महाभारताच्या शांतिपर्वाच्या मोक्षधर्मपर्वात भीष्म व युधिष्ठिर ह्या दोघांमधला सांख्य व योग ह्या विषयांवरील संवाद आलेला आहे. हीच सांख्ययोगगीता होय. सांख्य व योग ह्या दोहोंमधला भेद हा या संवादाचा विषय आहे. सांख्यमताला मोक्षदर्शन असे म्हणतात. दोहोंमधील भेद विशद करताना भीष्म युधिष्ठिराला असे सांगतात की, योगमत ईश्वराच्या सत्तेचा स्वीकार करते. सांख्यमत विरक्ती हे मुक्तीचे कारण आहे असे मानते. योगामध्ये प्रत्यय (अनुभव) महत्त्वाचा मानला जातो, तर सांख्यात शास्त्र प्रमाण मानले जाते. योगमार्गामध्ये ध्यान, धारणा इत्यादी मार्गांनी साध्य गोष्टी प्रत्यक्ष अनुभवाला येतात. सांख्य मात्र प्रत्यक्ष अनुभव आणून देऊ शकत नाही. सांख्यमत व योगमत ही दोन्ही मते तात्त्विकदृष्ट्या योग्यच होत. शुचिता, तप, भूतदया हे गुण त्याचप्रमाणे अहिंसा, सत्य, अस्तेय इत्यादी व्रतांचे पालन दोन्ही दर्शनांनासारखेच मान्य आहे. योगबल प्राप्त केलेले साधक राग, मोह, स्नेह, काम, क्रोध या पाच दोषांचा उच्छेद केल्यावर परमपदी पोहोचतात. मात्र, दुर्बल प्राणी जसे जाळ्यात अडकून फसतात व नाश पावतात तसे योगबळ नसलेले लोकलोभ आणि कर्मापासून निर्माण झालेल्या पाशांमध्ये अडकून नाश पावतात. आत्मसमाधीसाठी चित्ताच्या एकाग्रतेचे महत्त्व विशद केले आहे. योगसाधनेच्या मार्गात जो साधक नाभी, कंठ, मस्तक, हृदय, वक्षस्थळ, दोन्ही कुशी, नेत्र, कर्ण व घ्राणेन्द्रिय (नाक) ह्या ठिकाणी संचार करणाऱ्या वायूचा निरोध करतो आणि अहिंसादिक व्रतांचे पालन करतो त्याची सर्व शुभाशुभ कर्मे भस्मसात होतात आणि त्याला मुक्ति प्राप्त होते.

साधकाचा आहार-विहार आणि त्याचे परिणाम याचे वर्णन या गीतेमध्ये केले आहे. विषयांप्रति अनासक्ती आणि प्रणवजप यांच्या साहाय्याने आत्मतेजाची ज्योत साधकाच्या ठिकाणी प्रगट होते.

योगमार्गावरील वाटचाल वस्तऱ्याच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण आहे. ज्याचे चित्त शुद्ध नाही त्याच्यासाठी योगधारणा अत्यंत कठीण आहे. योगसिद्ध महात्म्याला मात्र अनेक सिद्धी प्राप्त होतात. तो नारायणस्वरूप होतो.

सांख्यदर्शन हे अनेक गुणांनी युक्त असून पूर्णपणे दोषरहित आहे असे भीष्म म्हणतात. कपिल महर्षि या दर्शनाचे प्रणेते होत. अखिल विश्वातील सर्व विषयांचे अर्थात निरनिराळ्या योनी; आयुष्याची कालमर्यादा; सुख-दु:ख; स्वर्ग-नरकाचे गुण-दोष; वेदवाद, सांख्यवाद, योगवाद वा ज्ञानवाद यांचे गुण-दोष ह्या सर्वांचे यथायोग्य ज्ञान मोक्षासाठी आवश्यक आहे. सत्त्व, रजस्, तमस् हे तीन गुण, बुद्धी, मन व आकाश ह्यांच्या गुणांचे ज्ञान आणि प्राकृत प्रलय व आत्मप्राप्तीच्या मार्गांचे ज्ञान ग्रंथांवरून प्राप्त होते.

सर्व सांख्यतत्त्वांचा परस्पर संबंध आणि त्यांची परस्पर अधीनता आणि मोक्षाची स्वयंसिद्धता यांचे वर्णन या गीतेमध्ये आले आहे. प्राण, अपान, व्यान, उदान व समान ह्या पाच प्रकारच्या प्राणांखेरीज अधोगामी व ऊर्ध्वगामी असे दोन प्रकारचे वायू सांगितले असून ह्या प्रत्येकाचे पुन्हा सात प्रकार मिळून एकूण ४९ वायू सांगितले आहेत.

