मूळ हा संवहनी वनस्पतीचा असा अवयव आहे जो सामान्यपणे जमिनीखाली वाढतो. वनस्पतीला जमिनीत घट्ट रोवून धरणे, जमिनीतील पाणी व विरघळलेली खनिजे शोषून खोडापर्यंत वाहून नेणे आणि अन्न साठवून ठेवणे ही मुळाची मुख्य कार्ये आहेत. काही मुळे अंशत: किंवा पूर्णपणे हवेत असतात. काही खोडेही (मूलक्षोड) जमिनीखाली वाढतात. अशी खोडे आणि मुळे यांच्यात काही फरक असतात; मुळांवर पर्णव्रण आणि कलिका नसतात. तसेच मुळांना मूलटोपी असते आणि त्यांच्या शाखा कलिकांपासून न फुटता आतील ऊतींपासून निर्माण झालेल्या असतात.
जेव्हा बीजाचे अंकुरण होते तेव्हा पहिल्यांदा मूळ म्हणजे मूलांकुर निर्माण होते. ते मातीत घुसते, वाढते आणि रोपाला मातीत घट्ट धरून ठेवते. अनावृतबीजी तसेच द्विदलिकित वनस्पतींमध्ये मूलांकुरापासून सोटमूळ बनते. सोटमूळ खालच्या दिशेने वाढते. त्याला बाजूनेही शाखा फुटतात. मुळांच्या अशा संस्थेला ‘सोटमूळ संस्था’ म्हणतात. गाजर, टर्निप इ. वनस्पतींच्या सोटमुळांमध्ये अन्न साठलेले असल्याने ते फुगीर असते. एकदलिकित वनस्पतींमध्ये मुळांचे जाळे वाढलेले दिसते. अंकुरण होताना तयार झालेले प्राथमिक मूळ गळून पडते आणि खोडाच्या तळापासून मुळांचे जाळे उद्भवते. ही मुळे तंतुमय असतात. मुळांच्या अशा संस्थेला ‘तंतुमय मूळसंस्था’ म्हणतात. उदा., गवत.
सोटमुळाखेरीज वनस्पतींच्या अन्य कोणत्याही भागापासून वाढलेल्या मुळांना ‘आगंतुक मुळे’ म्हणतात. भूमिगत खोडांवर आगंतुक मुळे मोठ्या संख्येने असतात. आगंतुक मुळे तयार होत असल्याने अनेक वनस्पतींचा खोड किंवा पानांपासून शाकीय प्रसार होतो.
मुळाची संरचना : मुळाचे मूलटोपी, विभाजी ऊती, दीर्घीकरण ऊती आणि परिपक्वन ऊती हे भाग असतात. मुळाच्या टोकाला टोपणासारखा भाग असतो, त्याला ‘मूलटोपी’ किंवा ‘मूलगोप’ म्हणतात. मूळ जमिनीत शिरताना मूलटोपीमुळे मुळाच्या नाजूक टोकाचे संरक्षण होते. जमीन खडकाळ किंवा कठीण असल्यास या भागातील ऊतींची झीज होते आणि नव्याने तयार झालेल्या पेशी झिजलेल्या पेशींची जागा घेतात. जलीय वनस्पतींच्या मुळांवर मूलटोपी नसते. मूलटोपीच्या किंचित मागे विभाजी ऊती असून या भागातील पेशींचे विभाजन सतत होत असते. या पेशी लहान, पातळ भित्तिका असलेल्या आणि पेशीद्रव्याने समृद्ध असतात. विभाजी ऊतींच्या मागे दीर्घीकरण ऊतींचा भाग असतो. या भागातील पेशी वेगाने लांब होत असल्यामुळे मुळांची लांबी वाढते. दीर्घीकरण ऊतींच्या मागे परिपक्वन ऊतींचा भाग असतो. या भागातील पेशींच्या विभाजनापासून विविध प्रकारच्या प्राथमिक ऊती तयार होतात.
मुळाचा आडवा छेद : मुळामध्ये बाहेरून आत अधिचर्म (बाह्यस्तर), वल्कुट (मध्यस्तर) आणि संवहनी पूल (संवहनी चिती) या प्रमुख ऊती असतात. अधिचर्म पातळ भित्तिकामय पेशींचा बनलेला असून हा स्तर एकपेशीय असतो. अधिचर्माच्या पेशीभित्तिकांपासून निमुळते व नळ्यांसारखे मूलकेस वाढलेले असतात. मूलकेसांद्वारे खनिजे व पाणी मुख्यत्वे परासरण क्रियेने शोषले जाते; परासरण होण्याचे एक कारण हे की, मातीतील पाण्याची संहती (प्रमाण) अधिचर्मातील पाण्याच्या संहतीपेक्षा जास्त असते आणि दुसरे हे की, अधिचर्म पेशींचे पटल अर्धपार्य असते, जे पाण्याला आत येऊ देते, परंतु अन्य विरघळलेल्या पदार्थांना येऊ देत नाही. पाणी मुळांमध्ये शिरल्यामुळे अधिचर्मात परासरण दाबाचा प्रवण (ग्रेडिएण्ट) तयार होऊन मुळांतून पाणी वर चढते. गुरुत्वाच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या या बलाला मूलदाब म्हणतात. मुळांतील पाणी पानापर्यंत पोहोचण्यामागे मूलदाब अंशत: कारणीभूत असतो. मात्र उंच वनस्पतीच्या शेंड्यापर्यंत पाणी वर कसे पोहोचते याचा उलगडा मूलदाबाशिवाय अन्य कारणेही लक्षात घेतल्याशिवाय होऊ शकत नाही.
अधिचर्मात शिरलेले पाणी व खनिजे संवहनी पूलाकडे वाहून नेण्याचे कार्य वल्कुट करते. वल्कुटामार्फत पाणी वनस्पतीच्या सर्व भागांकडे वाहून नेले जाते. पानांपासून आलेले अन्न वल्कुटामध्ये साठविले जाते. मुळांच्या सर्वांत आतील स्तराला ‘अंतश्चर्म’ किंवा ‘अंत:स्तर’ म्हणतात. यातील पेशी दाटीवाटीने रचलेल्या असतात. अंतश्चर्माद्वारे वल्कुट आणि संवहनी ऊती यांमध्ये वाहणाऱ्या पदार्थांचे नियमन होते.
अंतश्चर्म स्तराच्या आत संवहनी पूल असतात. संवहनी पूल एका पेशीस्तराने वेढलेले असतात, त्याला ‘परिरंभ’ म्हणतात. आकृतीत मुळाचा आडवा छेद दाखविला आहे. छेदाच्या मध्यभागी संवहनी पुलातील वाहक ऊतींची ताऱ्याच्या आकाराची मांडणी दिसून येते. ताऱ्याच्या आत पाणी व खनिजे यांचे वहन करणाऱ्या काष्ठ ऊती (झायलेम) असतात; ताऱ्याच्या बाहेर, त्याच्या शिरोबिंदूंच्या दरम्यान, लहान गटात अन्न वाहून नेणाऱ्या अधोवाही ऊती (फ्लोएम) असतात.
मुळांची वाढ व त्यांचा विस्तार : मुळांमध्ये तीन प्रकारे वाढ घडून येते; मुळांची लांबी वाढते व प्राथमिक ऊती तयार होतात, यास प्राथमिक वाढ म्हणतात. यांखेरीज परिरंभातून शाखा तयार होण्याची क्रिया होत असते व परिरंभात असलेल्या विभाजी ऊतींपासून मूलटोपी व अन्य ऊती तयार होतात. वाढीच्या आणखी एका क्रियेत काष्ठी वनस्पतींच्या जुन्या व पक्व झालेल्या मुळांपासून दुय्यम ऊती बनतात. त्यामुळे मुळांचा घेर वाढतो. मुळांच्या वाढीच्या या दुय्यम प्रक्रियेत काष्ठ ऊती व अधोवाही ऊती यांच्या दरम्यान असलेल्या विभाजी पेशींपासून ‘संवहनी एधा’ नावाची ऊती तयार होते. ही ऊती जशी विकसित होते तशी ती संवहनी पूलाभोवती कडे तयार करते. संवहनी एधातील पेशींचे विभाजन होऊन कड्याच्या आत दुय्यम काष्ठ ऊती बनते आणि कड्याबाहेर दुय्यम अधोवाही ऊती बनते. या ऊती वाढल्यामुळे परिरंभ बाहेर ढकलले जाते आणि वल्कुट व अधिचर्म दुभंगते. परिरंभाचे रूपांतर त्वक्षा एधा नावाच्या ऊतीमध्ये होते. या ऊतीपासून त्वक्षा म्हणजे साल बनते.
वनस्पतीची जाती, मातीचा भुसभुशीतपणा आणि मातीतील पोषकघटक यांवर मुळांचा विस्तार अवलंबून असतो. मुळांचा अभ्यास करताना मुळांच्या शाखा, शाखांचे स्वरूप, शाखांमधील अंतर, मुळांचा व्यास इ. बाबी विचारात घेतात. या सर्व बाबींचे नियमन पर्यावरणीय संवेदाला वनस्पतीकडून मिळणारा प्रतिसाद आणि जनुकीय प्रतिसाद यांच्या आंतरक्रियेवर अवलंबून असते. ऑक्झीन, सायटोकायनीन, जिबरेलीन व एथिलीन या संप्रेरकांवर तसेच पाणी, ऑक्सिजन व नायट्रोजन यांची उपलब्धता, प्रकाश, गुरुत्व इ. घटकांवर मुळांचा विस्तार अवलंबून असतो. संवहनी वनस्पतींची मुळे व काही कवके यांच्यात सहजीवन आढळते. अशी कवके मुळांवरील लहान मूलिकांवर वाढतात व गाठी तयार करतात; त्यांना ‘मूलकवके’ म्हणतात. त्यामुळे मुळांचा पृष्ठभाग वाढला जाऊन पाणी व खनिजे अधिक प्रमाणात शोषली जातात, तर वनस्पती या कवकांना ग्लुकोज व सुक्रोज या शर्करा पुरवितात. मुळे सामान्यपणे प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने आणि पाण्याच्या व गुरुत्वाच्या दिशेने वाढतात. वाळवंट व समशीतोष्ण शंकुधारी वनांमध्ये मुळे जमिनीत खोलवर जातात. कालाहारी वाळवंट, ऑस्ट्रेलियन वाळवंट, ॲरिझोना वाळवंट येथील काही जिवंत वृक्षांची मुळे सु. ६० मी. खोल वाढल्याचे दिसून आले आहे. टंड्रा, हिमवने आणि समशीतोष्ण तृणभूमीसारख्या प्रदेशात मुळे खोल जात नाहीत. गुरुत्वीय दिशेने होणाऱ्या वाढीमागे मुळांच्या टोकाशी वाढलेले ऑक्झीनचे प्रमाण कारणीभूत असते.
मुळांचे प्रकार : वनस्पतीला जमिनीत धरून ठेवणे, जमिनीतील पाणी व खनिजे शोषून घेणे इ. कार्यांखेरीज मुळे अन्य विविध कार्ये करतात. त्यासाठी मुळांमध्ये रूपांतर घडून आलेले असते. अशी परिवर्तित (रूपांतरित) मुळे सोटमूळ व आगंतुक मूळ या दोन्ही संस्थांमध्ये दिसून येतात.
परिवर्तित सोटमुळे : अन्नसंचयामुळे अनेकदा सोटमूळ फुगीर व मांसल बनते. अशा मुळांना भिन्नभिन्न आकार प्राप्त होतो. उदा., मुळ्याचे मूळ विटीसारखे, गाजराचे शंकूसारखे व बीटाचे भोवऱ्यासारखे दिसते. गुलबक्षीचे मूळ मांसल असून त्याला कोणताही विशिष्ट आकार नसतो. अशा मुळांना ‘आकंद मुळे’ म्हणतात.
ऱ्हायझोफोरा व ॲव्हिसिनिया या प्रजाती समुद्रकिनारी व सुंदरबनसारख्या दलदलीच्या ठिकाणी वाढतात. या वनस्पतींना श्वसनासाठी हवेची गरज असते. पाणथळ जागेत हवा मिळत नसल्यामुळे या वनस्पतींची मुळे पाण्यातून वा चिखलातून हवेच्या दिशेने वाढतात आणि काट्यांप्रमाणे दिसतात. काही वनस्पतींमध्ये मुळे बहुधा झाडाच्या बुंध्याभोवती मोठ्या संख्येने वाढतात. या मुळांवर श्वसनासाठी छिद्रे म्हणजे वातरंध्रे असतात, त्यांना ‘श्वसन-मुळे’ म्हणतात.
परिवर्तित आगंतुक मुळे : आगंतुक मुळांचेही विविध प्रकारे रूपांतर झालेले असते. रताळ्याचे मूळ अन्नसंचयामुळे मांसल झालेले असून ते आकाराने ओबडधोबड असते; या मूळावर मुकूल असतात आणि त्यांच्यापासून शाकीय पुनरुत्पादन होते. डेलिया, शतावरी इ. वनस्पतींमध्ये खोडाच्या खालच्या भागात कित्येक मांसल मुळे गुच्छाने असतात; अशा मुळांना ‘पूलित मुळे’ म्हणतात. आंबेहळद, हळद, आरारूट इत्यादींची निमुळती होत गेलेली मुळे टोकाला मांसल असतात; त्यांना ‘ग्रंथिल मुळे’ म्हणतात. चिनी गुलाब, कवठ इ. वनस्पतींची मुळे ठरावीक अंतरावर मण्यांसारखी फुगलेली दिसतात; त्यांना ‘मणेरी मुळे’ म्हणतात. टॅपिओकासारख्या वनस्पतींची मुळे मांसल वलयांपासून बनलेली दिसतात; त्यांना ‘वलयी मुळे’ म्हणतात. वड, रबर, केवडा, खारफुटी इ. वनस्पतींमध्ये आधारासाठी खोडांपासून किंवा फांद्यांपासून मुळे फुटलेली असतात. ती मुळे फांदीपासून लांब वाढतात आणि जमिनीत घुसून स्तंभाप्रमाणे वनस्पतीला आधार देतात; त्यांना ‘अवस्तंभ मुळे’ म्हणतात. नागवेल, पिंपळी, काळी मिरी, पोथॉस इ. वनस्पतींमध्ये पर्णवृतांपासून किंवा पेरांपासून आरोही मुळे येतात; ही मुळे लगतच्या वस्तूला पकडून वनस्पतीला वाढायला मदत करतात. काही विशाल वृक्षांमध्ये काही मुळे बुंध्यापासून जमिनीत वाढतात आणि पुन्हा जमिनीबाहेर येऊन जमिनीलगत लांब वाढत जातात. त्यांना ‘आधार-मुळे’ म्हणतात. लाल सावर, देशी बदाम, बेहेडा इत्यादींच्या बुंध्यांजवळ उभ्या फळ्यांप्रमाणे अशी आधार मुळे वाढलेली दिसतात.
काही वनस्पतींमध्ये जीवनावश्यक कारणांसाठी मुळांमध्ये रूपांतर घडून येते. उदा., जुसिया या जलवनस्पतीची मुळे मऊ, हलकी व सुषिर असल्यामुळे ती पाण्यावर तरंगतात आणि श्वसनास मदत करतात; त्यांनाही ‘श्वसन-मुळे’ म्हणतात. बांडगूळ, अमरवेल, हाडमोडी इ. परजीवी वनस्पतींची मुळे आश्रयी वनस्पतींवर वाढतात व त्यांच्याद्वारे अन्न शोषून घेतात; त्यांना ‘शोषक मुळे’ म्हणतात. गुळवेल व काही आर्किडे अन्य वनस्पतींच्या फांद्यावर वाढतात. त्यांची लोंबती मुळे (अधिपादपीय मुळे) प्रकाशात हरितद्रव्याच्या मदतीने अन्न तयार करतात. मात्र ती आश्रयी वनस्पतींपासून अन्न शोषून घेत नाहीत.
मुळांचे उपयोगानुसार प्रकार : रताळे, बीट, गाजर, मुळा, सुरण इ. वनस्पतींची मुळे खाण्यासाठी वापरतात. शुगर बीटपासून साखर तयार करतात. सुरणाच्या मुळांपासून इस्ट्रोजेनयुक्त संयुगे मिळवितात व त्यांचा वापर संततिनियमन करणाऱ्या गोळ्यांमध्ये करतात. जिनसेंग, ॲकोनाइट, इपेकॅक, रिसर्पीन इ. औषधे मुळांपासून मिळवितात. फॅबेसी कुलातील वनस्पतींच्या मुळांवर बारीक गाठी येऊन त्यांतील ऱ्हायझोबिया जीवाणू वनस्पतीला नायट्रोजनाचा पुरवठा करतात. भूमिपात होऊ शकणाऱ्या उतारावर असलेल्या वृक्षांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात. वालुकायम प्रदेशात मृदाक्षरण मोठ्या प्रमाणावर घडून येत असते. मुळांमुळे मृदाक्षरण कमी प्रमाणात होते.