अरियकुडि रामानुज अयंगार : (१९ मे १८९०–२३ जानेवारी १९६७). दाक्षिणात्य संगीतपद्धतीचे एक ख्यातनाम गायक. त्यांचा जन्म तमिळनाडूमधील शिवगंगा जिल्ह्यातील अरियकुडी येथे झाला. त्यांचे वडील वेद, फलज्योतिष आणि संगीताचे जाणकार होते. त्यांना बालवयापासूनच संगीताची आवड होती. त्यामुळे वडिलांचा संगीताचा वारसा त्यांनी चालवला. त्यांनी संगीताचे शिक्षण प्रारंभी पुदुकोट्टाई मलयप्पा अय्यर यांच्याकडे, नंतर गुरुकुल पद्धतीने दोन वर्षे नम्मकल नरसिंह अयंगार यांच्याकडे झाले. पुढे आठ वर्षे त्यांनी रामनाड श्रीनिवास अयंगार यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. एका विवाह सोहळ्यात त्यांनी सर्वप्रथम जाहीर गायन केले. त्यानंतर साधारणत: विसाव्या वर्षापासून त्यांनी स्वतंत्र मैफलींमध्ये गायनाची सुरुवात केली.

अरियकुडि यांना कर्नाटक संगीतातील त्रिमूर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यागराजांच्या शिष्यपरंपरेतील प्रमुख गायक म्हणून ओळखले जाते. अरियकुडींची आवाजी भरदार, बहुरंगी व स्वरसंवादांनी संपन्न होती आणि विशेष म्हणजे ही स्वरसंवादांची अनुकूलता त्यांच्यात अखेरपर्यंत टिकून होती. अरियकुडींचा लवचीक, घुमारेदार, खणखणीत आवाज व सुंदर आलापक्रिया आणि झिलईदार रचनांचा आविष्कार यांमुळे त्यांच्या मैफली अत्यंत वेधक होत. त्यांत कर्नाटक संप्रदायाचे निर्मळ व परिपूर्ण प्रतिबिंब उमटलेले दिसे. त्यांचे गायन कर्नाटकातील कचेरी या पारंपरिक पद्धतीचे होते. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण गानशैली ‘अरियकुडि शैली’ म्हणून ओळखली जात असे व ती जाणकारांप्रमाणेच सामान्य लोकांमध्येही प्रिय होती.

१९५५ च्या आकाशवाणी संगीत संमेलनाची सुरुवात अरियकुडि यांच्या गायनाने झाली. त्यांनी त्यांचे गुरू रामनाड श्रीनिवास अयंगार यांच्या अभिजात रचना लोकप्रिय केल्या. बिलहरी व कानडा रागांमध्ये त्यांनी दोन तिल्लाने संगीतबद्ध केले आहेत. त्यांच्या सुमारे तीस ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध आहेत. अरुणाचल रवीच्या रामनाटकमच्या तसेच तिरुप्पावैममधील आंडाळच्या गीतांची त्यांनी दाक्षिणात्य संगीतरचनेमध्ये बांधणी केली. गुरुकुल संगीत पद्धतीने संगीतशिक्षण देणाऱ्या संस्था त्यांनी काढल्या. त्यात अनेक विद्यार्थी शिकून तयार झाले. त्यातूनच धन्नमल, बी. राजम् अय्यर यांच्यासारखे संगीतकार त्यांनी शिकवून तयार केले.

अरियकुडि यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. वेल्लोर संगीत सभेकडून ‘संगीत रत्‍नाकर’ (१९३४), ‘संगीत कलानिधी’ (१९३८), म्हैसूर दरबारकडून ‘आस्थानविद्वान’ (१९४१) व ‘गायकशिखामणी’ (१९४७) या पुरस्कारांबरोबरच त्यांना १९५२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार व १९५४ साली अकादमीची छात्रवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ (१९५७) इत्यादी मानसन्मान त्यांना लाभले.

दीर्घ आजाराने चेन्नई येथे त्यांचे निधन झाले.