घटनावाद : घटनावाद हे आधुनिक काळातील राजकीय तत्त्वज्ञान आहे. सतराव्या आणि अठराव्या शतकात घटनावादाची मांडणी केली गेली. व्यक्तीचे व राज्यसंस्थेचे संबंध कसे असावेत ? हा कळीचा प्रश्न घटनावादाचा आहे. या प्रश्नाच्या संवादातून आधुनिक काळात घटनावादाचा उगम व विकास झाला. पाश्चिमात्य राजकीय विचारात घटनावादावर विशेष भर दिला गेला. घटनावाद ही संकल्पना जॉन लॉक व अमेरिकन रिपब्लिक स्थापनकर्त्यांच्या राजकीय सिद्धांताशी संबंधित आहे. कायद्याचा संच म्हणजे राज्यघटना होय. प्रत्येक राज्याला राज्यघटना असते आणि सर्वच राज्ये ही घटनात्मक राज्ये असतात. राज्यघटना अस्तित्वात असणे, शासन राज्यघटनेवर आधारित असावे, तसेच राज्यघटनेद्वारे मर्यादित शासन निर्माण केले जावे या विचाराचा पुरस्कार म्हणजे घटनावाद होय. घटनात्मक कायद्यानुसार शासनाच्या सत्ता व अधिकारांवरती मर्यादा घालणे किंवा मर्यादित करणे म्हणजे घटनावाद होय.

शासनाची सत्ता कायदेशीररीत्या मर्यादित असली पाहिजे तसेच शासनाची अधिसत्ता आणि अधिमान्यतादेखिल कायदेशीररीत्या मर्यादित असली पाहिजे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायदान मंडळ ह्या शासनाच्या महत्त्वाच्या यंत्रणांची निर्मिती राज्यघटनेनुसार होते. तसेच त्यांच्या सत्तेवरील मर्यादा देखिल राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या असतात. शासकीय संस्था आणि राजकीय प्रक्रिया ह्या घटनात्मक नियम किंवा कायद्यानुसार मर्यादित केलेल्या असतात. कायद्यानुसार, राज्य घटनेनुसार जर शासन निर्माण केलेले असेल तर शासन राज्यघटनेनुसार, कायद्यानुसार मर्यादित कसे? घटनावाद म्हणजे राजकीय मूल्यांचा आणि आकांक्षांचा असा संच की जो शासकीय सत्तेपासूनच्या अंतर्गत व बाह्य नियंत्रणापासून स्वातंत्र्याचे रक्षण करू इच्छितो. घटनात्मक तरतुदींना पाठिंबा यामधून घटनावाद व्यक्त होतो. घटनावाद राज्यघटनेला संहिताबद्ध करतो. जॉन लॉक, माँटेस्क्यू हे घटनावादाचे पुरस्कर्ते होत. थॉमस हॉब्स व जॉन लॉकने सामाजिक कराराच्या माध्यमातून सार्वभौमत्व मर्यादित केले तर जॉन ऑस्टिनच्या मते, सार्वभौम सत्ता कायद्याने मर्यादित केलेली असेल तरच ती स्वनियंत्रित असेल.

व्यक्तीचे व राज्यसंस्थेचे संबंध कसे असावेत ? या संदर्भांत घटनावादामध्ये मुख्य दोन विचारप्रवाह आहेत. १) मर्यादित शासन असण्यासाठी राज्यघटना आवश्यक असते. यासाठी सत्ताविभाजन, परस्पर नियंत्रण आणि समतोल तसेच संघराज्यपध्दतीचा पुरस्कार केला जातो. या अर्थाने बिल ऑफ राइटस, द्विगृही कायदे मंडळ, संघराज्य, विकेंद्रीकरण या तत्त्वांचा स्वीकार घटनावाद करतो. २) शासन हे संमती किंवा सहमतीवर आधारित असावे हा दुसरा घटनावादाचा विचार प्रवाह आहे. निवडणूक, प्रौढ मतदान, प्रतिनिधित्त्व यांचा समावेश राज्यघटनेमध्ये केला जातो. नागरिकांची संमती किंवा सहमती असलेली राज्यघटना मर्यादित शासनासाठी आवश्यक ठरते. घटनावाद हे उदारमतवादाचे राजकीय मूल्य आहे. उदारमतवादी लोकशाहीतील घटनावाद हा एक मुलभूत व महत्त्वाचा घटक आहे. घटनावाद ही स्वातंत्र्याची मुलभूत हमी आहे. उदारमतवादी घटनावाद हा नेहमी लिखित राज्यघटनेवर आधारलेला असतो. शासकीय संस्थांमधील सत्ता संतुलनाची व्यवस्था, औपचारिकता आणि नागरी स्वातंत्र्याची हमी यांच्याशी संबंधित असते. औपचारिक व शासनाच्या कायदेशीर संघटना यांच्यावरती घटनावाद लक्ष देतो अशी टीका केली जाते. शासकीय सत्तेवर तक्रार करण्याचे घटनावाद हे एक साधन आहे अशीही यावरती टीका केली जाते.

घटनावादाची मुळे शोधण्यातून घटनावादाचे अभिजात घटनावाद, मध्ययुगीन घटनावाद आणि आधुनिक घटनावाद असे मुख्य तीन प्रकारात वर्गीकरण केले गेले; परंतु घटनावाद आधुनिक आहे. यामुळे आधुनिकतेच्या संदर्भांत ब्रिटीश घटनावाद (कॅबिनेट, संसदेचे सार्वभौमत्व, सामूहिक जबाबदारी, निश्चित काळासाठी निवडणूका, निपक्षपाती न्यायमंडळ, विरोधी पक्ष, व्यक्तीची प्रतिष्ठा), अमेरिकन घटनावाद (गणराज्यवाद, जनता सार्वभौमत्व, संघराज्य पध्दती, लिखीत राज्यघटना, सत्ताविभाजन, निसर्गसिध्द हक्कांची संकल्पना, स्वतंत्र न्यायमंडळ, कायद्याचे राज्य, नियंत्रण व समतोलाचे तत्व) आणि निसर्गवादी घटनावाद असे तीन प्रकार मांडले आहेत. नव्वदीनंतर घटनावादाच्या तत्त्वज्ञानात बदल झाला आहे. राज्यसंस्थेने विविध क्षेत्रातून माघार घेतली आहे. आर्थिक सुधारणा, साटेलोटे भांडवलशाही (Casino Capitalism), रुढीवाद, मूलतत्ववाद, नवनाझीवादाने घटनावादाच्या पुढे नवीन आव्हाने उभी केली आहेत.

संदर्भ :

  • Axtmann, Roland(Edi), Constitutionalism (Neil Walker), Understanding Democratic Politics: An Introduction, Sage Pub., New Delhi,2006.
  • Heywood, Andrew, Key Concepts in Politics and International Relations, Macmillan, Palgrave, New York, 2017.
  • Medushevsky, Andrei, Russian Constitutionalism: Historical and Contemporary Development, Routledge, New York, 2006.
  • Zalta,Edward N. (Principal Editor), Stanford Encyclopedia of Philosophy, Constitutionalism, Metaphysics Research Lab, Stanford, First published Jan ,2001 ; Substantive revision Sep, 2012.