी अशी उत्क्रांती झाली आहे. ही सृष्टी म्हणजे शिवाचे वैश्विक रूप होय. ह्या ब्रह्माच्या इच्छाशक्तीतून नरनारीरूप प्रकृतिपिंड उत्पन्न झाला. त्यानंतर मन, बुद्धी, अहंकार, चित्त, चैतन्य हे अंत:करणाचे गुण निर्माण झाले. जिवाची उत्पत्ती वर्णन करताना त्या अनुषंगाने शरीरातील दहा नाड्या व त्यांची स्थाने, दहा प्रकारचे वायू, त्यांची स्थाने व कार्य यांचे वर्णन आलेले आहे. गर्भाच्या नऊ महिन्यातील निरनिराळ्या अवस्था व त्याची वाढ ह्याविषयी माहिती दिलेली असून नवव्या महिन्यात गर्भ सत्यज्ञान प्राप्त करतो, परंतु जन्माचे वेळी मात्र योनिस्पर्शामुळे त्याचे हे ज्ञान लोप पावते, असे म्हटलेले आहे (१.६८).
दुसऱ्या उपदेशात मानवी देहातील नऊ चक्रे, ध्यानासाठी शरीरातील सोळा प्रकारची ठिकाणे म्हणजे आधार, अंतर्लक्ष्य, बहिर्लक्ष्य व मध्यलक्ष्य अशी तीन प्रकारची ध्यानाची लक्ष्ये, ध्यानासाठी ज्यावर मन एकाग्र करायचे ते पाच प्रकारचे आकाश (व्योमपंचक) अर्थात् आकाश, पराकाश, महाकाश, तत्त्वाकाश, सूर्याकाश याविषयी सांगितले आहे. त्यानंतर योगाची आठ अंगे व त्यांच्या व्याख्या सांगितल्या आहेत.
तिसरा उपदेश पिंडसंवित्ति म्हणजेच शरीराचे सूक्ष्म व सत्य स्वरूप जाणणे ह्याविषयी आहे. नाथपंथीय सिद्धांतानुसार जे काही ब्रह्मांडात अस्तित्वात आहे ते सर्व पिंडामध्ये सूक्ष्म रूपात अस्तित्वात असते. त्यात सप्त-पाताळांसहित एकवीस ब्रह्मांडस्थानांचा विचार केलेला असून सात खंड, सात सागर, नद्या, कुलपर्वत, झाडे-झुडुपे, वेली इत्यादी; तसेच ग्रह, नक्षत्र, तारे इत्यादी; एवढेच नव्हे तर यक्ष, सिद्ध, किन्नर, अप्सरा, राक्षस इत्यादी सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. शरीरात विष्णुलोक, शिवलोक इत्यादी कोणकोणत्या अवयवांत आहेत ते स्पष्ट केले आहे. शेवटच्या सूत्रात म्हटले आहे की, सुख म्हणजेच स्वर्ग, दु:ख हाच नरक, कर्म हेच बंधन, निर्विकल्पता हीच मुक्ती आणि आत्मानुभूती हीच शांती असून विश्वरूप परमात्मा सर्व पिंडांच्या ठायी अभिन्नपणे शुद्ध चैतन्यरूपाने राहतो (३.१४).
चौथा उपदेश सर्वव्यापी शक्तीच्या स्वरूपाचे वर्णन करतो. शक्ती ही कुल (व्यक्त व कार्यरूप) आणि अकुल (अव्यक्त व कारणरूप) अशा दोन्ही स्वरूपात असते. तीच आधारशक्ती होय. तिचे अव्यक्त रूप म्हणजे शिवस्वरूप होय तर व्यक्त स्वरूपात ती परा, सत्ता, अहंता, स्फुरता आणि कला अशा पाच प्रकारची असते. या पाच प्रकारांच्या समूहाला कुल अशी संज्ञा आहे. परा म्हणजे स्वत: प्रकाशमय असलेली व इतरांना प्रकाशित करणारी शक्ती. सत्ता म्हणजे शक्ती ही अनादि, स्वयंपूर्ण, श्रेष्ठ, अद्वैत आणि अविभाज्य आहे हे जाणणे. अहंता म्हणजे ‘मी अनादि आणि अंतरहित आहे, मी आनंद आहे’ हे जाणणे. स्फुरता म्हणजे चित्ताच्या पातळीवर समाधी अवस्था कायम राहणे. कला म्हणजे शुद्धी, प्रज्ञा आणि स्वत:ला प्रकाशित करण्याची शक्ती. ह्या सर्वांचे इथे सविस्तर वर्णन केलेले आहे. शक्तीविना शिव सृष्टी निर्माण करण्यासाठी पूर्णपणे असमर्थ असतो. चंद्र आणि चंद्रिका (चंद्राचा प्रकाश) यांच्यात ज्याप्रमाणे भेद नसतो त्याचप्रमाणे शिव व शक्ती दोन्ही अभेद्य होत (४.२६). सृष्टीचे कारण असलेली शक्ती हीच कुंडलिनी होय. ती परा-अपरा म्हणजेच चेतन व जड ह्या दोन्ही रूपात असते. तिच्या जागृत व सुप्त अशा दोन अवस्था असून सुप्त कुंडलिनी ही प्रत्येक पिंडात असते. ती जागृत करून ऊर्ध्वगामी करणे हे योग्याचे ध्येय असते.
पाचव्या उपदेशात परमपदाची प्राप्ती करून देणारी योगपद्धती, गुरूचे सर्वोच्च स्थान, त्याची लक्षणे, उच्च आध्यात्मिक पातळीवर येणारे वैश्विक द्वैत आणि अद्वैत या दोहोंचे अनुभव, त्यातून उमजणारे जीवाचे/पिंडाचे शिवाशी म्हणजे परमपदाशी असलेले एकरूपत्त्व ह्याविषयीचे वर्णन आढळते. परमपदाचे ज्ञान केवळ अनुभूतीने होते. असे अद्वैत साधणे हीच पिंडसिद्धी होय ज्यायोगे वार्धक्य व मृत्यूवर विजय मिळवता येतो व सर्व प्रकारच्या सिद्धी (स्वास्थ्य, लोकप्रियता, सर्व भाषांवर प्रभुत्व, दिव्यदेहप्राप्ती, भूक-तहान यावर नियंत्रण, परकायाप्रवेश इत्यादी) क्रमाने प्राप्त होतात. योग्याचे बाह्य रूप जसे त्याने परिधान करण्याची वस्त्रे, जटा, शंख, कुंडले, कपाळावरील त्रिपुंड, छत्री, कमंडलु तसेच संध्या, जप, ध्यान, आचरण इत्यादी बाबींचे देखील वर्णन या उपदेशात आढळते. योगमार्गाखेरीज अन्य कोणताही श्रेष्ठ मार्ग श्रुति, स्मृति वा इतर शास्त्रांमध्ये नाही असे शिवाने पूर्वीच सांगितलेले आहे असे यात म्हटलेले आहे (५.२१).
सहाव्या उपदेशात अवधूत योग्याची लक्षणे व त्याच्याशी संबंधित इतर बाबींचा समावेश आहे. अवधूत योगी तो होय ज्याने लौकिक विषयांप्रति असलेले मनाचे आकर्षण झटकून टाकून, मन निरासक्त करून ते परमपद प्राप्तीच्या दिशेने वळवलेले असते. अवधूत योग्याची इतर लक्षणे, त्याचे आचरण, चार आश्रम व त्यांचे महत्त्व, एकदंडी व त्रिदंडी संन्यासी इत्यादींचे वर्णनही या उपदेशात येते. याखेरीज अनेक महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना जसे शुद्धशैव, तापस, पाशुपत, कालामुख, वीरशैव, कापालिक, महाव्रत, शाक्त, वैष्णव, कौलज्ञान, पांचरात्र इत्यादी स्पष्ट केल्या आहेत. तांत्रिक वामाचारातील पाच ‘म’कारांचे नाथपंथात अभिप्रेत असलेले गर्भित अर्थ दिलेले आहेत (६.५०). या संप्रदायात पाच मकारांचा संपूर्णपणे निराळा अर्थ दिला आहे. त्यानुसार मद्य म्हणजे मद, मांस म्हणजे मन, मीन म्हणजे माया, मुद्रा म्हणजे मति व मैथुन म्हणजे मूढता. साधनेदरम्यान अवधूत योगी वेगवेगळ्या संप्रदायांतील चांगल्या सिद्धांतांचे परस्परपूरक असे संतुलन घडवून आणतो आणि त्यामुळेच तो एक उत्तम व परिपूर्ण गुरुदेखील होतो असे म्हटलेले आहे. मात्र त्याचबरोबर विरोधी विचारप्रवाहांचे, वेदांतादी तत्त्वज्ञानाचे जोरदार खंडन देखील गोरक्षनाथांनी ह्या उपदेशात केलेले आहे (६.७६-७७). ग्रंथाच्या शेवटी जीवन साफल्यासाठी गणपतीची प्रार्थना आलेली आहे.
संदर्भ :
- Gharote M. L. & Pai G. K., सिद्धसिद्धान्तपद्धति: The Lonavla Yoga Institute, Lonavla, 2016.
समीक्षक : कला आचार्य