येथे चित्रपट आणि रंगभूमी यांतील परस्पर साहचर्य व तुलना यांविषयी चर्चा केलेली आहे. चित्रपटकलेचे द्रव्य म्हणून ज्या दृक्-श्राव्य प्रतिमा वापरल्या जातात, त्यासाठी यंत्र आणि तंत्र यांची आवश्यकता असते. चित्रपट हे माध्यम म्हणजे सर्वांत अलीकडची कला. त्याच्या तुलनेत रंगभूमी म्हणजे एक प्राचीन परंपरा असलेली, संस्कृतीची अंगभूत कला. यांचा एकत्र विचार करताना या दोन कलांचे साम्यभेद लक्षात घेऊन त्यांचे संबंध स्पष्ट केले जातात.

चित्रपटांच्या इतिहासात मूकपट काढताना प्रचलित लोकप्रिय नाटकांवरून कथानक घेऊन, संवादांच्या जागी मोजक्या पाट्या योजून अनेक चित्रपट तयार झाले. त्यामुळे नाटकाचा प्रसंग कॅमेरा समोर ठेवून घडवणे या प्रकारचे ‘पडद्यावरील नाटक’ म्हणजे चित्रपट अशी कल्पना रूढ झाली. जसजसे चित्रपटतंत्र प्रगत होऊन बोलपट आले, तसतसे कॅमेरा वापरण्याचे तंत्रही विकसित झाले आणि नाटकापेक्षा वेगळे कलामाध्यम म्हणून चित्रपटमाध्यमाची जाण विकसित झाली.

लोकप्रिय चित्रपटनिर्मितीत ‘पडद्यावरचे नाटक’ ही कल्पना वेगळ्या प्रकारे टिकून राहिली. कृत्रिम देखावे आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन चित्रीकरण करून मूलत: नाट्यमय घटना-प्रसंग रचण्याचे तंत्र लोकप्रिय झाले. त्याचे परिणाम पात्रांच्या हालचाली आणि त्यांच्या संरचना यांवर झालेले अनेक चित्रपटांत दिसतात. देखावा किंवा रंगभूषा कृत्रिम असल्याचे जाणवत राहते; परंतु पडद्यावरचे नाटक म्हटल्यावर तसे चालवून घेण्यात प्रेक्षकांना काही वावगे वाटत नाही. नाटक ही प्रयोगकला आहे आणि चित्रपट ही प्रयोगकला नाही, हा फरक लक्षात न घेता मनोरंजनाचा व्यवहार चालू राहतो.

रंगभूमीवर प्रयोग होत असतो, तेव्हा नट/नटी त्यांच्या उपस्थितीने आणि अभिनयाने कथाप्रसंगांचे दर्शन घडवतात आणि सूचकार्थाचे ‘प्रक्षेपण’ प्रेक्षकसमूहाला पोहोचेल, अशा प्रकारे करतात. प्रयोगाच्या काळात घटना आणि अन्वय किंवा भाष्य एकत्रित पोहोचवण्याचे काम नट करतात. त्यासाठी भाषेची आणि सादरीकरणाची विविध तंत्रे रंगभूमीच्या इतिहासात विकसित झालेली आहेत.

चित्रपट हे माध्यम हुबेहूब नोंद करणाऱ्या यंत्रांच्या आधारे कलाकृती निर्माण करते. तीत नटाला रंगभूमीवरील नटाप्रमाणे महत्त्व उरत नाही. चित्रपट तयार होतांना १. कॅमेरा तयार करतो ती दृक्प्रतिमा, २. ध्वनिमुद्रणयंत्रे तयार करतात ती श्राव्यप्रतिमा आणि ३. संकलक तयार करतात ती जोडणी आणि अनुक्रम या तीन प्रक्रिया नटाच्या शरीराकृतीचा आणि देहबोलीचा दृश्य स्तर एक घटक म्हणून वापर करतात. दोन मितींत निर्माण होणारी दृक्प्रतिमा दृश्यचौकटीतील रचनेचा भाग म्हणून येते. चित्रीकरण करताना सलग प्रसंग घडत नाहीत. त्यांची अनेक दृश्यांमध्ये (शॉट्स) विभागणी होते. याचा अर्थ, नटाच्या कौशल्याचे आविष्कार वेगळी पद्धत वापरतात. त्यात प्रक्षेपण करण्याची गरज उरत नाही, कॅमेरा जवळ किंवा लांब जाऊन कोणता तपशील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा हे काम करत असतो. त्याचे आविष्कारमूल्य चलत् आकृतिबंधात जे स्थान आणि इतर घटकांशी संबंध निर्माण होतील, त्यावरून ठरते.

दिग्दर्शक ध्वनीचे अनेक प्रकार वापरत असतो. संवाद किंवा नटाने उच्चारलेला शब्द याखेरीज इतर ध्वनी आणि काही वेळा पार्श्वसंगीत चित्रखंडास (दृश्यास) जोडले जातात. यातून निर्माण होणा-या दृक्-श्राव्य प्रतिमेत वेगळी सूचनक्षमता असते. कथनातील पुढचे-मागचे संबंध त्यांपैकी कोणत्याही तपशिलाने सांधण्याचा निर्णय दिग्दर्शक घेत असतो. श्राव्यात स्वत:च्याच आवाजाची सलगता नटला रंगभूमीवर उपलब्ध असते आणि इतर नटांचे आवाज उपस्थित असतात. हे आधार चित्रीकरणाच्या वेळी उपलब्ध नसतात आणि अनेक निर्णय नटाच्या हातीही नसतात.

संकलन प्रक्रिया चित्रपटाचे अंतिम रूप ठरवत असते. नटाचे कोणते दृश्य कुठे व कसे जोडले जाईल, यावरून त्या दृश्याने साधलेला परिणाम ठरतो. यात नटाला काही घडवायचे नसते. यामुळे कॅमेरा या यंत्रापुढे अभिनय करून दृश्य दिले की, नटाचा प्रभाव काय आणि कसा पडेल हे अन्य तांत्रिक प्रक्रिया ठरवतात.

चित्रपटात नटाचे महत्त्व असते, ते कथानकातील पात्र दृश्य रूपात सादर करण्याचे साधन म्हणून. त्याचे बोलणे-वागणे पात्रानुरूप असावे लागते, अतिशय सूक्ष्म तपशिलात त्याला लक्ष घालावे लागते. रंगभूमीवर प्रयोग करण्यापूर्वी नाटकाचा दिग्दर्शक संहितेतील आशयसूत्रांची अभिव्यक्ती कशी साध्य करावी, याचा सराव नटवर्गाकडून करून घेतो. चित्रपटदिग्दर्शक याचा विचार इतर अनेक यंत्र-तंत्र हाताशी घेऊन करू शकतो.

चित्रपटाच्या इतिहासात, सुरुवातीला पडद्यावरचे नाटक ‘अगदी दहा मिनिटांत हॅम्लेट’ अशा प्रकारे आलेले दिसते. मूकपट बनवताना स्त्रीभूमिका करण्यासाठी पुरुषनट दादासाहेब फाळके यांनी वापरले. ते मराठी रंगभूमीवरचे एका मान्य संकेताचे अनुकरण होते. पहिले दृश्य पडद्याचे, मग घंटा आणि पडदा उघडून सुरुवात ही रीतही चित्रित झालेली आहे. नव्या नवलाईच्या काळात प्रेक्षक तेही बघत गेले. पुढे मात्र ‘चित्रित नाटक’ (Filmed Theater) ही अधिक प्रमाणात चित्रपट माध्यमाची बलस्थाने वापरणारी पद्धत विकसित झाली आणि स्थिरावली. अनेक नाटकांवरून चित्रपट निघत राहिले; परंतु पुढे जाऊन चित्रपट काढताना नाटकापासून चित्रपटाकडे ही माध्यमांतराची यशस्वी प्रक्रिया करणारे कलावंत समोर आले.