प्रत्येक देशाची आपापली कायदेपद्धती असते व त्या कायद्यांनुसार त्या देशाच्या नागरिकांचा व्यवहार चालत असतो. विवाह हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक सोहळा आहे. त्यामुळेच तो नागरी कायद्याच्या नियंत्रणाखाली येतो. विवाह व विवाहाशी निगडित बाबींबाबत कायद्यांना ‘विवाह कायदे’ असे म्हणतात.

विवाह ही जितकी सामाजिक बाब आहे, तितकीच ती एक धार्मिक बाबदेखील आहे. त्यामुळे विवाहाशी बरीचशी धार्मिक बंधने व संस्कार जोडलेली आहेत. विविध धर्मांच्या विविध वैशिष्ट्यांमुळे विवाहाशी संबंधित बऱ्याचशा प्रथा-परंपरा निर्माण झाल्या आहेत. या प्रथांना पुढे कायद्यांचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे भारतात विविध विवाह कायदे अमलात आले आहेत. भारतात हिंदू विवाह अधिनियम (१९५५), मुस्लिम विवाह अधिनियम (१९३९), भारतीय ख्रिस्ती विवाह अधिनियम (१८७२) व ख्रिस्ती धर्मीयांसाठी भारतीय घटस्फोट अधिनियम (१८६९), विशिष्ट विवाह अधिनियम (१९५४, १९७६), पारशी विवाह आणि घटस्फोट अधिनियम (१९३६, १९८८), विदेश विवाह अधिनियम (१९६९) इत्यादी विवाह कायदे वापरात आहेत.

भारतीय ख्रिस्ती समाजातील विवाह संबंधाचे नियमन भारतीय घटस्फोट अधिनियम व भारतीय ख्रिस्ती विवाह अधिनियम या दोन कायद्यांन्वये होत असल्यामुळे त्यांना ‘ख्रिस्ती व्यक्तिगत कायदे’ या नावाने संबोधतात.

ख्रिस्ती धर्मातील कॅथलिक लोकांच्या विवाहसंस्काराचे नियमन चर्चच्या कॅनन लॉनुसार होत असल्यामुळे बऱ्याच वेळा चर्चच्या कॅनन लॉला ‘कॅथलिक व्यक्तिगत कायदा’ असे संबोधण्यात येते. त्यामुळे गफलत होण्याची शक्यता आहे. कॅनन लॉ हा कॅथलिक चर्चअंतर्गत कायदा आहे; तर भारतीय घटस्फोट अधिनियम व भारतीय ख्रिस्ती विवाह अधिनियम हे सरकारी कायदे आहेत. या कायद्यानुसार भारतीय ख्रिस्ती व्यक्तींच्या विवाहांचे नियमन होते इतकेच. त्या व्यतिरिक्त त्या कायद्याचा ख्रिस्ती धर्माशी किंवा धर्मतत्त्वांशी फारसा संबंध नाही. हे कायदे प्रस्थापित करण्याचा, त्याच्यात बदल, सुधारणा करण्याचा हक्क फक्त कायदेमंडळाला आहे.

भारतीय ख्रिस्ती विवाह अधिनियमाच्या कलम पाचनुसार प्रत्येक विवाह, ज्यापैकी वर अथवा वधू किंवा दोघेही धर्माने ख्रिस्ती आहेत, सदर कायद्यानुसार करता येतो. विवाह कोणी, कोठे व केव्हा लावावा, कोणत्या अटींची पूर्तता झाल्यावर लावावा यांसंबंधी विस्तृत नियम करण्यात आलेले आहेत. त्यांचा सारांश पुढीलप्रमाणे : विवाह करण्याच्या दोन प्रकारच्या पद्धती आहेत. (१) धर्मगुरूंमार्फत लावलेला विवाह व (२) सरकारने नेमलेल्या नोंदणी अधिकाऱ्यासमोर लावलेला विवाह; तथापि दोन्ही पद्धतींच्या प्रक्रियेमध्ये बरेचसे साम्य आढळते. विवाह आपापल्या पंथांतील धर्मगुरूंच्याकरवी लावता येतो. परंतु त्या धर्मगुरूंस शासनाकडून विवाह लावण्याबाबतचे परवानापत्र (Licence) मिळाले असले पाहिजे. विवाहेच्छू वधूवरांपैकी कोणी एकाने विवाहासंबंधीची सूचना म्हणजे विवाहेच्छूची नावे, पत्ता, चर्चचे सभासदत्व, विवाहाची तारीख व वेळ इ. माहिती धर्मगुरूंकडे द्यावयाची असते. धर्मगुरूंनी ती सूचना चर्चच्या सूचनाफलकावर लावायची असते किंवा सामूहिक उपासनेच्या वेळी ती जाहीर करायची असते. होऊ घातलेल्या या विवाहासंबंधी कोणालाही रास्त आक्षेप घेता येतो. आक्षेप नसल्यास वा असेल, तर त्याचे योग्य ते निरसन झाल्यानंतर सूचकाने धर्मगुरूंसमोर येऊन आपल्या नियोजित विवाहामध्ये कोणताही प्रत्यवाह नाही, असे प्रतिज्ञापन केल्यावर धर्मगुरू सूचना योग्य असल्याचे प्रमाणपत्र देतात आणि ते मिळाल्यावर दोन महिन्यांच्या आत विवाह यथाविधी करावा लागतो. सरकारने नेमलेल्या विवाहनोंदणी अधिकाऱ्याकरवी लावून घेतलेल्या विवाहासाठीसुद्धा बहुतांशी वरील प्रकाराची प्रक्रिया विहित करण्यात आली आहे. विवाहाची प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्याची एक प्रत विवाहनोंदणी कार्यालयाकडे पाठवावी लागते.

विवाहासाठी पुढील तीन पूर्वशर्ती विहित करण्यात आलेल्या आहेत : (१) वराचे वय किमान २१ वर्षे पूर्ण व वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असले पाहिजे, (२) वधूचा पूर्वपती व वराची पूर्वपत्नी नियोजित विवाहाच्या वेळी ह्यात असता कामा नये आणि (३) परवानापात्र व्यक्तीसमोर व किमान दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत वधूवरांनी विवाहाची शपथ विहित नमुन्यात घेतली पाहिजे.

साहजिकच कॅथलिक ख्रिस्ती धर्मगुरू जर त्या धर्माच्या रितीरिवाजांनुसार व नियमांनुसार विवाह साजरा करीत असतील, तर तो विवाह ग्राह्य धरला जातो.

भारतीय ख्रिस्ती विवाह अधिनियमाच्या कलम पाचनुसार ख्रिस्ती धर्मगुरू जेव्हा दोन ख्रिस्ती व्यक्ती (किंवा एक ख्रिस्ती व एक बिगर ख्रिस्ती व्यक्ती) चर्चच्या नियमांनुसार विवाह साजरा करतात, त्या वेळी तो विवाह ख्रिस्ती संस्कारविधी असतो. त्याचबरोबर कायदेशीर (वैध) नागरी विवाहदेखील असतो. म्हणूनच चर्चमध्ये विवाहाच्या वेळी चर्चच्या कार्यालयात धार्मिक नोंदवहीबरोबर सरकारी नोंदवहीवरसुद्धा स्वाक्षरी कराव्या लागतात.

एकदा का धार्मिक रितीरिवाजानुसार व विधीनुसार विवाह साजरा केला गेला की, त्या विवाहाचे व विवाहविषयक बाबींचे नियमन नागरी कायद्यानुसार चालू होते. विवाहबंधन, वैवाहिक मालमत्ता, विवाहितांना घरात राहण्याचा हक्क, अपत्यांचे पालकत्व इत्यादी बाबी नागरी कायद्यानुसार केल्या जातात. साहजिकच जरी धर्मगुरूंनी चर्चमध्ये विवाह साजरा केला असला, तरी घटस्फोट मात्र भारतीय घटस्फोट अधिनियमानुसारच घ्यावा लागतो.

संदर्भ :

  • Coriden, James A.; Green, Thomas J.; Heintschel, Donald E., Eds., The Code of Canon Law : A Text and Commentary, Washington, 1985.
  • Lobo, George V. The New Marriage Law, Mumbai, 1983.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया