अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात एक लाखापेक्षा अधिक जातींचा समावेश होतो. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी व अखंडित असून त्यांच्या शरीरात उदरगुहा अथवा देहगुहा असते. हे प्राणी खाऱ्या किंवा गोड्या पाण्यात आणि जमिनीवर आढळतात. ते समुद्राच्या तळापासून पर्वतांच्या उंच माथ्यापर्यंत तसेच वाळवंटात व दाट वनांत अधिवास करतात.
शरीररचना : मृदुकाय प्राण्यांचे शरीर मऊ व लिबलिबीत असून ते द्विपार्श्व सममित असते. शीर्ष, पाद, प्रावार (शरीरावरील त्वचेसारखे आवरण) आणि आंतरंग असे शरीराचे भाग असतात. प्रावारामधून कॅल्शियम कार्बोनेट स्रवले जाते आणि त्यापासून कवच तयार होते. या कवचामुळे मऊ शरीराचे संरक्षण होते. हे कवच शरीराला बाहेरून वेढून टाकणारे म्हणजे बाह्यकंकाल असते किंवा काही वेळा शरीराच्या आत म्हणजे अंत:कंकाल असते. कवच एकपुटी म्हणजे शंख स्वरूपात किंवा द्विपुटी म्हणजे दोन शिंपांच्या स्वरूपात असते. काही मृदुकाय प्राण्यांना कवच नसते. शरीराला ऊर्ध्व आणि अधर पृष्ठे असतात. शरीराच्या अधर पृष्ठावर पाद अथवा पाय असतो. पाय नांगराच्या फाळासारखा अथवा जिभेच्या आकाराचा असतो. तो स्नायूंनी बनलेला असून त्याचा उपयोग संचलनासाठी होतो. बऱ्याच प्राण्यांमध्ये पायाचे रूपांतरण होऊन त्याचा उपयोग पोहण्याच्या आणि जमिनीत बीळ खणण्याच्या कामी होतो.
मृदुकाय प्राणी शाकाहारी, मांसाहारी किंवा मिश्राहारी असतात. मृदुकाय प्राण्यांमध्ये पचन संस्था पूर्ण विकसित झालेली असते. त्यांच्या पचन संस्थेत पचनमार्ग आणि यकृत–स्वादुपिंड ग्रंथी असून त्यांनी स्रवलेल्या स्रावामुळे अन्नाचे पचन होते. शरीराच्या अग्रभागी मुख असते. मुखपोकळीत दंतपट्टिका असून तीवर शेकडो दात असतात. दंतपट्टिका किसणीसारखी अथवा कानशीसारखी काम करते आणि अन्नाचे बारीक कण करते. रक्ताभिसरण संस्थेत हृदय, वाहिन्या, कोटरे (पोकळ्या) आणि रक्त असते. हृदय एक अथवा दोन अलिंदे आणि एक निलय अशा कप्प्यांचे बनलेले असते. रक्तात हीमोसायनीन असते. श्वसनासाठी कल्ले (क्लोम) अथवा फुप्फुसकोश किंवा दोन्ही असतात. उत्सर्जन वृक्ककाद्वारे होते. चेतासंस्थेत चेतागुच्छिका, जोडचेता, परियोजिचेता आणि चेतातंतू असतात. डोळे, संतुलन पुटी आणि स्पर्शके या रूपांत ज्ञानेंद्रिये असतात. मृदुकाय प्राणी एकलिंगी तसेच द्विलिंगी असून त्यांच्यात लैंगिक प्रजनन होते. फलन आंतर अथवा बाह्य असते. फलित अंड्यापासून नवीन प्राणी तयार होतो. काही वेळा त्यांच्या वाढीमध्ये डिंभावस्था असते.
वर्गीकरण : मृदुकाय संघाचे पुढील सहा वर्गांत वर्गीकरण करण्यात येते.
एकपुटी : (मोनोप्लॅकोफोरा). या प्राण्यांत शरीरावर टोपीच्या आकाराचे शिंपल्यांचे एक कवच असते. या वर्गातील प्राणी पूर्व पॅसिफिक महासागरात आढळतात. उदा., निओपायलिना गॅलॅथिया.
उभयचेता : (अँफिन्यूरा). यातील प्राण्यांना शरीराच्या प्रत्येक बाजूला एक अशा उभय (दोन) चेता असतात. या वर्गातील सर्व जाती समुद्रात व सामान्यत: उथळ समुद्राच्या तळावर राहतात. उदा., कायटॉन, केटोडर्मा.
खनित्रपाद : (स्कॅफोपोडा). या प्राण्यांत पाय लांब व शंकुरूप असतो. त्याचा उपयोग चिखलात अथवा वाळूत बीळ खणण्यासाठी होतो. कवचाचा आकार हत्तीच्या सुळ्यासारखा असतो, म्हणून या प्राण्यांना हस्तिदंत मृदुकाय असेही म्हणतात. हे प्राणी ध्रुवीय प्रदेशातील समुद्राखेरीज इतर सर्व समुद्रांत आढळतात. उदा., डेंटॅलियम, कॅडुलस.
उदरपाद : (गॅस्ट्रोपोडा). या प्राण्यांत पाय शरीराच्या खालच्या बाजूला असून तो सपाट तळव्यासारखा असतो. हे प्राणी उदरावर चालतात असे वाटते. बरेचसे प्राणी समुद्रात किंवा गोड्या पाण्यात व काही जमिनीवर राहतात. उदा., शंखी गोगलगाय, बिनशंखी गोगलगाय, शंख, कवडी, पायला, पटेल्ला, ॲपलेशिया (समुद्र-ससा), डोरिस (समुद्र-लिंबू).
द्विपुटी : (बायव्हाल्व्हिया). या प्राण्यांतील कवच द्विपुटी असते. या प्राण्यांना शीर्ष नसते. अग्र भागात तोंड असते. जंभ किंवा रेत्रिकाही नसतात. उदा., गोड्या तसेच खाऱ्या पाण्यातील कालव, मोती कालव, टेरेडो (होडी मृदुकाय), सोलेन (वस्तरा मृदुकाय).
शीर्षपाद : (सेफॅलोपोडा). या प्राण्यांत शीर्ष (डोके) ठळक व स्पष्ट दिसते. शीर्षावर बाहूंचे (पायांचे) कडे असून ते हालचालीसाठी व अन्न पकडण्यासाठी उपयोगी असते. बरेचसे प्राणी उथळ आणि काही खोल समुद्रात राहतात. उदा., लोलिगो (नळ), ऑक्टोपस (अष्टपाद), सेपिया (माखली), नॉटिलस.
काही मृदुकाय प्राणी माणसांच्या आहारात अन्न म्हणून वापरले जातात. त्यांच्या कवचापासून आयुधे, भांडी, अलंकार, माळा व शोभेच्या वस्तू तयार करतात, तसेच कॅल्शियम कार्बोनेट मिळवितात. काही प्राण्यांपासून मोती मिळतात (पहा : मोती-कालव). काही मृदुकाय प्राणी मनुष्याला उपद्रवी ठरतात, कारण त्यांच्या शरीरात चपटकृमींच्या काही अवस्था वाढतात. काही प्राणी लाकडी होड्या, नौका इत्यादींना भोके पाडून त्यांचे नुकसान करतात.