लवंग ही वनस्पती मिर्टेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव यूजेनिया कॅरिओफायलाटा (सायझिजियम ॲरोमॅटिकम) आहे. ती मूळची इंडोनेशियातील मोलूकू बेटांवरील असून तिची व्यापारी लागवड इंडोनेशिया, सेशेल्स, भारत, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, श्रीलंका, मॉरिशस आणि टांझानिया या देशांत केली जाते. भारतात तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तिची लागवड होते. इ.स.पू. तिसऱ्या शतकात चीनमध्ये लवंग वापरात होती. जावातून चीनच्या हान दरबारात ती आणली गेली; चिनी लोक बादशहाशी बोलताना आपला श्‍वास सुगंधित करण्यासाठी लवंग तोंडात ठेवीत. प्राचीन काळी चिनी लोकांचा भारतात लवंगांचा व्यापार होता.

लवंग (यूजेनिया कॅरिओफायलाटा) : (१) वृक्ष, (२) पाने आणि फुले, (३) कच्च्या कळ्या, (४) सुकलेल्या कळ्या (लवंगा)

लवंगेचा सदाहरित वृक्ष ८–१२ मी. उंच वाढतो. टांझानिया देशात तो सु. २५ मी. उंच वाढत असल्याचे दिसून येते. त्याचे खोड सरळ व उंच वाढते आणि साल करडी व गुळगुळीत असते. पाने साधी, लांबट, भाल्यासारखी, ७·५–१२·५ सेंमी. लांब आणि २·५–३·७५ सेंमी. रुंद व समोरासमोर असून पानांत तैलग्रंथी असतात. वृक्षाच्या सर्व भागांत सुगंधी तेल असते. फुले परिमंजरी फुलोऱ्यात येतात. ती आकाराने लहान, प्रथम हिरवी आणि नंतर लाल-तपकिरी होतात. फुले कळ्यांच्या स्वरूपात तपकिरी रंगाची असताना खुडतात आणि सुकवितात. या कळ्यांना लवंग म्हणतात. फळे गोल व आठळीयुक्त असून ती मांसल असतात. फळात दोन बिया असून त्या आकाराने लंबगोल असतात. बी नरम असून तिच्यावर एका बाजूने चीर असते. प्रत्येक लवंगेवरचे चार टोकदार भाग म्हणजे फुलातील निदल असतात. नेहमीच्या व्यवहारात लवंग हे नाव फुलांच्या सुकलेल्या देठासह कळ्यांना आणि ज्या वनस्पतीला या कळ्या येतात त्या वनस्पतीलाही लवंग म्हणतात.

सुकविलेली लवंग एखाद्या लहान खिळ्यासारखी दिसते. ती १-२ सेंमी. लांब असून खरबरीत असते. देठ दाबल्यास थोडे सुगंधी तेल बाहेर येते; ते तिखट असते. लवंगा चांगल्या न सुकविल्यास त्या गडद, सुरकुतलेल्या व उभट होतात आणि त्यांची प्रतवारी कमी होते. चांगल्या प्रतीची लवंग काळी कुळकुळीत असून ती बोटांमध्ये दाबल्यास तेल निघते. १०० ग्रॅ. लवंगेत पाणी २५%, प्रथिने ५%, मेद ८%, तंतू ९%, कर्बोदके ४७% आणि खनिजे ६% असतात. तसेच त्यांमध्ये आणि ब-समूह जीवनसत्त्वे असतात. लवंगेत सु. १३% टॅनीन असते. लवंगेचे ऊर्ध्वपातन केल्यास १४–२३% फिकट पिवळे तेल मिळते. याच तेलामुळे लवंगेला तीव्र वास येतो. तेलात सु. ९०%पर्यंत यूजेनॉल हे संयुग असते. तसेच मिथिल सॅलिसिलेट, बीटा कॅरिओफायलीन, व्हॅनिलीन व टॅनीन तसेच फ्लॅव्होनॉइडे व टर्पिनॉइडे गटातील संयुगे असतात.

लवंग सुगंधी, उत्तेजक आणि वायुनाशक असून पुरस्सरण क्रिया सुधारण्यासाठी ती देतात. मळमळ व उलटी होणे, तसेच पोटाच्या तक्रारीवर तिची पूड किंवा रस देतात. लवंग मसाल्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. स्वयंपाकात स्वादासाठी लवंग किंवा तिची पूड वापरतात. लवंग तेल किडलेल्या दाताला बधिरता आणण्यासाठी वापरले जाते. दंतधावने, गुळण्या करण्याचे पदार्थ, च्युईंग गम, साबण, सौंदर्यप्रसाधने, गरम पेये, तेले आणि अत्तरे यांतदेखील लवंग तेल वापरतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा