झ्विंग्ली, हुल्ड्राइख : (१ जानेवारी १४८४— ११ ऑक्टोबर १५३१ ). प्रख्यात प्रॉटेस्टंट धर्मसुधारक. स्वित्झर्लंडमधील वील्डास येथे जन्म. व्हिएन्ना येथे तत्त्वज्ञान व बर्न येथे धर्मशास्त्राचे उच्चशिक्षण संपादन करून ते एम. ए. झाले (१५०६). नंतर चर्च हे त्यांचे कार्यक्षेत्र बनले. ग्लारस येथे धर्मोपदेशक (१५०६) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. नंतर आयंझीडेल्नच्या (१५१६) वझुरिकच्या कॅथीड्रलचे मुख्य धर्मोपदेशक अशा त्यांच्या नेमणुका झाल्या. स्वतंत्र वृत्तीचे विचारवंत व एक व्यासंगी विद्वान अशी त्यांची यूरोपभर ख्याती होती.

त्यांनी बायबलचा सखोल अभ्यास केला व संत पॉल यांनी ग्रीक भाषेत लिहिलेली भाषांतरित पत्रे (Epistles) मुखोद्गत केली. आयंझीडेल्न हे ख्रिस्ती धर्माचे एक प्रसिद्ध क्षेत्र होते. तेथील गैरप्रकार पाहून झ्विंग्लींनी हे प्रकार बायबलच्या शिकवणुकीविरुद्ध असल्याचा हिरिरीने प्रचार सुरू केला. नंतर पोप महोदयांनी नेमून दिलेले शास्त्रपाठ आणि धडे यांच्या अभ्यासाऐवजी फक्त बायबलचाच अभ्यास करावा, असा प्रचार करण्यास त्यांनी सुरुवात केली.

पोप दहावे लिओ यांनी १५१८ मध्ये बर्नार्ड सॅम्सन नावाच्या एका फ्रान्सिस्कन मठवाशास झुरिकमध्ये दंडक्षालनपत्रिका (Indulgence) विकण्यासाठी रोमहून पाठविले. मिळालेल्या पैशाचा उपयोग रोममध्ये सेंट पीटर्स चर्च बांधण्याकडे करावयाचा होता. हे कृत्य ‘बुवाबाजी’ म्हणून जर्मनीत मार्टिन ल्यूथर यांनी त्याच्याविरुद्ध लढा दिला. झ्विंग्लींनीही सॅम्सनच्या कारवाईचा तीव्र निषेध केला व शेवटी सॅम्सनला रोमला रिक्तहस्ते परत जाणे भाग पाडले. हा झ्विंग्लींचा सर्वांत मोठा विजय होता. येथून पुढे स्वित्झर्लंडमधील धर्मक्रांतीची दिशा मुक्रर झाली. रोमचा त्यांच्यावर कोप झाला. कॉन्स्टन्सच्या बिशपने त्यांना धर्मोपदेश करण्याची मनाई केली; परंतु झुरिकच्या नागरिकांच्या सहकार्याने झ्विंग्लींनी आपले कार्य पुढे नेटाने चालू ठेवले.

झुरिक सरकारने झुरिक शहरात ६०० धर्मशास्त्रवेत्त्यांची सभा भरविली. त्या सभेत झ्विंग्लींनी ६७ तात्त्विक मुद्दे (Proposition) मांडले. त्यांच्यावर चर्चा न करण्याचे कॉन्स्टन्सच्या बिशपने ठरविले. सभा बरखास्त झाली; परंतु झुरिकच्या कौन्सिलने झ्विंग्ली हे पाखंडमतवादी नाहीत, असा निष्कर्ष काढून त्यांनी आपल्या नव-मतवादाप्रमाणे (New Order) ख्रिस्ती धर्मशिक्षण द्यावे, असा निकाल दिला.

झ्विंग्लींनी १५२४ मध्ये ॲनाराइन हार्ड नावाच्या एका विधवेशी विवाह केला व त्याच वर्षी ‘ट्रू अँड फॉल्स रिलिजन’ या शीर्षकाखाली एक प्रबंध लिहिला. धर्मक्रांतीचे काम जोराने चालू राहावे म्हणून मानवी भर न घातलेले मूळ बायबल (Bible Without Human Additions) हेच ख्रिस्ती विश्वासाचे एकमेव मार्गदर्शक व धर्माधिकारी (Priesthood) मानावे व पोपच्या सत्तेचा धिक्कार करावा, या मुख्य मुद्द्यांवर जर्मनीतील धर्मक्रांतिकारक आणि स्वित्झर्लंडमधील धर्मक्रांतिकारक यांच्यामध्ये झ्विंग्लींनी मतैक्य घडवून आणले. युखॅरिस्ट (प्रभु भोजनाचा विधी) हा केवळ येशू ख्रिस्ताच्या मरणाचे स्मारक, असा स्वित्झर्लंडच्या धर्मक्रांतिकारकांचा दावा; तर त्यात द्राक्षारसाचे ख्रिस्ताच्या रक्तात आणि भाकरीचे त्याच्या मांसात रूपांतर होते, असा जर्मन धर्मक्रांतिकारकांचा दावा होता. हा वाद अनिर्णित राहिला.

झुरिक प्रांत व इतर पाच कॅथलिक प्रांत यांत ११ ऑक्टोबर १५३१ रोजी लढाई झाली. झ्विंग्लींचा कापल लढाईत अंत झाला. १५४५ साली त्यांच्या लेखांचा एक संग्रह प्रसिद्ध करण्यात आला.

संदर्भ :

  • Farner, Oskar; Trans. Sear, D. G. Zwingli : The Reformer, New York, 1952.
  • Jackson, S. M. Huldreich Zwingli : The Reformer of German Switzerland 1448–1531, New York, 1901.