योगदर्शनानुसार ज्या अवस्थेमध्ये चित्ताच्या कोणत्याही वृत्ति नसतात व पुरुषाला (आत्म्याला) कोणत्याही विषयाचे ज्ञान होत नाही, अशी अवस्था म्हणजे असम्प्रज्ञात समाधि होय. ज्या अवस्थेत सम्यक् (सम्) – यथार्थ आणि प्रकृष्ट (प्र) – संपूर्ण ज्ञान (ज्ञा) होत नाही, ती ज्ञानरहित अवस्था म्हणजे असम्प्रज्ञात (अ + सम् + प्र + ज्ञा + क्त) होय.

योगदर्शनानुसार पुरुष (आत्मा) म्हणजे केवळ ज्ञान होण्याची योग्यता होय. पुरुषामध्ये ज्ञान होण्याची योग्यता सर्वदा समान रूपाने राहते, परंतु जेव्हा चित्तामध्ये वृत्ति असतील, तेव्हाच पुरुषाला ज्ञान होऊ शकते. चित्त हे स्वत: अचेतन असल्यामुळे ते ज्ञान प्राप्त करू शकत नाही, परंतु चित्त एखाद्या विषयाचा आकार (वृत्ति) धारण करू शकते. पुरुषाचा चित्ताशी संयोग असल्यामुळे चित्तामध्ये ज्या ज्या विषयाच्या आकाराच्या वृत्ति उत्पन्न होतात, त्या त्या वृत्तींचे ज्ञान पुरुष प्राप्त करतो. परंतु, ज्यावेळी चित्ताच्या सर्व वृत्ती निरुद्ध होतात, त्यावेळी पुरुषाला कोणतेही ज्ञान प्राप्त होत नाही. याच अवस्थेला असम्प्रज्ञात असे म्हटले आहे. महर्षि पतंजलींनी योगसूत्रात ‘असम्प्रज्ञात’ या संज्ञेचा उल्लेख केलेला नाही. सम्प्रज्ञात समाधीपेक्षा वेगळी असल्यामुळे केवळ ‘अन्य’ असा निर्देश महर्षि पतंजलींनी केला आहे; परंतु व्यासभाष्यामध्ये ‘असम्प्रज्ञात’ हा समाधीचा एक प्रकार म्हणून उल्लिखित आहे.

चित्ताच्या एकाग्र अवस्थेत होणारी समाधि म्हणजे सम्प्रज्ञात व त्यानंतर निरुद्ध अवस्थेत होणारी समाधि असम्प्रज्ञात होय. सम्प्रज्ञात समाधीची पराकाष्ठा म्हणजे ‘विवेकख्याति’ होय. ज्यावेळी योग्याला चैतन्यस्वरूप पुरुषाचे व पुरुषापेक्षा चित्त वेगळे आहे, अशा प्रकारचे भेदज्ञान होते, ते ज्ञान म्हणजे विवेकख्याति होय. परंतु, हे ज्ञानही चित्ताद्वारेच प्राप्त होते, ही जाणीव झाल्यावर विवेकख्यातीरूप ज्ञानाविषयी आणि ते ज्ञान करवून देणाऱ्या त्रिगुणांविषयीही वैराग्य उत्पन्न होते, हेच परवैराग्य होय. या वैराग्यामुळे विवेकख्यातिरूप एकाग्र वृत्तीही निरुद्ध झाल्यामुळे चित्तामध्ये कोणतीही वृत्ति राहत नाही, हिलाच असम्प्रज्ञात समाधि असे म्हणतात (‘विरामप्रत्ययाभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्य:|’ योगसूत्र १.१८). चित्ताच्या वृत्ति विराम पावत आहेत, अशी जाणीव (प्रत्यय) पुन:पुन्हा झाल्यानंतर ज्यावेळी सर्व वृत्तींचा निरोध होऊन चित्तात केवळ संस्कार शिल्लक राहतात, ती असम्प्रज्ञात समाधि होय. या अवस्थेत चित्ताच्या वृत्ति जरी नसल्या तरी सूक्ष्म रूपाने संस्कार मात्र शिल्लक राहतात. व्यासभाष्यानुसार असम्प्रज्ञात समाधीलाच निर्बीज समाधि असेही म्हणतात. ज्यावेळी ऋतंभरा प्रज्ञा (विवेकख्यातीचे ज्ञान उत्पन्न करवून देणारी प्रज्ञा) आणि तिच्याद्वारे उत्पन्न होणारे संस्कार निरुद्ध होतात तेव्हा ती निर्बीज समाधी होय (‘तस्यापि निरोधे सर्वनिरोधान्निर्बीज: समाधि:|’ योगसूत्र १.५१).

ज्यावेळी चित्त व्युत्थान अवस्थेतून निरुद्ध अवस्थेमध्ये जाते, त्यावेळी त्याला चित्ताचा निरोध-परिणाम असे म्हणतात (‘व्युत्थान-निरोध-संस्कार-अभिभव-प्रादुर्भावौ निरोध-क्षण-अन्वयो चित्तस्य निरोध-परिणाम:|’ योगसूत्र ३.९). ज्यावेळी व्युत्थानाचे (वृत्तींचे) संस्कार क्षीण होतात आणि निरोधाचे संस्कार अभिव्यक्त होतात त्यावेळी चित्तामध्ये निरोध-परिणाम होतो. वृत्तींचा निरोध झाला असता चित्ताचा विषयाशी संबंध राहत नाही, तर केवळ निरोध असणाऱ्या क्षणाशी संबंध राहतो.

योगदर्शनात अविद्या आणि असम्प्रज्ञात हे दोन शब्द वेगवेगळ्या अर्थाचा बोध करवून देतात. अविद्या म्हणजे विद्येचा/ज्ञानाचा अभाव नसून ज्ञानाच्या प्रामाण्याचा अभाव आहे. अविद्या हेही ज्ञानच आहे, परंतु ते अयथार्थ ज्ञान आहे. असम्प्रज्ञात म्हणजे ज्यामध्ये संपूर्ण ज्ञानाचा अभाव होय. ज्या अवस्थेत यथार्थ आणि अयथार्थ अशा कोणत्याही प्रकारचे ज्ञान नाही, ती अवस्था म्हणजे असम्प्रज्ञात होय.

चित्ताच्या संपूर्ण वृत्तींचा निरोध असणारी ही अवस्था दोन प्रकारे प्राप्त होते – भवप्रत्यय आणि उपायप्रत्यय. या दोन्ही प्रकारांचे वर्णन महर्षि पतंजलींनी योगसूत्रात केलेले आहे.

पहा : उपायप्रत्यय, भवप्रत्यय, विवेकख्याति, वैराग्य, सम्प्रज्ञात समाधि.

                                                                                                समीक्षक : श्रीराम आगाशे