त्वचा म्हणजे शरीरातील सर्व अवयवांचे संरक्षण करणारे एक अखंड आवरण आहे. त्वचेचा समावेश हा सार्वदेहिक ज्ञानेंद्रियांमध्ये केला जातो. सार्वदेहिक ज्ञानेंद्रियांत वेदना, तापमान (उष्ण/शीत), खोल दाब, हलका स्पर्श, कंपन, खाज, गुदगुल्या यांच्या संवेदनांशी संबंधित ग्राहींचा समावेश होतो. त्वचा हे मानवी शरीरातील सर्वांत मोठे तंत्र (संस्था) आहे. शरीराच्या एकूण वजनापैकी १६% वजन त्वचेचे असते. मानवी त्वचा अनुक्रमे बाह्यत्वचा, अंतस्त्वचा आणि अधस्त्वचा अशा तीन थरांची मिळून बनलेली असते. केस व नखे ही देखील त्वचेचीच उपांगे आहेत. शरीरामध्ये विशिष्ट भाग मिळून तयार झालेल्या निरनिराळ्या यंत्रणा/संस्था उदा., उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण संस्था इत्यादी संस्था म्हणजे त्वचेचे सर्व थर मिळून तयार झालेल्या एक स्वतंत्र संस्था आहेत. त्यामुळे त्वचेच्या परीक्षणावरून सार्वदेहिक तसेच शरीरांतर्गत असलेले बिघाड इत्यादींचे निदान करता येते. त्वचा ही शारीरिक स्वास्थ्याची निदर्शक असते. त्वचारोगांचा अभ्यास वैद्यकाच्या ज्या शाखेत केला जातो त्या शाखेस त्वचारोगविज्ञान म्हणतात.

त्वचेचे कार्य : शरीरावर त्वचेचे संरक्षणात्मक आच्छादन असते. आघातापासून व सूक्ष्मजंतूंच्या संक्रामणापासून शरीराचे संरक्षण करणे, संवेदना ग्रहण, स्रवण आणि उत्सर्जन, शरीर तापमानाचे नियंत्रण करणे, त्वचेमध्ये वसा व रक्त इत्यादींचा साठा करणे, वसाविद्राव्य पदार्थांचे शोषण करणे इत्यादी त्वचेची प्रमुख कार्ये आहेत.

त्वचारोग : मानवी रोगांमध्ये त्वचारोगाचे प्रमाण बरेच असते. त्वचेची रचना, शरीरक्रियाविज्ञान, जीवरसायनशास्त्र आणि जैव कार्य यांवरून त्वचारोगांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते –

त्वचारोगचिकित्सा

(१) जन्मजात विकृती : जन्मखुणा, एपिडर्मोलायसीस बुलोसा (Epidermolysis bullosa), झीरोडर्मा पिगमेंटोसम (Zeroderma pigmentosa) इत्यादी त्वचाविकार.

(२) आघातजन्य विकृती : भाजणे, पोळणे, हिमदाह, अपघातामुळे त्वचेला झालेली इजा किंवा जखम इत्यादी.

(३) शोथजन्य विकृती : खरुज, इसब, पूयुक्त फोड, अधिहर्षतेशी (ॲलर्जी) संबंधित त्वचाविकार, गोवर, कांजिण्या, गजकर्ण इत्यादी.

(४) चयापचयात्मक विकृती : त्वचा कोरडी पडणे, त्वचेला खाज सुटणे, खवलेयुक्त त्वचा, चट्टे पडणे, चाई पडणे, त्वचा लालसर होणे, त्वचेवरील काळे-पांढरे डाग, गांधी उठणे, सुरकुत्या पडणे, केसात कोंडा होणे, नखांचे आवरण पातळ होणे इत्यादी.

(५) गाठ किंवा अर्बुदे : तीळ किंवा मस, चामखीळ, कुरूप, टेंगुळ, पूयुक्त किंवा खाजयुक्त गाठी इत्यादी.

याशिवाय विसर्पिका (सोरायसिस), कोड, त्वचा कर्करोग इत्यादी गंभीर स्वरूपाचे त्वचाविकार आहेत.

त्वचारोगांची कारणे : १. स्वच्छतेचा अभाव, २. अशुद्ध पाणी, ३. अशुद्ध खाद्यपदार्थ, ४. जीवनसत्त्वांचा अभाव, ५. विषारी कीटकांचा चावा, ६. काही औषधांचे प्रमाणाबाहेर सेवन किंवा औषधांचा शरीरावरील प्रतिकूल परिणाम, ७. अधिहर्षता (ॲलर्जी), ८. आनुवंशिकता, ९. प्रदूषित हवा, पाणी इत्यादींचा संपर्क, १०. रासायनिक खते, विषारी पदार्थ, रसायने इत्यादींचा संपर्क, ११. सौंदर्यप्रसाधनांचा अविवेकी वापर, १२. आघात किंवा अपघातामुळे निर्माण होणारे त्वचारोग, १३. संसर्ग इत्यादी.

त्वचारोग चिकित्सेतील अब्जांश तंत्रज्ञानाचे महत्त्व : त्वचारोग चिकित्सेमध्ये सर्वप्रथम रोग्याचा पूर्वेतिहास जाणून घेऊन निदान केले जाते व त्यानुसार उपचारांची दिशा व पद्धती ठरवली जाते. सर्वसाधारणपणे त्वचा उपचारासाठी मलमे (क्रीमे), पावडर, स्टेरॉईडे, जीवनसत्त्वांची अंत:क्षेपणे, शस्त्रक्रिया इत्यादींचा वापर केला जातो.

त्वचारोगांवरील उपचारांसाठी अब्जांश कण वापरून तयार केलेली मलमे, धावन द्रव, जेल, तेल अशा अनेक औषधी उत्पादनांचे निर्माण केले जात आहे. औषधनिर्माणशास्त्रात सुरक्षित रीत्या लक्ष्यित अवयवांवर औषधे वितरित करण्यासाठी अब्जांश तंत्रज्ञान हे महत्त्वाचे व उपयुक्त तंत्रज्ञान असून औषध वितरणासाठी त्वचा हे उत्तम माध्यम आहे. तसेच त्वचेच्या पार्यता (Permeability) यंत्रणेमध्ये अब्जांश कणांचे भौतिक-रासायनिक गुणधर्म महत्त्वाचे ठरतात; उदा., अनाकर्षण, आकारमान, भार इत्यादी. अब्जांश कणांचे सुव्यवस्थित वितरण होण्याकरिता त्वचेचा शल्क स्तर (Stratum corneum) महत्त्वाचा असतो. या स्तराला भंग करून त्यात अडथळा निर्माण करावा लागतो. यासाठी जीन बंदूक, सूक्ष्मसूई, स्वनातीत पद्धती, विद्युतपार्यता (Electroporation) या पद्धतींचा प्रथमत: वापर करावा लागतो. अब्जांश तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे त्वचेची निगा राखणे व रोगोपचार करणे हे आता अधिक सोयीचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे झाले आहे. त्यामुळे त्वचाविकारविज्ञानातील अब्जांश तंत्रज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.

(१) अतिनील किरण (UV rays) त्वचेवर पडल्यास त्वचा लालसर होते. यावर उपाय म्हणून झिंक ऑक्साइड (Zinc oxide) व टिटॅनियम डायऑक्साइड (Titanium dioxide) या धातूंच्या अब्जांश कणांचा वापर करून तयार केलेल्या सूर्यरापप्रतिबंधक द्रावणाचा (Sunscreen lotion) उपयोग केला जातो. यामध्ये वापरले गेलेले अब्जांश कण ‘औषध वाहक’ म्हणून काम करतात व त्वचा उपचारासाठी आवश्यक असलेले द्रव किंवा मलम त्वचेच्या आतील पेशींपर्यंत पोहोचवतात. यामुळे अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण केले जाते. धातूंच्या अब्जांश कण आधारित सनस्क्रीन लोशनपेक्षा आयव्ही वनस्पतीच्या अब्जांश कणांपासून तयार केलेले सनस्क्रीन लोशन अधिक परिणामकारक  ठरले आहे. धातू आधारित सनस्क्रीन त्वचेवर पांढरा थर पसरवतात, तर आयव्ही वनस्पतीपासून तयार केलेले सनस्क्रीन त्वचेवर पूर्णत: अदृश्य स्वरूपात असते. यातील अब्जांश कण अधिक चिवट असल्याने हे सनस्क्रीन पुन्हा पुन्हा लावण्याची आवश्यकता पडत नाही.

(२) विविध सौंदर्यप्रसाधनांमध्ये कोबाल्ट (Cobalt) आणि क्रोमियम (Chromium) या धातूंचे अब्जांश कण वापरले जातात.

(३) अब्जांश कण मिसळेलेले द्रव अथवा मलम वापरून त्वचेवर येणारे टेंगुळ घालवता येते.

(४) चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, अकाली वृध्दत्व येणे या समस्या टाळण्यासाठी मूल पेशींपासून (Stem cells) तयार केलेली प्रथिने वापरून बनवलेल्या मलमांचा उपयोग केला जातो. ही प्रथिने लिपोसोम्स (Liposomes) अब्जांश कणांच्या कुपींमधून नियोजित ठिकाणी वितरीत करतात. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतात.

(५) अब्जांश कण असलेली रेटोनाइड्स (Retonides), प्रतिऑक्सिडीकारक (Antioxidants) आणि बोटुलिनम विष (Botulinum toxin) यांचा वापर केलेली औषधे त्वचा उपचारासाठी आता अगदी सुरक्षितपणे वापरली जाऊ शकतात.

(६) अब्जांश पायस (Nano emulsion) कणाचे आकारमान पारंपरिक पायसात असणाऱ्या कणांच्या आकारमानापेक्षा बरेच कमी असल्याने ते त्वचेत खोलवर जाऊन पोषणद्रव्यांचे वितरण करतात. धावन द्रवामध्ये वापरली जाणारी इथोसोम्ससारखे अब्जांश कण वाहक केसांच्या वाढीसाठी वापरली जातात.

(७) भाजणे, अपघात, संसर्ग इत्यादी कारणांमुळे त्वचेला झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी तसेच त्वचेच्या बाधित भागावर चांगल्या त्वचेच्या थराचे रोपण केले जाते. या प्रक्रियेला त्वचारोपण शस्त्रक्रिया (Plastic Surgery) असे म्हणतात. ती मुख्यत्वे पुनर्रचनात्मक आणि सौंदर्यवर्धक या दोन कारणांनी करण्यात येते. या शस्त्रक्रियेमध्ये अब्जांश तंत्रज्ञानाद्वारे पेशींची बांधणी करणे तसेच पेशींची दुरुस्ती करणे इत्यादी कार्ये केली जातात.

त्वचारोग चिकित्सेमध्ये अब्जांश तंत्रज्ञानाचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यामुळे विकसित देश या क्षेत्रातील संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधी उपलब्ध करून देत आहेत. यामुळे जागतिक स्तरावर त्वचारोगाचे रुग्ण कमी होण्यासाठी व लोकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी निश्चितच फायदा होत आहे.

पहा : अब्जांश सौंदर्यप्रसाधने, त्वचा (पूर्वप्रकाशित नोंद).

संदर्भ :

  • https://www.understandingnano.com/nanotechnology-skin-carecosmetics
  • https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3938363/
  • https://www.sciencedirect.com/book/9780128029268/nanoscience-in-dermatology

समीक्षक : वसंत वाघ