भीष्म काळाच्या महिम्यामुळे वाट्याला येणारे निरनिराळे भोग, पुन:पुन्हा वाट्याला येणारा गर्भवास त्याचप्रमाणे जीवनातील सर्वप्रकारच्या अशुभ आणि क्लेशकारक दुर्गतींचे वर्णन करतात. ह्या सगळ्याचे ज्ञान प्राप्त करून त्याचप्रमाणे सृष्टीतील तसेच जीवनातील सर्वच प्रकारच्या ऱ्हास आणि वृद्धीचा सांगोपांग अभ्यास करून साधकाने आपल्या कर्तव्याचा विचार करावा.

देहाच्या दोषांचे आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याच्या निरनिराळ्या उपायांचे विवेचन प्रस्तुत गीतेत आले आहे. काम, क्रोध, भय, निद्रा आणि श्वास हे देहधारींच्या ठायी असणारे पाच दोष असून त्यांवर अनुक्रमे संकल्प-त्याग, क्षमा, प्रमाद-त्याग, सत्त्वगुणाचे सेवन व अल्पाहार ह्यायोगे विजय प्राप्त करता येतो. सांख्यज्ञानी संसारातील गुण-दोषांचे, नश्वरतेचे मायायुक्त असे क्षणभंगुर रूप यथार्थ जाणून ज्ञानरूपी शस्त्राच्या, तपरूपी दंडाच्या साहाय्याने देहाश्रित भोगांची आसक्ती समूळ नष्ट करतात.

भीष्म संसाररूपी सागराचे सविस्तर वर्णन करतात. प्रज्ञारूपी नौकेच्या सहाय्याने सिद्ध यति (सांख्ययोगी) हा दुस्तर सागर यशस्वीपणे पार करतात आणि आकाशस्वरूप निर्मल परब्रह्म प्राप्त करतात. परमात्मप्राप्ती झालेले निर्मल योगी अमृतभावसंपन्न होतात, पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाहीत. ह्यावर युधिष्ठिराला एक अतिशय गहन आणि समर्पक प्रश्न पडतो तो हा की, मोक्ष अवस्थेत योग्यांना जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या आयुष्यात प्राप्त केलेल्या विशेष ज्ञानाची स्मृती राहते किंवा नाही? तो म्हणतो, ‘ज्ञानाची स्मृती राहत असल्यास त्या मोक्षावस्थेला अर्थ नाही, त्यापेक्षा प्रवृत्तिरूप धर्म श्रेष्ठ मानावा आणि ती स्मृती राहत नसल्यास ज्ञानशून्य अवस्थेला ज्ञान म्हणण्याचा प्रसंग येईल.’ ह्यावर भीष्म सांगतात की, ‘मनुष्याला आपल्या इंद्रियांच्यायोगे ज्ञान प्राप्त होते आणि मुक्तावस्थेत इंद्रिय-मनाचा संबंध संपुष्टात आल्यामुळे ते इंद्रियजनित विशेष ज्ञान नष्ट होते’. पुण्य-पापरहित असा सांख्ययोगी मुक्त होऊन निर्गुण निराकार अशा नारायणस्वरूप परमात्म्यामध्ये विलीन होतो, पुन्हा जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकत नाही. जीवन्मुक्त मात्र मन आणि इंद्रियांसहित असलेले हे शरीर प्रारब्धवश धारण करून राहतात आणि ज्ञानमार्गाच्या योगे अल्पावधीतच परम शांती प्राप्त करतात.

पातंजल योगानुसार मुक्तीमध्ये जीवात्म्याचा परमात्म्यामध्ये लय होत नाही. तर आत्मा म्हणजे पुरुष हा मुक्तीमध्ये स्वरूपात स्थित असतो. सांख्ययोगगीतेत या  मुद्द्याविषयी निराळे मत आढळते. त्यात वेदांताचा प्रभाव जाणवतो. या गीतेमध्ये मायेचाही निर्देश आहे. पातंजल योग मात्र माया मानत नाही.

संदर्भ :

  • महाभारत-संहिता, तृतीय खंड (अध्याय २:८९-९०), भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे, १८९६.

समीक्षक : कला आचार्य