साटी, थॉमस एल. : (१८ जुलै १९२६ –  १४ ऑगस्ट २०१७) थॉमस एल. साटी यांचा जन्म ब्रिटीश अधिपत्याखाली असलेल्या मोसुल या इराकमधील प्रांतात झाला. त्यांचे शालेय शिक्षण लेबनॉन येथे झाले. १९४५ मध्ये ते अमेरिकेत आले आणि त्यांनी गणितात कोलंबिया युनियन कॉलेज येथून बी.ए. पदवी मिळवली. नंतर येल विद्यापीठातून गणितात एम.ए. तसेच आणि प्रा. आयनर कार्ल हिल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘On the Bessel Tricomi Equation’ या प्रबंधावर पीएच्. डी. पदवी प्राप्त केली.

साटी यांनी पुढील १५ वर्षे अमेरिकेच्या लष्करी आणि अन्य शासकीय संस्थांमध्ये काम आणि संशोधन केले. त्याचे एक फलित म्हणजे त्यांचे Elements of Queuing Theory with Applications हे गाजलेले पुस्तक प्रसिद्ध झाले. नंतर ते पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या वार्टन स्कूल येथे संख्याशास्त्र आणि प्रवर्तन संशोधन या विषयांचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. पुढे ते पिट्सबर्ग विद्यापीठात सन्मानीय प्राध्यापक म्हणून शेवटपर्यंत अध्यापन आणि संशोधन करत राहिले.

त्यांचे सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे सखोल गणिती बैठक असलेली एएचपी (Analytic Hierarchy Process) ही पद्धत विकसित करणे हे होय. त्याने अग्रक्रम ठरवणे आणि निर्णय घेण्यास चपखल मदत मिळते. या पद्धतीने विविध गोष्टींची तुलना करून त्यांच्या प्राथमिकता अंकीय स्वरुपात सापेक्ष वजनात (relative weights) मांडता येतात. ही पद्धत सारणी बीजगणितामधील काही संकल्पना आणि मानसशास्त्रातील एक प्रमाणित मोजपट्टी (scale) यांचा वापर करते. त्यासाठी संगणक आज्ञावलीही उपलब्ध आहेत.  एएचपी तीन मूळ तत्त्वांवर काम करते : १) जटील प्रश्नाला त्याच्या विविध घटकांत उतरंडीच्या (Hierarchy) स्वरुपात मांडणे (हे स्तर कितीही असू शकतात), २) त्या घटकांची एकमेकात तुलना करून ते एकूण प्रश्नावर कसा प्रभाव टाकतात हे समजून घेणे, आणि ३) त्या माहितीचे एकत्रित गणिती विश्लेषण करून निर्णय घेण्यास मदत करणे. एएचपीचा प्रथम यशस्वी वापर सुदान देशातील बहुव्यापक परिवहन व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी केला गेला. साटी यांचे The Analytic Hierarchy Process: Planning, Priority Setting, Resource Allocation हे या विषयावरील पहिले पुस्तक प्रकाशित झाले.

आपण एएचपी पद्धत एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा प, फ आणि ब असे वेगवेगळे फायदे-तोटे असलेले नोकरीचे तीन पर्याय आहेत आणि त्यापैकी एकाची निवड करायची आहे. तरी या निर्णय स्थितीत समाधान हे प्रमुख उद्दिष्ट मानता येईल. त्याला व्यक्त करणारे समजा पगार, प्रवास वेळ आणि अनुभव हे तीन घटक त्याच्या खाली मांडता येतील आणि त्यांच्या खाली प, फ आणि ब हे पर्याय मांडून एकूण त्रि-स्तरीय उतरंडीचे चित्र निर्माण करता येईल. नंतर प्रथम पगार, प्रवास वेळ आणि अनुभव हे तीन घटक एकमेकांच्या तुलनेत समाधान देण्यास किती महत्त्वाचे आहेत, हे ठरवायचे आहे. त्यासाठी १ ते ९ ही तौलनिक मोजपट्टी वापरायची. येथे १ म्हणजे दोन्ही घटक प्रभाव देण्यास समान आहेत, ३ म्हणजे एक घटक दुसर्‍यापेक्षा थोडा अधिक महत्त्वाचा आहे, ५ म्हणजे अधिक महत्त्वाचा, ७ म्हणजे निर्णायकी महत्त्वाचा आणि ९ म्हणजे परिपूर्णपणे महत्त्वाचा असा अर्थ आहे. त्यांच्यामधले अंकही वापरता येऊ शकतात. तरी समजा सर्वानुमते पगार हा प्रवास वेळ या घटकापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे असे ठरल्यास, त्या सारणीमधील (१, २) या घरात ५ मांडायचे. पण पगार हा अनुभव या घटकापेक्षा थोडा महत्त्वाचा आहे असे मत आल्यास, सारणीमधील (१, ३) या घरात ३ मांडायचे. अशाप्रकारे समाधानास योगदान हे विचारात घेऊन प्रत्येक घटकाची अन्य घटकांशी तुलना करून ती सारणी तयार करायची. त्याच पद्धतीने प, फ आणि ब यांची एकमेकांशी तुलना पगार, प्रवास वेळ आणि अनुभव या घटकांना क्रमश: लक्षात घेऊन तीन सारणी तयार करता येतील. सारणी बीजगणितातील काही गणिती क्रिया या सर्व सारणींवर करून शेवटी समजा, प (०.५५), फ (०.२४) आणि ब (०.२१) अशी सापेक्ष वजने (वेटेज) मिळाली. याचा अर्थ नोकरीचा प हा पर्याय फ आणि बपेक्षा लक्षणीयपणे श्रेष्ठ ठरला आहे. अर्थातच तुलना सारणीमधील अंक बदलून या निष्कर्षात बदल होतो का, हे तपासता येईल. तुलना कितपत सुसंगत आहे हे देखील गणिती पद्धतीने तपासता येते. मुख्य म्हणजे सारणी निर्मितीमध्ये कोणीही आणि कितीही व्यक्ती भाग घेऊ शकतात आणि त्यासाठी गणित समजण्याची गरज नाही.

प्रत्यक्षात वापरण्यास सोपी तसेच लोकाभिमुख असल्यामुळे एएचपी पद्धतीचे उपयोजन मागील ४० वर्षांत वैयक्तिक ते जागतिक पातळींवर झाले आहे. उदा., शस्त्रास्त्रे नियंत्रण व निशस्त्रीकरण, उद्योग व व्यापार व्यवस्थापन आणि जल नियोजन. साटी यांनी एएनपी (Analytic Network Process – ANP) हे एएचपीचे व्यापकीकरणही केले. त्यात विविध पातळीवरील बाबींचे एकमेकांना केले जाणारे प्रत्याभरण (feedback) देखील समाविष्ट करता येते. त्याचे आणखी एक प्रगत रूप म्हणजे Neural Network Process (NNP), हे तंत्र त्यांनी नंतर विकसित केले. त्यातील गणिती रीतींचा वापर मेंदूतील मज्जासंस्थेच्या प्रक्रिया अभ्यासण्यासाठी केला जाऊ शकतो.

शांतता प्रस्थापन व विवाद सोडवणे हा देखील साटी यांच्या संशोधनाचा विषय राहिलेला आहे. त्या संदर्भात त्यांनी १९८३ मध्ये एक आंतरराष्ट्रीय केंद्र (International Center for Conflict Resolution) स्थापन करण्याची कल्पना मांडली. त्या केंद्राच्या प्रत्येक देशात शाखा असाव्यात आणि त्यात अनुभवी मुत्सद्दी, विचारवंत आणि संशोधक यांनी मिळून विवाद सोडवण्यासाठी नवे मार्ग शोधावेत असे त्यांचे मत होते. त्याबाबत साटीनी जे. एम. अलेक्झांडर यांच्यासोबत Conflict Resolution हे पुस्तक प्रसिद्ध केले.

त्याशिवाय सुबक आणि उत्साहवर्धक वातावरण असलेले शहर कसे असावे याची मांडणी करणारे पुस्तक Compact City: A Plan for a Livable Urban Environment, हे साटी यांनी जॉर्ज बी. दान्त्झिग (George B. Dantzig) यांच्यासोबत प्रसिद्ध केले. शहराने उंचीची मिती आणि काळाची मिती यांचा सक्षम वापर करावा, हा त्याचा गाभा आहे.उदा., शहरांत २४ तास सर्व सेवा उपलब्ध असाव्यात.

गणिताचे उपयोजन अधिकाधिक व्हावे म्हणून साटी नेहेमी प्रयत्नशील असत आणि त्याबाबत, Creative Thinking, Problem Solving and Decision Making हे त्यांचे पुस्तक महत्त्वाचे मानले जाते.

त्यांच्या नावावर ३५ हून अधिक पुस्तके आहेत. त्याशिवाय त्यांचे गणित, रांगेचा सिद्धांत, प्रवर्तन संशोधन, द्यूत सिद्धांत निर्णयशास्त्र आणि विवाद सोडविणे अशा विविध विषयांवर ३५० पेक्षा अधिक लेख आहेत. साटी यांनी १४ विद्यार्थ्यांना पीएच्.डी.साठी मार्गदर्शन केले. त्यांच्या कारकि‍र्दीत ते एकूण १३ जर्नल्सच्या संपादक मंडळावर संपादक, सहसंपादक किंवा सदस्य म्हणून कार्यरत होते.

त्यांना विविध आंतरराष्ट्रीय गणित आणि विज्ञान संस्थांचे सभासदत्व बहाल करण्यात आले होते. साटी यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारात, मॅथेमॅटिकल असोसिएशन ऑफ अमेरिकेचा लिस्टर आर. फोर्ड पुरस्कार, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ मल्टीक्रायटेरिया डिसिजन मेकिंगचे सुवर्ण पदक, जपानच्या क्वालिटी फंक्शन डिप्लोयमेंट इन्स्टिट्यूटचे अकाओ पुरस्कार, इन्फोर्म्स (INFORMS) या संस्थेचे एएचपी विकसनासाठी विशेष पारितोषिक आणि हर्बर्ट सायमन पुरस्कार हे प्रमुख आहेत.

संदर्भ : 

समीक्षक : विवेक पाटकर