किसन महाराज साखरे : (१९३८). वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार, संत वाङ्मयाचे प्रवाचक,अभ्यासक,तत्त्वचिंतक म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील पान चिंचोली येथे झाला. त्यांचे वडील परमगुरू दादा महाराज साखरे,आजोबा नाना महाराज साखरे हे संत साहित्याचे अभ्यासक होते. वेद, उपनिषदे, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, सकल संतगाथेचे अध्ययन आणि अध्यापन साखरे घराण्यात सुरू होते त्यामुळे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता बालवयात किसन महाराजांना संत साहित्याच्या अध्ययन, अध्यापनाचे संस्कार लाभले. नाना महाराज साखरे यांनी ज्ञानेश्वरीचे आणि अन्य संत वाड्मयाचे संपादन केले.
अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांचे चिंतन ही किसन महाराजांची केवळ जीवननिष्ठा नव्हे तर परमश्रध्दा बनली. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र आळंदी येथील साधकाश्रमात गुरू – शिष्य परंपरेचा अंगीकार करून किसन महाराज यांनी संत साहित्य, तत्त्वज्ञान, व्याकरणशास्त्र याचे अध्ययन केले. प्रख्यात तत्त्वज्ञ एन. पी. मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे शिक्षण घेतले. १९६० साली साधकाश्रमाची धुरा किसन महाराजांच्या हाती आली. तेव्हापासून निस्वार्थीपणे कुठल्याही जातीपातींचा अडसर न ठेवता साधकाश्रमात ज्ञानार्जनासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना किसन महाराजांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले. कीर्तन, प्रवचनाद्वारे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून त्यांनी आध्यात्मिक उद्बबोधन अनेक वर्षे घडविले. कीर्तन, प्रवचन करणारे शेकड्यावर विद्यार्थी त्यांनी घडविले. मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणालीचा ध्यास किसन महाराजांनी घेतलेला असल्याने मोफत बाल संस्कार शिबिरांची संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष यशस्वीरित्या राबविली. बाल संस्कार शिबिरातून चांगले नागरिक घडविण्याचा संकल्प त्यांनी कृतीत उतरविला. गेली ५० वर्षे प्रती वर्षी मे महिन्यात बाल संस्कार शिबिराचा उपक्रम ते राबवितात. श्रीमद्दभगवतगीता आणि ज्ञानेश्वरीच्या प्रचार, प्रसारासाठी किसन महाराजांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वाराणसी, वृंदावन, रामेश्वर आदी ठिकाणी गीता ज्ञानेश्वरी ज्ञानयज्ञाचे आयोजन अनेकवेळा केले. संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या प्रचार, प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञान अतिशय गरजेचे आहे हे लक्षात घेऊन किसन महाराजांनी सी.डी. ए.सी. म्हणजे प्रगत संगणक अध्ययन केंद्र (भारत सरकारचा उपक्रम) याद्वारे अध्यापनास प्रारंभ केला. अनेक पदवीधर विद्यार्थ्यांना संगणक शास्त्रात शिक्षण देण्यात किसन महाराजांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे या क्षेत्रातील भरीव योगदान लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक आदी विद्यापीठात त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले. विविध विद्यापीठांमध्ये पीएच.डी आणि डी.लिट पदवीच्या परीक्षक मंडळावर सदस्य म्हणून किसन महाराज यांनी काम केले. आकाशवाणी केंद्रावरून आयोजित होणाऱ्या कीर्तन स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. गेली ४५ वर्षे स्वस्तिश्री या मासिकाचे संपादन ते करीत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा येथे आयोजित झालेल्या अखिल भारतीय किर्तनकार संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ज्ञानेश्वरी वाचन मंदिर, रंगनाथ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट अशा संस्थांचे विश्वस्त पद त्यांनी भूषविले आहे. कीर्तन प्रवचनातून आध्यात्मिक उद्बोधन करतानाच हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचे सामाजिक कार्य किसन महाराजांनी केले आहे. श्री क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. अन्नछत्र, ग्रंथालय, भक्तनिवास अशा उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद किसन महाराज यांनी भूषविले आहेत. आळंदी-देहू तीर्थ क्षेत्रांची माहिती देणारी संप्रेषण यंत्रणा किसन महाराज साखरे आणि परिसर विकास समितीच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत ज्ञानेश्वर महाराज अध्यासन सुरू झाले त्याची मूळ प्रेरणा अध्यक्ष या नात्याने किसन महाराजांची होती. ग्रंथराज ज्ञानेश्वरीची दृकश्राव्य प्रत त्यांनी प्रकाशित केली आहे. किसन महाराजांनी संस्कृत आणि मराठीतून एकूण ११५ ग्रंथ लिहले आहेत. सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ तुकाराम महाराज गाथा, सार्थ भगवद्गीता, सार्थ ब्रह्मसूत्र, सार्थ उपनिषद, सोहम योग, ज्ञानेश्वर महाराज चरित्र या सारखी ग्रंथ संपदा त्यांच्या लेखणीतून साकार झाली आहे. एकूण ५०० ताम्र पटांवर त्यांनी ज्ञानेश्वरी प्रकाशित केली आहे.
किसन महाराज साखरे यांना सन २०१८ सालचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या पाच लाख रुपयाच्या रकमेत स्वतःचे एक लाख रुपये जमा करून ही रक्कम संस्कृतमध्ये शिक्षण घेणाऱ्या अभ्यासकासाठी देता यावी म्हणून ती किसन महाराजांनी महाराष्ट्र शासनाला सुपूर्द केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डी. लिट या सर्वोच्च पदवीने त्यांना सन्मानित केले आहे. नागपूरच्या जिजामाता प्रतिष्ठानने जिजामाता गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. वारकरी रत्न, मोरया पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू कीर्तनकार, प्रवचनकार, तत्त्ववेत्ते म्हणून ह.भ.प. किसन महाराजांचे कार्य सर्व परिचित आहे. यमुना कंकाळ, यशोधन साखरे, चिदम्बरेश्वर साखरे ही त्यांची मुले आहेत. संत वाड्मयाचे अभ्यासक, लेखक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे.
संदर्भ :
- क्षेत्रसंशोधन