(फिजिकल थेरपी; फिजिओथेरपी). आजार, इजा किंवा विकलांगता यांच्यावर मर्दन व व्यायाम या शारीरिक पद्धतींचा वापर करण्याच्या उपचार पद्धतीला शारीरिक चिकित्सा म्हणतात. या उपचार पद्धतीत औषधांचा वापर किंवा शस्त्रक्रिया केली जात नाही. मात्र या पद्धतीत उष्णता, विद्युत, जल इ. भौतिकीय साधनांचा उपयोग केला जातो, म्हणून याचा उल्लेख भौतिकी चिकित्सा असाही केला जातो.

शारीरिक चिकित्सा वेगवेगळ्या कारणांसाठी केली जाते. शरीराला किंवा शरीराच्या एखाद्या भागाला आलेली दुर्बलता व ताण घालवून शरीराचा तो भाग पूर्ववत काम करू शकेल, असे उपाय-उपचार त्यावर करणे हा शारीरिक चिकित्सेचा मुख्य उद्देश असतो. या चिकित्सेमुळे स्नायूंचा रक्तपुरवठा सुरळीत होतो व पेशींना ऑक्सिजन, पाणी व इतर पोषकद्रव्ये पुरवली जातात. पेशींची वाढ योग्य प्रमाणात होऊन त्याचे कार्य सुरक्षित चालते. तसेच पेशीतील त्याज्य पदार्थांचा निचरा होऊन पेशींना तरतरी येते. परिणामी दुर्बल होत चाललेले स्नायू व अवयव कार्यक्षम होतात. अपघातामुळे दुर्बल झालेल्या शरीराच्या भागाला शास्त्रोक्त पद्धतीने हालचाल करवली जाते. त्यामुळे सांधे व त्यांना जुळलेले स्नायू सुरळीत व नैसर्गिक रीत्या कार्य करू लागतात.

शारीरिक चिकित्सा (आधुनिक तंत्रज्ञान) : (१) विद्युत उद्दीपन, (२) उसळ चेंडू , (३) ऊतितापन चिकित्सा, (४) श्राव्यातीत चिकित्सा.

शारीरिक व्यायाम, शास्त्रशुद्ध मर्दन (मालिश) यांखेरीज काही भौतिक साधनांचा वापर या चिकित्सांसाठी केला जातो. उदा., जल, माती, प्रकाश, ध्वनी, विद्युत, उष्णता, चुंबक, लेसर किरण, किरणोत्सर्ग इत्यादी. तसेच विद्युत उद्दीपन (इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन), उसळ चेंडू (स्प्रिंग बॉल), ऊतितापन चिकित्सा (डायाथर्मी), श्राव्यातीत चिकित्सा (अल्ट्रासॉनिक थेरपी) इ. आधुनिक तंत्रांचा वापर केला जातो. असे उपचार तज्ज्ञ-मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली केले जातात किंवा करून घेतले जातात. दमा, तंत्वात्मकतासारख्या (फायब्रोसीस) श्वसन रोगांवर शारीरिक चिकित्सा प्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे. अंथरुणाला खिळून राहिलेल्या बाधित व्यक्तींसाठी ही चिकित्सा उपयुक्त ठरते. गरोदरपणात केल्या जाणाऱ्या प्रसूतिपूर्व व्यायांमामुळे प्रसूती नैसर्गिकपणे व अधिक सुलभ होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच प्रसूतिनंतर पोट सुटणे, पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होणे अशा गुंतागुंतीच्या समस्यांचे प्रमाण देखील कमी होत चालले आहे.

शारीरिक चिकित्सेमध्ये एखादा भाग सुजल्यास किंवा अचानक दुखू लागल्यास बाधित भागाला शेक देतात. त्यासाठी हातरूमाल तव्यावर गरम करून बाधित भागावर ठेवतात. एखादा भाग शेकल्यामुळे त्या भागाचे तापमान वाढते व रक्तपुरवठा जास्त होतो. अशा भागात काही कारणांमुळे निर्माण झालेली रसायने पातळ होतात, रक्तामध्ये मिसळतात आणि त्या जागेतून हालविली जातात. परिणामी अशी रसायने निष्प्रभ होतात. तसाच चेतातंतूवरचा दाब व क्षोभ कमी होऊन दुखणे कमी होते. नियंत्रित स्वरूपात अवरक्त किरणांच्या साहाय्याने शेक देण्याच्या यंत्रास डायाथर्मी म्हणतात. डायाथर्मी उपकरणाद्वारे आवश्यक त्या प्रकारचे तरंग निर्माण करून शरीरातील खोलवर असलेल्या ऊतींमध्ये उष्णता निर्माण करतात आणि त्या भागातील रक्तप्रवाह सुरळीत होतो.

वाढत्या वयामुळे अनेकदा गुडघ्यांच्या दुखण्यावर इलाज करण्यासाठी कृत्रिम सांध्याचे रोपण केले जाते. या शस्त्रक्रियेनंतर शारीरिक चिकित्सेची गरज असते. ही चिकित्सा करताना सुरुवातीला पायाच्या मागच्या बाजूस सतत निष्क्रिय गतीचे उपकरण लावतात. याद्वारे गुडघा हळूहळू वाकवला जातो आणि नंतर पूर्ववत ठेवला जातो. असे केल्याने रोपण केलेल्या गुडघ्याच्या भोवतालच्या स्नायूंची हालचाल चालू ठेवली जाते, त्यातील ताठरपणा कमी होतो आणि ताण नीट राहतो. तीन दिवसांनंतर आधार घेऊन काही वेळ पायांवर उभे करतात. असे दिवसातून पाच-सहा वेळा करतात आणि नंतर धरून चालवतात. अशा प्रकारे स्नायूंची हालचाल सावकाश घडवून आणतात आणि रुग्णाला चालते करतात.

शारीरिक चिकित्सा पद्धतींचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. याचा उल्लेख आयुर्वेदात चरक संहितेपासून ठिकठिकाणी आढळतो. घर्षण, मर्दन, गरम पाण्याचा शेक, गार पाणी लावणे, स्नायूंची निरनिराळ्या पद्धतीने हालचाल करून घेणे इ. क्रियांचा उल्लेख पंचकर्मात आहे. तथापि या चिकित्सेला पहिल्या महायुद्धानंतरच वैद्यकीय उपचार पद्धती म्हणून मान्यता प्राप्त झाली. अस्थिभंग, पोळणे, भाजणे, पक्षाघात, क्षयरोग इ. आजारांत या चिकित्सेचा वापर करण्यात येतो.

शारीरिक चिकित्सा पद्धतीचा विस्तार अनेक शाखांमध्ये झालेला आहे. उदा., चेता-स्नायू शारीरिक उपचार पद्धती, बालरोग शारीरिक उपचार पद्धती, क्रीडा शारीरिक उपचार पद्धती, पर्वतीय पर्यावरण शारीरिक उपचार पद्धती, अंतराळ शारीरिक उपचार पद्धती, वार्धक्य शारीरिक उपचार पद्धती अशा विविध क्षेत्रांसाठी खास शारीरिक उपचार पद्धती विकसित झालेल्या आहेत. अवयव विच्छेदन, अस्थिभंग अशा आजारांवर तिची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. अपंग व्यक्तींना इतरांप्रमाणे सकारात्मक जीवन जगता यावे यासाठी ही चिकित्सा महत्त्वाची आहे. क्रीडाक्षेत्रात व महिलांच्या आरोग्यक्षेत्रात या चिकित्सेचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे शारीरिक चिकित्सा मार्गदर्शक यांच्या नेमणुका क्रीडाक्षेत्रात केल्या जातात. व्यायामशाळांमध्येही शारीरिक चिकित्सकाची नियुक्ती केली जात आहे. केवळ आजारपणातच नव्हे तर शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी या चिकित्सेचा उपयोग होत आहे.