बाबा पदमनजी : ( मे १८३१—२९ ऑगस्ट १९०६ ). मराठी ग्रंथकार आणि मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक. बाबा पदमनजी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. त्या काळात प्रचलित असलेल्या प्रथेमुळे त्यांनी आपल्या आडनावाचा वापर केला नाही. पदमनजी माणिकजी मुळे ह्यांचे कुटुंब कासार जातीचे, धार्मिक वळणाचे, कट्टर मूर्तिपूजक आणि तत्कालीन मध्यमवर्गीय ब्राह्मणी संस्कृतीला जवळचे असे होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण प्रथम सरकारी आणि नंतर मिशन शाळेत झाले.

१८४९ साली मुंबईस येऊन बाबांनी चौपाटीजवळील फ्री चर्च (विल्सन) हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे शिक्षक नारायण शेषाद्री ह्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे सुरुवातीला बाबांचे त्यांच्याविषयीचे मत फार प्रतिकूल होते. डॉ. विल्सन, रेव्ह. मिचेल, रेव्ह. नेसबिट असे विद्वान शिक्षक त्यांना लाभले. हा काळ नव्या विचारांच्या उदयाचा होता. शालेय वयातच त्यांना वाचनाचा नाद लागला. फिरत्या ग्रंथ विक्रेत्यांकडून घेतलेले ग्रंथ, ज्ञानोदय, प्रभाकर, ज्ञानप्रकाश, शतपत्रे, काही धर्मविषयक पत्रिका, इंग्रजी-मराठी व्याख्याने ह्या सर्वांचा एकसंध परिणाम तत्कालीन युवकांच्या मनांवर होत होता. मूर्तिपूजा बंद करावी, जातिभेद मोडावा, विधवाविवाह रूढ करावेत, अशी त्यांची विचारधारा तयार होत होती. काही काळ ते ‘परमहंस मंडळी’ ह्या प्रागतिक विचारांच्या गुप्त संघटनेतही होते; परंतु तेथे व्यक्त होणारे नास्तिक विचार तसेच मंडळाच्या पुस्तिकेतील कोणताही धर्म ईश्वरदत्त नाही व कोणतेही शास्त्र ईश्वरप्रणीत नाही अशा आशयाचे विचार त्यांना पसंत न पडल्यामुळे त्यांनी ह्या संघटनेशी संबंध तोडला. हे तरुण ख्रिस्ती होणार असे बोलले जाऊ लागले होते. त्यात एक नाव होते ते बाबा पदमनजी ह्यांचे.

बाबा पदमनजींनी ३ सप्टेंबर १८५४ रोजी, म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी, बेळगाव येथे रेव्हरंड टेलर यांच्याकडून बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. धर्मांतरानंतर जवळजवळ १६ वर्षे बाबांचे पुण्यात वास्तव्य होते. पुण्यात ते बराच काळ फ्री चर्चच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत. ७ एप्रिल १८६७ रोजी बाबा पदमनजींनी फ्री चर्च मिशनचे पाळक म्हणून दीक्षाविधी स्वीकारला. ते रेव्हरेंड बाबा पदमनजी बनले. पाच-सहा वर्षे पाळकाचे काम केल्यानंतर बाबांनी स्वत: संपूर्ण वेळ लेखनास वाहून घेतले. त्यानंतर ख्रिश्चन लिटरेचर सोसायटीसाठी त्यांनी लिखाण केले, अनेक नियतकालिके चालविली. १८७८ साली बाबांनी बायबल सोसायटीच्या व ट्रॅक्ट सोसायटीच्या संपादकाचे काम मुंबईत स्वीकारले.

तत्कालीन समाजातील विधवांच्या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करण्यासाठी १८५७ साली यमुनापर्यटन  ही कादंबरी लिहून त्यांनी मराठी भाषेत कादंबरी या वाङ्मयप्रकाराचा पाया घातला. यमुनापर्यटन  म्हणजे ह्या कादंबरीची नायिका यमुना हिच्या प्रवासाची कथा होय. मिशनऱ्यांच्या शाळेत शिकलेली आणि ख्रिस्ती धर्माबद्दल प्रेम असलेली यमुना आपला पती विनायक ह्याच्यासह प्रवासास निघते. ह्या प्रवासात काही हिंदू विधवा त्यांना भेटतात; त्यांची दु:खे त्यांना दिसतात. दु:खी विधवांना यमुना येशूचा उपदेश ऐकवते. ह्या प्रवासातच विनायकाला अपघाती मरण येते. मरतेसमयी यमुना त्याला बाप्तिस्मा देते. यमुना विधवा झाल्यामुळे तिचे केशवपन घडवून आणण्याचे प्रयत्न होतात; पण यमुना ते होऊ देत नाही. तिचा सासराही तिला पाठिंबा देतो. पुढे यमुना एका ख्रिस्ती गृहस्थाशी विवाह करते; स्वत:ही ख्रिस्ती धर्म स्वीकारते. यमुनेचा प्रवास जसा भौगोलिक, तसाच वैचारिकही आहे. ह्या प्रवासातील विविध अनुभवांतून यमुना ही ख्रिस्ताच्या अधिकाधिक जवळ जाते आणि अखेरीस ख्रिस्ती होते. या कादंबरीद्वारे समाजात विधवाविवाहाबाबत जागृती करण्याचा त्यांचा हेतू होता. बाबांनी आपल्या या कादंबरीचे उपशीर्षक ‘हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण’ असे ठेवले, त्यावरूनही हेच स्पष्ट होते. मराठी साहित्यातील कोश, निबंध, आत्मचरित्र वगैरे साहित्यप्रकारांत जवळजवळ सव्वाशे पुस्तके बाबांनी लिहिली आहेत. बाबा पदमनजींनी शब्दरत्नावली  या नावाचा समानार्थी शब्दांचा कोश अथवा थिसॉरस १८६० साली प्रसिद्ध केला. मराठी भाषेतील हा पहिलाच समशब्दकोश. पदमनजीलिखित ग्रंथसंख्या सुमारे एकशेतीन भरते. जगातील महत्त्वाच्या भाषांमध्ये भाषांतर झालेल्या त्यांच्या अरुणोदय  ह्या आत्मचरित्राने मराठी साहित्याला एका नव्या क्षेत्रातील अनुभवाचा आणि अभिव्यक्तीचा परिचय घडवून दिला. तसेच तत्कालीन समाजाच्या ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक जीवनाचे यथोचित दर्शनही घडवले (१८८८). बाप्तिस्मा घेतल्यानंतरच्या चाळीस वर्षांतील अनुभवांवरचे त्यांचे अनुभवसंग्रह  हे दोन भागांतील पुस्तक प्रभावी आणि परिणामकारक ठरले (१८९५).

हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाची माहिती करून देणारे वेदधर्मी लोकांचा वृत्तांत, हिंदू सणांविषयीचे वेद, मुहूर्त ज्योतिष, हिंदी-ख्रिस्ती धर्माविषयी संवाद, हिंदू धर्माचे स्वरूप, जातिभेद विवेचन, उद्धारमार्ग आणि विज्ञान, मानवशास्त्र असे वेगवेगळे विषय घेऊन बाबांनी निबंधलेखन केले असून ते पुस्तक रूपाने प्रसिद्धही झाले आहे. कॅंडीच्या कोशाव्यतिरिक्त (१८६०), शब्दरत्नावली (१८६०), मोलस्वर्थकृत मराठी-इंग्रजी कोशाचा संक्षेप (१८६३), संस्कृत-मराठी शब्दकोश (१८९१), लूथरचा इतिहास (दु. आ. १८९१), पहिल्या तीन शतकांतील ख्रिस्ती मंडळीच्या अंतर्गत इतिहासाची कित्येक अंगे (१८९२), शाळांकरिता महाराष्ट्र देशाचा संक्षिप्त इतिहास (१८६६), स्त्रीविद्याभ्यास निबंध (१८५२), स्त्रीकंठभूषण (१८६८), वाचनपाठावली (१८८४), शिक्षापद्धती (१८८४), अर्वाचीन ग्रंथकर्त्यांच्या अडचणी, कथा, चरित्रे अशा अनेक विषयांवर बाबांनी लेखन करून मराठी साहित्यात मोलाची भर घातलेली आहे. त्यांना ‘ख्रिस्ती वाङ्मय महर्षि’ म्हणावे इतके ख्रिस्ती धर्मविषयक लेखन व भाषांतरे त्यांच्या नावावर आहेत. निबंधमाला  ह्या त्यांच्या ग्रंथास पंचवीस रुपयांचे ‘निसबिट प्राईज’ मिळाले होते (१८६०). रेव्ह. नारायण वामन टिळक यांनी त्यांना ‘ख्रिस्ती मराठी वाङ्मयाचे जनक’ तर भास्करराव उजगरे यांनी त्यांना ‘ख्रिस्ती वाङ्मयाचे भीष्माचार्य’ म्हटले आहे.

मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणून यमुनापर्यटनाचा उल्लेख करण्यात येत असला, तरी यमुनापर्यटनात कादंबरीचे व्यवच्छेदक असे विशेष घटक सापडत नसून ती कांदबरी नव्हे, असेही विचार व्यक्तविले गेले आहेत. मात्र ह्या कादंबरीतील काही कलात्मक न्यूने दाखविल्यानंतरही वास्तववादी मराठी कादंबरीच्या प्रवासातील अगदी आरंभीचा व महत्त्वाचा टप्पा म्हणून तिचा गौरव करणारे अभ्यासकही आहेत.

अत्यंत तत्त्वनिष्ठ, धर्मनिष्ठ आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या रेव्ह. बाबा पदमनजी ह्यांचे मुंबई येथे निधन झाले. ह्या ‘मराठी ख्रिस्ती वाङ्मयाच्या जनका’ची स्मृती ज्ञानोदय मासिकातर्फे त्यांच्या निधनशताब्दीला त्यांच्या कबरीवर कोनशिला बसवून मुंबईच्या शिवडीच्या कबरस्थानात जपण्यात आली आहे.

संदर्भ :

  • कऱ्हाडकर, के. सी. बाबा पदमनजी : काल व कर्तृत्व, म. रा. साहित्य-संस्कृती मंडळ, मुंबई, १९७९.