क्रियायोग ही प्राचीन काळातील लुप्तप्राय झालेली साधना महावतार बाबाजी नामक अलौकिक योग्यांनी परत शोधून काढली, त्या साधनेच्या आचारपद्धतीचे नवे तंत्र विकसित केले व तिला क्रियायोग असे साधे नवीन नाव दिले.महावतार बाबाजी  यांनी आपले शिष्य लाहिरी महाशय यांना हे ज्ञान दिले. लाहिरी महाशयांनी स्वामी श्री युक्तेश्वरगिरी यांना आणि श्री युक्तेश्वरगिरी यांनी स्वामी परमहंस योगानंद यांना हे ज्ञान प्रदान केले. परमहंस योगानंद यांनी महावतार बाबाजींच्या इच्छेने या साधनेचा भारताबाहेर विशेषत: अमेरिकेत प्रसार-प्रचार केला.

क्रियायोग हा साधा, सोपा, मानसिक व शारीरिक क्रियांनी युक्त असा योगसाधनेचा प्रकार आहे. या साधनेने रक्तातील कार्बन डाय-ऑक्साईड बाहेर पडून रक्त प्राणवायूने परिपूर्ण होते. प्राणवायूच्या वाढलेल्या प्रमाणामुळे जीवनशक्ती निर्माण होऊन त्यांमुळे मेंदू व पाठीच्या कण्यातील  विविध केंद्रांचे पुनरुज्जीवन होते, तसेच रक्तात दूषित द्रव्ये साचण्याचे थांबते. यामुळे योग्याला आपल्या शरीरातील रक्त, मांस, अस्थी वगैरेंमधील पेशींचा, तंतूंचा जो अहर्निश नाश होत असतो तो थांबविता येतो. क्रियायोगात प्रगत झालेला योगी आपल्या शरीरातील पेशींचे ऊर्जेत परिवर्तन करू शकतो असे या परंपरेत मानले जाते.

क्रियायोगाच्या साध्या सुलभ अभ्यासाने मनुष्याचे शरीर प्रत्येक दिवशी थोडे थोडे अधिक वरच्या, सूक्ष्म लोकात नेले जाते. या साधनेने प्राणशक्तीचा इंद्रियांच्या दिशेने बहिर्मुख असलेला प्रवाह दिशा बदलून अंतर्यामी केला जातो आणि तिला षट्चक्रांभोवती फिरवत ठेवून तिचे मेरुदंडात संचार करणाऱ्या कुंडलिनीशक्तीशी पुनर्मिलन घडवून आणले जाते. यामुळे कुंडलिनी जागृत होऊन योग्याचे शरीर आणि त्याच्या मेंदूच्या पेशी नवजीवन प्राप्त करतात. या साधनेद्वारे शरीर आणि मन यांच्यावर स्वामित्व मिळवून क्रियायोगी शेवटी मृत्यूवरही विजय प्राप्त करतो. क्रियायोगाची साधना योग्याला ‘मानवी शरीर हे वैश्विक उर्जेचे संघटन होऊन तयार झाले आहे’, या साक्षात्काराप्रत नेते. प्रगत क्रियायोगी स्वतःच्या आत्म्याच्या प्रेरणेनुसार वाटचाल करतो आणि त्याच्या जीवनक्रमावर त्याने केलेल्या कर्मांचा काही परिणाम होत नाही.

क्रियायोग ही जरी आधुनिक काळातील नवीन योगसाधना पद्धती असली तरी तिला प्राचीन ग्रंथाचाही आधार आहे असे स्वामी परमहंस योगानंद यांनी प्रतिपादन केले आहे. या संदर्भात ते म्हणतात – भगवद्गीतेच्या चवथ्या अध्यायात (४.२९) क्रियायोगाचा उल्लेख आहे. भगवान कृष्ण क्रियायोगाचे वर्णन करताना म्हणतात – ‘योगी प्राणवायूचे अपानवायूमध्ये आणि अपानवायूचे प्राणवायूमध्ये विसर्जन करतात. अशा तऱ्हेने प्राण आणि अपान दोन्हीच्या गती अवरुद्ध करून प्राणायाम सिद्ध करतात; दोन्ही वायू एकमेकांत विलीन करून टाकतात आणि अशा पद्धतीने आपल्या हृदयातून प्राणशक्ती बाहेर काढून तिला आपल्या ताब्यात आणतात.’

तसेच श्वसनावरील नियंत्रणाद्वारे मुक्त राहणाऱ्या योग्याचे वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण सांगतात (५.२७-२८) – ‘तो ध्यानप्रवीण (मुनी) बाहेरच्या विषयांना बाहेर सोडून आणि दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून प्राण आणि अपान वायूंना समप्रवाही करतो, इंद्रिये, चित्त आणि बुद्धी यांना स्वत:च्या ताब्यात ठेवतो आणि त्याद्वारे मनातील इच्छा, भय, क्रोध इत्यादी भावना नाहीशा करतो आणि सदैव मुक्त राहतो’.

पातंजल योगातही क्रियायोगाचा दोनदा उल्लेख येतो (२.१) – ‘क्रियायोग म्हणजे शारीरिक यम, मन:संयम आणि प्रणवमंत्र यावरील ध्यान’ अशी क्रियायोगाची व्याख्या पतंजलींनी केली आहे. ‘श्वास आणि प्रश्वास यांचे प्रवाहमार्ग एकमेकांपासून वेगळे करून सिद्ध केलेल्या प्राणायामाद्वारे मुक्ती मिळते’, हा योगसूत्रातील (२.४९) उल्लेखही क्रियायोगाच्या संदर्भात आढळतो.

महावतार बाबाजींनी उल्लेख केल्याप्रमाणे हे प्राचीन ज्ञान जसे कृष्णाकडून अर्जुनाला मिळाले तसेच ते नंतरच्या काळात पतंजली, येशू ख्रिस्त, सेंट जॉन, सेंट पॉल यांनाही मिळाले.

आजही जगभरात क्रियायोगाचे असंख्य अनुयायी आहेत. परमहंस योगानंद यांनी स्थापन केलेल्या योगोदा सत्संग सोसायटी या संस्थेच्या विविध ठिकाणी असलेल्या शाखांमधून क्रियायोगाची वैयक्तिक दीक्षा दिली जाते. या संप्रदायाने क्रियायोगाच्या प्रत्यक्ष करावयाच्या अभ्यासाबाबत गुप्तता बाळगली असून केवळ दीक्षा प्राप्त केलेल्या साधकांनाच ती उघड केली जाते.

संदर्भ :

  • योगी कथामृत, योगानंद, परमहंस, वोरा अँड पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई, १९९८
  • कोल्हटकर, केशव कृष्णाजी, भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन, आदित्य प्रतिष्ठान, पुणे, २००८.

समीक्षक : ललिता नामजोशी