पोलिओ अथवा बालपक्षाघात हा एक लहान मुलांना विषाणू संसर्गामुळे होणारा रोग आहे. याला वारे जाणे असेही म्हणतात. वारे गेलेला पाय किंवा हात काही दिवसांनी बारीक झालेला दिसतो तसेच त्या भागाची वाढ शरीराच्या इतर भागांच्या मानाने खुंटते. स्नायू कमकुवत होतात व त्यामुळे हालचालीस मर्यादा येतात.
संशोधनात्मक पार्श्वभूमी : हजारो वर्षे हा विषाणू सक्रिय परंतु स्थिर अवस्थेत होता. १८८० नंतर पोलिओच्या साथीचे मोठे व वारंवार अनेक प्रसंग होऊ लागले. त्यामुळे हजारो मुले व व्यक्ती अपंग झाल्या. म्हणूनच पोलिओवर लस शोधण्याची स्पर्धा संशोधकांत सुरू झाली.
सर्वप्रथम १९४७ मध्ये जॉन हॉपकिन्स पोलिओ रिसर्च सेंटरमध्ये डॉ. बोडियन (Dr. Bodian) व डॉ. हॉवर्ड हॅव (Dr. Howard Howe) यांनी एक परिणामकारक रक्तद्रव्य (Serum) शोधून काढले. हॉवर्डमधील डॉ. जॉन एफ. एंडर्स (Dr. John F. Enders) आणि त्यांचे सहकारी यांनी असा शोध लावला की, रक्तद्रव्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या पोलिओच्या पेशी माकडाच्या मूत्रपिंडावर वाढू शकतात. पिट्सबर्ग विद्यापीठाच्या व्हायरस रिसर्च लॅबोरेटरी येथे डॉ. जोनस सॉल्क (Dr. Jonas Salk) यांनी १९५२ मध्ये रक्तद्रव्य तयार केले.
लसीचा प्रकार : पोलिओचे जंतू शेकडो प्रकारचे असून त्यांचे वाइल्ड पोलिओव्हायरस टाइप-१, २ व ३ (Wild poliovirus type, WPV-1, 2, 3) अशा तीन प्रमुख गटांत वर्गीकरण केले आहे.
(१) सॉल्क लस : ही लस अंत:क्षेपणाद्वारे (Injection) दिली जाते. ही निष्क्रिय (Inactivated) प्रकारची लस आहे. यात पोलिओचे विषाणू हे निष्प्रभ केलेले असतात.
परिणामकारकता : जवळपास ९०% वा त्याहून अधिक व्यक्तींना तीनही प्रकारच्या पोलिओच्या विषाणूंचा प्रतिबंध दोन मात्रा (Dose) दिल्यानंतर होतो आणि ९९% प्रतिकारशक्ती त्या व्यक्तीमध्ये तीन मात्रा दिल्यानंतर येते. ही प्रतिकारशक्ती अनेक वर्षे टिकते. सामान्यत: ही लस घटसर्प (Diphtheria), धनुर्वात (Tetanus), डांग्या खोकला (Pertussis) व हिपॅटिटिस अथवा इन्फ्ल्यूएंझा लसीसोबत दिली जाते.
(२) साबिन लस : डॉ.आल्बर्ट साबिन (Dr. Albert Sabin) यांनी १९६१ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठात क्षीणशक्तिकारक (Attenuated) प्रकारची लस तयार केली. यात तिन्ही प्रकारचे अपंग व अशक्त विषाणू होते. ही मुखीय लस तोंडावाटे दोन थेंब देण्यात येते. साबिन लस ही तुलनात्मक दृष्ट्या देणे जास्त सुलभ असल्याने हिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
परिणामकारकता : साबिन लसीची प्रतिकारशक्ती सॉल्क लसीपेक्षा जास्त असते. या लसीने ह्युमोरल व पेशीय प्रतिकारशक्ती येते. तोंडाद्वारे देणाऱ्या या लसीमध्ये साबिन -१, २ व ३ हे विषाणू १०:१:६ प्रमाणात असतात.
साठवण : पोलिओ लस ही २० — ८० से. या तापमानात आपण ६ महिन्यांपर्यंत साठवून ठेवू शकतो. यापेक्षा जास्त तापमानात लसीची परिणामकारकता नष्ट होते.
दुष्परिणाम : अंत:क्षेपणाद्वारे देण्यात येणाऱ्या सॉल्क लसीचे काही सहपरिणाम दिसून येतात.
- अंत:क्षेपण दिलेल्या जागी थोडे दुखणे, लालसरपणा येणे.
- सौम्य स्वरूपाचा ताप येणे.
- दहा लाख मुलांपैकी एखाद्याला या लसीची अधिहर्षता (Allergy) येऊ शकते. त्याची लक्षणे पुढीलप्रमाणे : खाज सुटणे, घसा सुजणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नाडी मंदावणे, चेहरा सुजणे, उलट्या होणे, चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे, त्वचा निळसर पडणे.
मर्यादा : ही लस अत्यंत सुरक्षित व परिणामकारक लस आहे. दहा लाख मुलांमध्ये केवळ २-३ मुलांमध्ये लसीची प्रतिक्रिया उलटून मुलांना पक्षाघात होऊ शकतो.
लसीकरण वेळापत्रक : सॉल्क लस ही निष्क्रिय प्रकारातील लस अंत:क्षेपित करण्यात येते (Inactivated Polio Vaccine, IPV) तर साबिन लस ही मुखीय प्रकारातील लस तोंडावाटे देण्यात येते (Oral Poliovirus Vaccine, OPV).
लसीकरण कालावधी | लसीकरण स्वरूप |
जन्मत: | मुखीय लस |
६ आठवडे | अंत:क्षेपित लस |
१० आठवडे | अंत:क्षेपित लस |
१४ आठवडे | अंत:क्षेपित लस |
६ महिने | मुखीय लस |
९ महिने | मुखीय लस |
१ वर्ष | अंत:क्षेपित लस |
५ वर्षांपर्यंतच्या बालकांना सरकारी धोरणांनुसार मुखीय लस (OPV) देण्यात येते.
जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ आणि रोटरी इंटरनॅशनल यांच्या पोलिओ निर्मूलन प्रकल्पांमुळे जगातून पोलिओचे उच्चाटन करण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत.
पहा : बालपक्षाघात (पोलिओ); साबिन, आल्बर्ट ब्रूस; सॉल्क, जोनास एडवर्ड.