मोगली एरंड ही पानझडी वनस्पती यूफोर्बिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव जट्रोफा करकस आहे. ती मूळची मध्य अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील असून जगातील सर्व उष्ण प्रदेशांत तिची लागवड केली जाते. सामान्य व्यवहारात तिला जट्रोफा असेही म्हणतात. तिच्या बियांमध्ये २७–४०% तेल असते. या तेलावर प्रक्रिया करून उच्च दर्जाचे जैव इंधन मिळते. ते डीझेलमध्ये मिसळून जड वाहने चालवण्यासाठी उपयुक्त असते.

लागवडीखालील मोगली एरंड (जट्रोफा करकस) : (१) झुडूप, (२) बिया

मोगली एरंडाचे लहान वृक्ष किंवा मोठे झुडूप असून ते ३–७ मी. उंच वाढते. ते भरपूर पाणी असणाऱ्या काही ठिकाणी सदाहरित दिसते. वृक्षाच्या सर्वांगात चीक किंवा रस असतो. पाने साधी, ३–५ भागांत विभागलेली, १०–१५ सेंमी. लांबीची, टोकदार, हिरवीगार आणि गुळगुळीत असतात. पानांचे देठ, ५–१० सेंमी. लांब असून पानांच्या तळापासून ३–७ मुख्य शिरा निघालेल्या असतात. फुले एकलिंगी असून नरफुले आणि मादीफुले वेगवेगळी येतात. फुले लहान, अनाकर्षक, हिरवट पिवळसर रंगाची असून ती फुलोऱ्यात येतात. फळ बोंड प्रकारचे असून अंडाकृती व काळे असते. ते तडकून त्याचे तीन भाग होतात. बिया लांबट, गर्द पिंगट आणि गुळगुळीत असतात. बियांमध्ये ‘कुर्सीन’ हे जहाल विषारी संयुग असते.

मोगली एरंड ही विषारी वनस्पती असल्यामुळे जनावरे ती खात नाहीत. त्यामुळे शेताभोवती कुंपण म्हणून तिची लागवड करतात. खरूज, इसब आणि नायटा यांवर वनस्पतीतील चीक गुणकारी असतो. हिरड्या सुजल्यास पानांच्या देठांनी किंवा कोवळ्या फांद्यांनी घासतात. दूध वाढावे म्हणून पानांचा काढा व लेप स्तनांना लावतात. बिया कृमिनाशक व रेचक आहेत. बियांतील तेलापासून कीटकरोधी रोगण तयार करतात. तेल दिव्यामध्ये जाळण्यासाठी वापरतात. बियांतील तेलाचे एस्टरीभवन केल्यास त्याचे जैव इंधनात रूपांतर होते. त्यामुळे मोगली एरंड लावण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत प्रोत्साहन दिले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा