बॉर्डेट, जूल्स जीन बाप्टिस्ट व्हिन्सेंट : (१३ जून १८७० – ६ एप्रिल १९६१) जूल्स जीन बाप्टिस्ट व्हिन्सेंट बॉर्डेट यांचा जन्म बेल्जियम येथे फाइनिफ येथे झाला. ब्रुसेल्स येथील फ्री विद्यापीठातून त्यांनी डॉक्टर मिळवली. नंतर त्यांनी पॅरिस येथील पाश्चर संस्थेत इल्या मेचनिकाव्ह यांच्या प्रयोगशाळेत संशोधन कार्याला सुरुवात केली. मेचनिकाव्ह यांनी जिवाणूभक्षी पांढर्‍या पेशींचा शोध लावून पेशी पातळीवर माणसाची प्रतिकारक्षमता कशी कार्य करते हे शोधून काढले होते.

सात वर्षांच्या पाश्चर संस्थेतील वास्तव्यात त्यांनी माणसाच्या प्रतिकारकशक्ती संदर्भात संशोधन केले. जर्मन शास्त्रज्ञ रिचर्ड फेफर यांनी असा शोध लावला होता की जर कॉलऱ्याचे जीवाणू लसीकरण केलेल्या गिनीपिगच्या अंतर पोकळीत टोचले तर जिवाणूंचे स्वविलयन होते (Bacteriolysis). कारण लसीकरण केलेल्या गिनीपिगच्या शरीरात प्रतिपिंडे तयार झालेली असतात. या प्रतिपिंडांची कॉलऱ्याचे जिवाणूरूपी प्रतिजनांशी प्रक्रिया होऊन जीवणूंचे स्वविलयन होते. बॉर्डेट यांच्या असे लक्षात आले की गिनीपिगचे लसीकरण केलेले नसेल तर जिवाणूंचे स्वविलयन होत नाही. याचे कारण असे की गिनीपिगच्या रक्तात प्रतिपिंडे नसतात. परंतु त्याच गिनीपिगमध्ये लसीकरण केलेल्या प्राण्यातील रक्तद्रव टोचला तर मात्र जीवाणूंचे स्वविलयन होते. अर्थातच असे होण्याचे कारण असे की लसीकरण केलेल्या प्राण्यातील रक्तद्रवात प्रतिपिंडे असतात. प्रतिपिंड-प्रतिजन प्रक्रिया होते आणि जिवाणूंचे स्वविलयन होते.

बॉर्डेटने प्रतिपिंडे असलेला रक्तद्रव ५५ डिग्री सेल्शियस तापमानाला तापवला व तो ‘अ’ प्राण्याला टोचला तर त्याची जिवाणूमारक शक्ति नष्ट झाली असल्याचे त्याच्या लक्षात आले. परंतु त्याला हेही आढळून आले की लशीकरण न केलेल्या प्राण्याचा ताजा रक्तद्रव त्याच ‘अ’ प्राण्यात टोचल्यास जिवाणूंचे स्वविलयन झाले. या प्रयोगाद्वारे त्याने असा सिद्धांत मांडला की जिवाणूंचे स्वविलयन हे दोन स्वतंत्र घटकांच्या एकत्रित क्रियेने घडते. एक म्हणजे रक्तद्रवात निर्माण झालेले प्रतिपिंड. ही प्रतिपिंडे त्या विशिष्ट प्रकारच्या जिवाणूविरुद्ध कार्य करतात. आणि दुसरा पदार्थ जो प्रत्येक प्राण्याच्या रक्तद्रवात असतो, तो विशिष्ट प्रकारचा नसतो आणि उष्णतेस संवेदनशील असतो. अशा या पदार्थाला त्यांनी ॲलेक्सिन असे नाव दिले. त्यालाच नंतर कॉमप्लिमेंट म्हणून ओळखू लागले. कॉमप्लिमेंट ही प्रत्येक माणसाच्या रक्तद्रवात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेली ग्लोब्युलर प्रथिने आहेत. ही प्रथिने जेव्हा जीवाणू, रक्तपेशी किंवा इतर पेशींच्या पृष्ठभागावर असतात तेव्हा त्या पेशींचे विलयन होते. ही प्रथिने प्रतिपिंड-प्रतिजन कॉम्प्लेक्स वरतीच घट्ट चिटकून बसतात. केवळ प्रतिजन किंवा प्रतिपिंड यांना स्वतंत्रपणे ती पूरक नसतात.

बॉर्डेट यांनी असा शोध लावला की मिळवलेल्या (Acquired) विशिष्ट प्रतिपिंडांचा जिवाणूनाशक परिणाम हा अॅलेक्सिन या पेशीद्रवातील रसायनामुळे वाढवता येतो. चार वर्षानंतर त्यांनी अशाच एका कॉमप्लिमेंटच्या सहाय्याने मानवी शरीरात घडणार्‍या विनाशकारी प्रक्रियेचा शोध लावला. त्याचे नाव हिमोलायसिस, म्हणजेच लाल रक्तपेशींचे फुटणे. या प्रक्रियेत व्यक्तीच्या प्रतिकारक्षम रक्तद्रवात जर परदेशी लाल रक्तपेशी मिसळल्या तर त्या फुटतात.

बॉर्डेट यांनी पॅरिस सोडले आणि ब्रुसेल्समध्ये पाश्चर संस्थेची स्थापना केली. तेथे त्यांनी कॉमप्लिमेंटच्या प्रक्रियेची यंत्रणा शरीरात कशी काम करते याचा  सखोल अभ्यास केला. या अभ्यासातूनच पुढे पूरक निर्धारण चाचणी पद्धती (complement-fixation test) विकसित झाली. या चाचणी पद्धतीचा वापर करून ऑगस्ट व्हॉन वॉसरमन या शास्त्रज्ञाने सिफिलिस या गुप्तरोगनिदानासाठी सेरोलॉजिकल पद्धत विकसित केली. ही पद्धत सध्या वॉसरमन चाचणी म्हणून अनेक इतर रोगनिदानासाठी सेरोलॉजिकल पद्धत म्हणून प्रसिद्ध आहे.

बॉर्डेट यांनी लिहिलेले महत्वपूर्ण शोध निबंध असे :

  • Studies of the antigen-antibody reaction;
  • The discovery of the whooping cough agent (1906) in his young daughter who suffered from this infectious disease (work in collaboration with this brother-in-law Octave Gengou);
  • Avian diphtery;
  • The description of the agent of the bovine pleuropneumonia;
  • Studies about the complement-fixation testing methods, allowing the development of serological tests for syphilis (specifically, the development of the Wassermann test by August von Wassermann; the same technique is used today in serologic testing for countless other diseases);
  • Studies on bacteriophages.

ऑक्टेव्ह जेंगू यांच्या सहकार्याने त्यांनी डांग्या खोकला या रोगाच्या जिवाणूला शुद्ध अवस्थेत वेगळे करण्यात यश मिळवले. या जिवाणूचे  नामकरण बॉर्डेटे यांच्या नावे बॉर्डेटेल्ला पर्ट्युसिस (Bordetella pertussis)  असे करण्यात आले. जिवाणूच्या एका वंशावळीस त्यांचं ‘बॉर्डेटेल्ला’ हे नाव देण्यात आलं. बॉर्डेटे लिब्रे दे ब्रुक्सेलेस [Université Libre de Bruxelles] विद्यापीठात जिवाणूशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

बॉर्डेटे यांना रॉयल सोसायटीचे परदेशस्थ सदस्यत्व मिळाले. क्रुनियन व्याख्यानात त्यांनी असे विधान केले की फेलिक्स डी’हॅरेले यांनी शोधलेले जिवाणूभक्षक विषाणू (Bacteriphage) अस्तित्वातच नाहीत. हे जीवाणू स्वविलयन (Autolysis) पद्धतीने नष्ट होतात. परंतु रुस्का यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली घेतलेले जिवाणूभक्षक विषाणूचे चित्र प्रसिद्ध करून बॉर्डेटे यांचा सिद्धांत खोटा ठरवला.

बॉर्डेटे यांना पूरक निर्धारण चाचणी पद्धतीच्या शोधासाठी वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना बेल्जियमच्या रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स, लेटर्स अँड फाईन आर्ट्सचे सदस्यत्व, औषधोपचार पद्धतीसाठी दिले जाणारे एडिंबर्ग विद्यापीठाचे कॅमेरॉन परितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. ब्रुसेल्स येथील एका रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

ब्रुसेल्स येथे त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :

समीक्षक : रोहिणी पांढरे