सिरम इन्स्टिट्यूट लॅबोरेटरी, पुणे.

सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लि. : (स्थापना – १९६६) सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लि. ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादन करणारी संस्था आहे. जगभरात या संस्थेमध्ये बनवलेल्या लसींच्या मात्रेचा (Dose) आकडा १५० कोटी (१.५ अब्ज ) एवढा आहे. यामध्ये पोलिओ, घटसर्प,  धनुर्वात, डांग्या खोकला, बीसीजी, हीमोफिलस एन्फ्लुएंझा (Hib), हिपॅटायटिस बी- विषाणूजन्य कावीळ, गोवर, गालगुंड (mumps), रुबेला आणि रोटाव्हायरस या रोगांसाठीच्या लसी आहेत. या यादीमध्ये कोव्हिड-१९ वर शोधलेल्या लशीची भर पडलेली आहे. एका पाहणीनुसार जगातील ६५% बालकांना सिरम इंस्टिट्यूटमध्ये उत्पादन केलेली एकतरी लस आयुष्यात दिलेली असते. या संस्थेतील लसींना जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली असून एकशे सत्तर देशामध्ये या संस्थेची उत्पादने वापरली जातात. कोट्यावधी लोकांना लसीमुळे संसर्गजन्य रोगापासून संरक्षण  मिळाले आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ही भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची कंपनी असून जनुकीय व पेशी तंत्रज्ञान वापरून वैद्यकीय उपचारासाठी सिरम प्रतिद्रव्ये  (Antisera)  उत्पादित करते .

सायरस पूनावाला यांनी १९६६ साली जीवरक्षक प्रतिद्रव्ये भारतात मोठ्या प्रमाणात भरमसाठ किमतीला आयात करावी लागतात हे पाहून सामान्य व्यक्तीस ही माफक किमतीस उपलब्ध व्हावीत या हेतूने सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्यांच्या प्रयत्नामुळे धनुर्वात, सर्पविष प्रतिद्रव्ये , डीपीटी म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात (Diphtheria, Pertussis , Tetanus  –DPT) लसी उपलब्ध होऊ लागल्या. त्यानंतर एमएमआर (MMR – Measles, Mumps and Rubella)  म्हणजे गोवर, कांजिण्या आणि जर्मन गोवर या  लसीचे उत्पादन सुरू केले.

कंपनीच्या सेवाभावी वृत्तीमुळे नव्या लसींच्या किमती कमी करण्यासाठी हिपाटायटीस – बी व एकत्र देण्यात येणार्‍या लसी उत्पादित करण्यास प्रारंभ केला. जन्मापासून लसीकरण करण्याच्या प्रयत्नाने तिसर्‍या जगातील बालकांना या लसी मिळू लागल्या.

सिरम इन्स्टिट्यूटने २९ जून २०१२ या दिवशी बिल्थोवन बायॉलॉजिकल्स (Bilthoven- Netherlands) या नावाने जैवतंत्रज्ञान व औषध निर्मिती कंपनी उभारली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर लसीच्या उत्पादनास सिरम इन्स्टिट्यूटने प्रारंभ केला. नेदरलॅन्ड शासनाने केलेल्या विनंतीमुळे या लस उत्पादन केंद्रात आयपीव्ही (साल्क)  म्हणजे अंत:क्षेपणाद्वारे (इंजेक्शन) दिली जाणारी पोलिओ लस बनवण्यास सुरुवात केली. येथे दरवर्षी वीस लाख पोलिओ अंत:क्षेपण करता येइल इतकी लस तयार करता येते. पोलिओ लस तोंडाने देण्यासारखी यापूर्वी व इंजेक्शनने देण्यासारखी अशा दोन प्रकारच्या बनवता येतात. जोनास साल्क या वैज्ञानिकाच्या नावाने ही लस ओळखण्यात येते. जगभरात ही लस फक्त तीन ठिकाणी बनवता येत होती. त्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या नेदरलॅन्ड शाखेचा समावेश करण्यात आला. जगभरातील बालकांना ही लस यूरोपातील कारखान्यातून उपलब्ध झाल्याने जगातून पोलिओ निर्मूलन करण्यास  मदत झाली. यामुळे यूरोपच्या बाजारात भारतीय मूळ कंपनीच्या व्यापारी उत्पादनास पाय ठेवता आला.

सायरस पूनावाला ग्रुपची तिसरी शाखा झेक रिपब्लिकमध्ये (झेकोस्लावाकिया) प्राहा व्हॅक्सीन या नावाने एप्रिल २०१७ मध्ये सुरू झाली. अत्यंत आधुनिक व उच्च तांत्रिक बाबी सांभाळून यूरोपियन युनियन व यूएस प्रमाणीकरणाच्या चाचण्यातून  (एफडीए – फूड अँड ड्रग यू एस FDA) यशस्वी होतील अशी उत्पादने येथे तयार होत आहेत.

मार्च २०२० मध्ये जगात धुमाकूळ घातलेल्या सार्स-कोवि-२ (SARS-CoV-2) विषाणूवरील लस ऑक्सफोर्डमधील जेन्नर इन्स्टिट्यूटमध्ये बनवली गेली. ऱ्हीसस माकडावरील याच्या चाचण्या यशस्वी झाल्यावर काही मानवी स्वयंसेवकावर ऑक्सफोर्डमधील वैज्ञानिकांना प्रयोग करण्याची परवानगी देण्यात आली. जगातील सात लस उत्पादक संस्थांपैकी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेस  सार्स-कोवि-२ विषाणू विरुद्धच्या लसीचे उत्पादन करण्यासाठीचा परवाना मिळाला आहे. सहा आठवड्यात दहा लाख मात्रा (डोस) तयार करण्याची  सिरम इन्स्टिट्यूटने तयारी दर्शवली आहे. सप्टेंबर महिन्यात मानवी चाचण्या पूर्ण झाल्यावर सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार झालेल्या लसी कोव्हिड-१९ आजारावर प्रतिबंधक ठरतील. जर या चाचण्यातून लसीमध्ये बदल करण्याचे ठरले तर केलेले उत्पादन नष्ट करून नव्याने लस उत्पादन करण्याची तयारी संस्थेने दाखवलेली आहे. यामागील हेतू शक्यतो लवकर लस उपलब्ध व्हावी हा आहे.

नजीकच्या भविष्यात पूनावाला बायोटेक पार्कचा विस्तार सतरा हेक्टरात होणार असून त्या ठिकाणी यूएस एफडीए, एमएचआरए (मेडिसीन अँड हेल्थकेअर प्रॉडक्टस रेग्युलेटरी एजन्सी – Medicine and Healthcare Products Regulatory Agency- UK), यूरोप, जपान आणि ऑस्ट्रेलियामधील नियामक संस्थांच्या मार्गदर्शनाखाली एचपीव्ही (हयूमन पॅपिलोमा व्हायरस HPV), डीपीटी म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात, रोटाव्हायरस, आणि बीसीजी लसीचे उत्पादन सुरू होणार आहे. यातील एचपीव्ही लसीमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिबंध होणार आहे. स्वयंचलित यंत्रणेद्वारे ही उत्पादने कुपीमध्ये (Vial) भरली जाऊन विशिष्ट तापमानास साठवून हव्या त्या ठिकाणी पाठवणे शक्य होणार आहे.

सन २०१९-२० या वर्षांत कोव्हीड-१९ या विषाणुमुळे जगभरात पसरलेल्या जीवघेण्या महामारीत सिरम इन्स्टिट्यूटने अत्यंत वेगाने कोव्हीड-१९ वरची ‘कोव्हिशिल्ड’ (ChAdOx1 nCoV-19 Corona Virus Vaccine (Recombinant) COVISHIELD™) या नावाची लस शोधून काढली आणि भारतभर लसीकरणाची मोहीम राबविली. या पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा बजाविणाऱ्या जवळपास बारा कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. तसेच भारताने नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, मॉरिशस, ब्राझील आदी देशांना ही लस निर्यात केली आहे.

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी