रीग्ज, आर्थर : (१९३९)

आर्थर रिग्ज यांचा जन्म कॅलिफोर्निया येथे मोडेस्टोमध्ये (Modesto) झाला. त्यांचे जनुकशास्त्र हे अभ्यासाचे क्षेत्र होते. त्यांचे शिक्षण सेन बर्नेरडिनो (Bernardino) हायस्कूल आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे झाले. त्यांनी रसायनशास्त्रातील पदवी कॅलिफोर्निया विद्यापीठात घेतली तर जीवरसायनशास्त्रात पीएच्.डी. केली. पीएच्.डी. मिळविल्या नंतर त्यांनी कॅलिफोर्निया, सेन दिएगो, येथील साल्क इन्स्टिट्यूटमध्ये मेलवीन कोन ह्यांच्या निरीक्षणाखाली पोस्ट डॉक्टरेटचा अभ्यास सुरू केला. त्यांचे कार्यस्थळ सिटी ऑफ होप नॅशनल मेडिकल सेंटर, बेकंमेन रिसर्च इन्स्टिट्यूट होते. डॉ. आर्थर रिग्ज एक जनुक तज्ज्ञ होते ज्यांनी जेनेटिक्समध्ये पहिल्या कृत्रिम जनुकाची निर्मिती जीवाणूंच्या सहाय्याने केली. आधुनिक जीवतंत्रज्ञान व्यवसाय ह्या कामावर आधारित आहे. पहिल्यांदा औषधांच्या व्यावसायिक निर्मितीसाठीच्या रेण्वीय जीवतंत्रज्ञानासाठी हे पाऊल महत्त्वाचे होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इन्सुलीनसारख्या प्रथिन असणाऱ्या औषधांची निर्मिती झाली. रिग्ज जीवशास्त्राचे प्राध्यापक होते आणि २०१४ साली सिटी ऑफ होपच्या नॅशनल मेडिकल सेंटरच्या संचालकपदी काम केले. रिग्ज यांना प्रथम संचालक नेमून सिटी ऑफ होपमध्ये अस्तित्वात असलेल्या डायबिटीस रिसर्च प्रोग्रामच्या मदतीने नवीन डायबिटीस अँड मेटाबोलिसम रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना झाली.

आर्थर रिग्ज यांनी सस्तन प्राण्यांमधील डीएनए आणि प्रथिनांमधील प्रक्रिया तसेच डीएनएचे प्रजनन, रिकॉम्बिनंट प्रतीजैविकांची निर्मिती, डीएनए मेथिलेशन एपी जनुकशास्त्र, सोमेटोस्टाटीन आणि इन्सुलीन, प्रतीजैविकांची अभियांत्रिकी, जनुकांचे नियंत्रण आणि त्यांना अकार्यक्षम करणे ह्या विषयांवर अभ्यास केला. बी पेशी वेगळ्या काढण्यासाठी त्यांनी स्वतः रक्तदान केले. त्यांनी वापरलेल्या पद्धतीमुळे त्यांना त्या प्रक्रियेच्या गतीचे मोजमाप करता आले. त्यांच्या निष्कर्षांमधून हे सिद्ध झाले की डीएनएचे छोटे छोटे भाग असतात. ते एकमेकांवर अवलंबून न राहता आपल्या प्रती बनवतात. ह्या प्रती, डीएनएच्या दोन्ही बाजूनी तयार होतात. १९६६ ते १९६९ ह्या दरम्यान त्यांनी मेल्विन कोन ह्यांच्या बरोबर डीएनए आणि प्रथिनांच्या परस्पर प्रक्रियाबद्दल अभ्यास केला आणि लाम्ब्डा व लेक रीप्रेसर ही दोन प्रथिने शोधून काढली, ज्यांच्यामुळे जनुकांचे नियंत्रण होते, हे सिद्ध झाले. नायट्रोसेल्यूलोज फिल्टर बाईंडिंग एसे पद्धतीचा त्यांनी शोध लावला, जी खूप त्वरित निष्कर्ष देते असे सिद्ध झाले.

त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. त्यातील महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे, नॅशनल अकादमी ऑफ सायन्समध्ये निवड, ज्युवेनाइल डायबिटीस रिसर्च अवार्ड, डिस्टिंगग्विश्ड अलम्नाय ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, रिवर साईड अवार्ड, टेक्नोलॉजी लीडरशिप अवार्ड आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचा डिस्टिंग्विश्ड अलम्नी अवार्ड इत्यादी.

संदर्भ :

  • Hughes, Sally Smith (2005). ‘Arthur D. Riggs City of Hope’s contribution to early Genentech research’(PDF). Program in Bioscience and Biotechnology Studies. Regional Oral History office, Bancroft Library.
  • Mossman, Kaspar D. (23 March 2010). ‘Profile of Arthur D. Riggs’. Proceedings of the National Academy of Sciences. 107 (12): 5269–5271.  Retrieved 3 June 2015.
  • Müller-Hill, Benno (1996). ‘The lac Operon : a short history of a genetic paradigm.’ New York: Walter de Gruyter. ISBN978-3110148305. Retrieved 2 June 2015.
  • Razin, A; Riggs, AD (7 November 1980). ‘DNA methylation and gene function.’210 (4470): 604–10.
  • Lewis, Wayne (June 17, 2013). ‘Art Riggs: A groundbreaking scientist looks to the future.’ City of Hope Breakthroughs. Archived from the original on June 23, 2013.

 समीक्षक : रंजन गर्गे