सफेद मुसळी ही उष्ण प्रदेशाच्या आर्द्र वनातील वनस्पती आहे. ती ॲस्पॅरागेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लोरोफायटम बोरिविलियानम आहे. चोपचिनी ही वनस्पतीही ॲस्पॅरागेसी याच कुलातील आहे. सफेद मुसळी मूळची भारतातील असून हिमालयातील उपोष्ण वनात आणि आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तराखंड व महाराष्ट्र या राज्यांतील वनांमध्ये आढळते. तिच्या औषधी गुणधर्मांमुळे महाराष्ट्र तसेच अन्य काही राज्यांत तिची लागवड केली जाते.
सफेद मुसळी हे वर्षायू झुडूप ३०–५० सेंमी. उंच वाढते. त्याची मुळे जमिनीखाली लांबवर पसरलेली असून त्यांचा आकार लंबगोलाकार असतो. पाने अवृंत व क्वचित लहान देठाची असून ती मूलज म्हणजे मुळापासून निघालेली वाटतात. पाने १५–४५ सेंमी. लांब व १·५–३·५ सेंमी. रुंद असतात. ती आकाराने भाल्यासारखी असून रोमल असतात. पानांची टोके जमिनीला स्पर्श करू लागली, की त्यांपासून आगंतुक मुळे आणि नवीन रोप तयार होते. फुलोरा पानांच्या बगलेत व असीमाक्ष प्रकारचा असतो. फुले लहान, पांढरी व सवृंत असतात. फुलोऱ्यात वरच्या टोकाला पुंकेसरी फुले असतात, तर खालच्या टोकाला द्विलिंगी फुले असतात. चक्राकार संयुक्त सहा परिदले असलेल्या फुलात पुमांग सहा असून ते परिदलपुंजाला चिकटलेले असतात. परागकोश पुंकेसराच्या वृंतापेक्षा लांब असतो. जायांग पुंकेसरापेक्षा लांब (मोठे) असते आणि कुक्षीची रचना पुंकेसराच्या विरुद्ध दिशेला असते. अंडाशय संयुक्त आणि ऊर्ध्वस्थ असते. कुक्षी तीन भागांत विभागलेली असते. फळ पेटिका प्रकारचे असून त्यात चार काळ्या, लंबगोल आणि चकचकीत बिया असतात. बियांना चोचीसारखी बारीक खाच असते.
आयुर्वेदिक औषधांमध्ये सफेद मुसळीचा उपयोग केला जातो. मुसळीत २५ प्रकारची अल्कलॉइडे, जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने (५–१०%), कर्बोदके (३५–४५%), तंतू (२०–३०%), बहुशर्करा (४०–४५%) आणि सॅपोनीन (२–१५%) असते. सॅपोनीन कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्यामुळे अनेक औषधांमध्ये त्याचा वापर होतो. सफेद मुसळी पित्तनाशक आहे, परंतु कफकारक आहे. तिची भुकटी दुधात किंवा मधात मिसळून चेहेऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो. इतर सामान्य वनस्पतींप्रमाणे सफेद मुसळी वाहून नेण्यास बंदी आहे, कारण ती वनोपज असल्यामुळे वनाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते.