छाया अंधारे खुटेगावकर : (१५ ऑगस्ट १९६१). महाराष्ट्रातील लावणी कलावंत. महाराष्ट्रातील लावणी या लोकनृत्य प्रकाराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त करून देणाऱ्या मान्यवर लावणी कलावंतांमध्ये छाया अंधारे खुटेगावकर यांचे नाव अग्रक्रमाने घेण्यात येते. त्यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई, ज्येष्ठ भगिनी विजया खुटेगावकर आणि कनिष्ट भगिनी माया खुटेगावकर यांच्याकडे पारंपरिक लावणीचा वारसा आहे. वयाच्या १३ व्या वर्षांपासून त्यांनी लावणी नृत्याचे कार्यक्रम सुरू केले. १९७२ सालापासून मधू कांबीकर यांच्या संचामध्ये सुमारे १० वर्षे त्यांनी लावणी नृत्याचे कार्यक्रम केले. मुंबई येथे गुरू निर्मल कुमार यांच्यांकडून त्यांनी कथ्थक नृत्याचे शास्त्रीय शिक्षण घेतले तसेच श्रीरामपूरच्या शंकरराव डावळकर यांच्याकडून अदाकारीचे शिक्षण घेतले तर प्रख्यात ढोलकी पटू पांडुरंग घोटकर हे त्यांचे मुजऱ्यातील गुरू होत. १९७७ साली दिल्ली येथे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या समोर लावणी सादर करण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला.

१९८६ मध्ये अपना उत्सव या राष्ट्रीय उत्सवात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत लावणी दर्शनाचा कार्यक्रम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालकपद त्यांनी भूषविले तसेच अनेक प्रशिक्षण शिबिरातून विद्यार्थिनींना लावणीचे प्रशिक्षण दिले. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत सन २००४ सालापासून त्या पदवीधर विद्यार्थ्यांना लावणीचे प्रशिक्षण देत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् या विभागातही विद्यार्थ्यांना लावणीचे प्रशिक्षण देत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या या दोन्ही विभागातर्फे आयोजित झालेल्या राष्ट्रीय महोत्सवामध्ये छाया अंधारे खुटेगावकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. प्रभात वाहिनी, इ टीव्ही, सह्याद्री वाहिनी, कलर टीव्ही, झी २४ तास अशा अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर त्यांनी लावणी दर्शन घडविले आहे. सन २०१० साला पासून कारभारी जरा दमानं या पुण्याच्या नाट्य संस्थेच्या लावणी वर आधारित कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे. अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत सलग दोन वर्षे त्यांच्या संचाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. गाढवाचं लग्न, बाईचा चटका गमावला पटका  या लोकनाट्यांमधून तसेच अपना पन आणि आली अंगावर  या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या नृत्य व अभिनयाची चुणूक दाखवली आहे. १९९९ साली त्यांना महाराष्ट्र कला निकेतन चा पुरस्कार प्राप्त झाला. २००३ साली शाहीर सगनभाऊ पुरस्कार ( जेजुरी ) या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. १२ ऑक्टोबर २००७ रोजी त्यांना लक्ष्मी माता पुरस्कार प्राप्त झाला. २००८ साली सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. २६ जून २०१० साली त्यांना बाल गंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१४ साली महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक क्षेत्राचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. ४ ऑक्टोबर २०१६ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना दिल्ली येथे प्राप्त झाला.

छाया अंधारे खुटेगावकर यांनी विद्यापीठ पातळीवरील तसेच महाराष्ट्र शासनाच्या पातळीवरील अनेक समित्यांवर सदस्य म्हणुन काम केले. शाहीर अमरशेख अध्यासन या मुंबई विद्यापीठाच्या अध्यासनाच्या सल्लागार समितीचे सदस्यत्व त्यांनी भूषविले. महाराष्ट्र शासनाच्या लोककलावंत अनुदान समितीवर सदस्य म्हणून त्यांनी २०१५ मध्ये काम केले. उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासमोर तसेच दिल्ली येथील कॉमनवेल्थ गेम च्या वेळी आयोजित सांस्कृतिक महोत्सवात लावणी सादर करण्याचा मान त्यांना प्राप्त झाला. २०१४ मध्ये चीन येथील क्विंग डाव आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सवात लावणी सादर करण्याचा बहुमान छाया अंधारे खुटेगावकर यांना प्राप्त झाला.

छाया अंधारे खुटेगावकर या लावणी नृत्यामध्ये आणि अदाकारी मध्ये अतिशय वाकबगार असून पंचबाई मुसाफिर अलबेला, शुद्ध श्रावणमासी बेल वाही शंकररासी, स्नेह तुसी केला, सांभाळ झोक जाईल तोल, आशुक माशुक नार नाशिकची, पाहुनिया चंद्र वदन मला साहेना मदन मदन अशा पारंपरिक लावण्यांमधील छाया अंधारे खुटेगावकर यांची पेशकश केवळ महाराष्ट्राला नव्हे तर देश पातळीवर देखील ज्ञात आहे. पारंपरिक लावणीच्या जतन संवर्धनात छाया अंधारे खुटेगावकर यांचे योगदान मोलाचे आहे.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन