कल्पिता वृत्तीचे दुसरे नाव विदेहा असे आहे. ‘वि-देहा’ म्हणजे देहाबाहेर मनाची स्थिती. ह्याच स्थितीला कल्पिता असेही म्हणतात. विदेहा ही संकल्पना योगदर्शनाची असून ही पतंजली योगसूत्राच्या विभूतीपादामध्ये आलेली आहे. योगशास्त्रात सांगितलेल्या सिद्धीमध्ये याचा अंतर्भाव होतो. पतंजलीने महाविदेहा नावाची वृत्तीच योगसूत्रांमध्ये सांगितलेली दिसते. शरीरातच असताना शरीराबाहेर राहणाऱ्या मनाच्या अवस्थेचे नाव विदेहा, अशा अर्थाची व्यासभाष्यात भाष्यकारांनी विदेह वृत्तीची व्याख्या केली आहे.

ह्या स्थितीत मन शरीरात राहत असतानाच मनाची बाहेर प्रवृत्ती असते. ही प्रवृत्ती कल्पना स्वरूपाची असते असे संस्कृत ग्रंथकार वाचस्पतिमिश्र यांचे मत आहे. ह्या स्थितीचे स्वरूप अजून स्पष्ट करताना विज्ञानभिक्षु म्हणतात की, ह्या स्थितीत बाहेरचे पदार्थदेखील मनाच्या ताब्यात असतात. याला धारणा अशी एक तांत्रिक संज्ञा देण्यात आली आहे. अशी शक्ती असल्याने योगी दुसऱ्या शरीरामध्ये देखील वस्तूंवर नियंत्रण ठेवू शकतो असे काही व्याख्याते हिचे वर्णन करतात.

पहा : अकल्पिता (महाविदेहा) वृत्ति; संयम; सिद्धी.

                                                   समीक्षक : कला आचार्य