(लंगूर). स्तनी वर्गाच्या नरवानर गणाच्या कॅटॅऱ्हिनी श्रेणीत वानरांचा समावेश केला जातो. या गणात वानरांसोबत माकड, कपी, मानव या प्राण्यांचाही समावेश होतो. भारतात सामान्यपणे सर्कोपिथेसिडी कुलातील वानरे आढळतात आणि त्यांचे शास्त्रीय नाव सेम्नोपिथेकस एन्टेलस आहे. त्याला हनुमान वानर, काळ्या तोंडाचे वानर अथवा नासावानर असेही म्हणतात. भारतात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत ही वानरे दिसून येतात. महाराष्ट्रात अमरावती, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात ती मोठ्या संख्येने आढळतात. हिमालयात संकोश व मानसरोवर भागात सोनेरी वानरे आढळतात.

वानर (सेम्नोपिथेकस एन्टेलस)

वानरे उकिडवे बसले असता, त्यांची उंची ६०–७० सेंमी. आणि शेपटी ९०–१०५ सेंमी. लांब असते. वजन साधारणपणे ९–१६ किग्रॅ. असते. शरीराचा रंग भुरकट पांढरा असतो. डोके, हात व पाय काळे असतात. डोळे बहुधा तपकिरी रंगाचे असून सुळे तीक्ष्ण असतात. भारतातील हवामानाच्या फरकानुसार निरनिराळ्या प्रदेशात त्यांच्या शरीराच्या रंगात फरक दिसून येतो. हिमालयाच्या पायथ्याशी आढळणाऱ्या वानराचे वजन १६–२१ किग्रॅ. असते.

वानरे सामान्यपणे कळप करून राहतात. एका कळपात ३०–४० वानरे असतात. पायांनी व हातांनी झाडाच्या फांदीला लोंबकळून ते इकडून तिकडे सहज जातात. ते ६ मी.पर्यंत लांब उडी मारू शकतात. झाडाची पाने, फुले, फळे, कोवळे अंकुर त्यांचे खाद्य आहे. त्यांच्या गालात दोन पिशव्या असून त्यांत ते अन्न साठवून ठेवतात आणि नंतर निवांतपणे खात बसतात. वानरे पिकांचे मोठे नुकसान करतात. दिवसातील अर्धा काळ जमिनीवर, तर उरलेला अर्धा काळ ते झाडावर घालवितात. रात्री एखाद्या मोठ्या झाडावर शेंड्याकडील फांद्यांवर जाऊन झोपतात. वाघ, बिबट्या, अजगर व मगर हे त्यांचे शत्रू आहेत. शत्रूची चाहूल लागताच “हुप्पSS हुप्पSS” असा आवाज काढून कळपातील सर्वांना सावध करतात. त्यांचा प्रजननकाळ वर्षभर चालतो. गर्भावधी सु. २०० दिवसांचा असून मादी एका वेळी एकाच पिलाला जन्म देते. वानरे माणसाळली जात नाहीत. त्यामुळे ती कसरतीची कामे शिकत नाहीत.

बऱ्याचदा वानर (लंगूर), माकड आणि कपी या संज्ञा समानार्थी वापरल्या जातात. परंतु वर्गीकरणाच्या दृष्टीने त्यांच्यात फरक आहे. कपी, वानर, माकड या तिन्ही संज्ञा ज्या प्राण्यांसाठी वापरल्या जातात, त्यांचा समावेश कॅटॅऱ्हिनी श्रेणीत केला जातो. कॅटॅऱ्हिनी श्रेणीत सर्कोपिथेकॉयडिया आणि होमिनॉयडिया हे दोन गट येतात. सर्कोपिथेकॉयडिया गटात सर्कोपिथेसिडी हे एकच कुल येते आणि या कुलातील प्राण्यांना ‘जुन्या जगातील माकडे’ म्हणतात. त्यांच्यामध्ये वानर (लंगूर), बॅबून आणि ज्यांना सर्वसामान्यपणे माकडे म्हटले जाते ते प्राणी येतात. या कुलात २३ प्रजाती आहेत; वानरे (लंगूर) यांपैकी सेम्नोपिथेकस प्रजातीत येतात आणि बॅबून पॅपिओ प्रजातीत येतात आणि भारतातील माकडे मॅकाका प्रजातीत येतात. होमिनॉयडिया गटातील प्राण्यांना कपी म्हणतात.

माकडे आणि वानरे हे सारखी दिसत असली तरी, त्यांच्यात काही दृश्य फरक आहेत. माकडाचे वजन कमी, तर वानराचे वजन जास्त असते. माकडाची उंची कमी, तर वानराची जास्त असते. माकडाचे पंजे काळपट भुरे, तर वानराचे पंजे काळे असतात. माकड एकावेळी एक किंवा दोन पिलांना जन्म देते, तर वानर एकावेळी एकच पिलाला जन्म देते. माकड माणसाळल्यास ते माणसाळते व शिकते, तर वानर माणसाळत नाही, तसेच शिकत नाही. माकडाच्या शरीर बोजड असते, तर वानराचे शरीर सुटसुटीत असते.