यकृत पर्णकृमीचा समावेश चपटकृमी संघाच्या ट्रिमॅटोडा वर्गाच्या डायजेनिया कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव फॅसिओला हेपॅटिका आहे. हा पर्णकृमी अंत:परजीवी असून त्याचे जीवनचक्र मेंढी आणि गोगलगाय या दोन पोशिंद्यामध्ये पूर्ण होते.
यकृत पर्णकृमी हा जगात आढळणाऱ्या अनेक मोठ्या पर्णकृमींपैकी एक आहे. त्याचा आकार पानासारखा असून लांबी सु. ३ सेंमी. व रुंदी सु. १ सेंमी. असते. तो मेंढीच्या यकृतात, पित्तवाहिनीत आणि पित्ताशयात असतो. शरीराच्या पुढच्या टोकाशी मुख असून मुखाभोवती मुख चूषक अथवा अग्र चूषक असते. अग्र चूषकाजवळच मागच्या बाजूला अधर पृष्ठावर अधर चूषक अथवा पश्च चूषक असते. या दोन्ही चूषकांचा उपयोग पोशिंद्याच्या पित्तवाहिनीला चिकटून राहण्यासाठी होतो. शरीरावर लहान कंटक असतात. त्यांचा वापरही चिकटून राहण्यासाठी होतो. यकृत पर्णकृमी पृष्ठ अधरीय बाजूंनी चपटा व द्विपार्श्व सममित असतो. सर्व शरीरावर बाह्य संरक्षक पटल असते. दोन्ही चूषकांमध्ये जननरंध्र असते. शरीराच्या पश्च टोकाशी उत्सर्जन रंध्र असते.
यकृत पर्णकृमीमध्ये स्वतंत्र श्वसन संस्था आणि अभिसरण संस्था नसतात. या प्राण्यात विनॉक्सिश्वसन घडून येते. पचन संस्थेत मुख, ग्रसनी, ग्रासिका आणि आतडे ही इंद्रिये असतात. आतडे द्विशाखित असून प्रत्येक शाखेपासून अनेक शाखा आणि उपशाखा निघतात व त्या सर्व शरीरभर पसरलेल्या असतात. या शाखांना ‘अंधनाल’ म्हणतात. रक्त, लसीका, पित्त आणि पित्तवाहिनीच्या भित्ती पेशी हे पर्णकृमीचे अन्न आहे. अग्र चूषकाद्वारे ते शोषून घेतले जाते. शरीरातील आंतरेंद्रियांमध्ये असणाऱ्या जागा अनिश्चित आकाराच्या मृदू ऊतींनी व्यापलेल्या असतात. या ऊती अभिसरणास मदत करतात. उत्सर्जन संस्थेत अनेक ज्योतपेशी असून त्यांच्यात सतत हालणाऱ्या पक्ष्माभिकांचे समूह असतात. ज्योतपेशींपासून उत्सर्जित पदार्थ छोट्या नालिकांमधून एका मोठ्या उत्सर्जन नलिकेकडे नेले जातात. ही नलिका उत्सर्जन छिद्राला जोडलेली असते. उत्सर्जनाबरोबरच परासरण नियमन हे ज्योतपेशींचे कार्य आहे. ज्योतपेशी अतिरिक्त पाणी पर्णकृमींच्या शरीराबाहेर टाकतात. चेतासंस्थेत चेतागुच्छिका, चेतारज्जू आणि चेतातंतू असतात. पर्णकृर्मी अंत:परजीवी असल्यामुळे त्यांना ज्ञानेंद्रिये नसतात.
यकृत पर्णकृमी उभयलिंगी आहे. नराच्या प्रजनन संस्थेत दोन वृषण, दोन शुक्रवाहिन्या, शुक्राशय, स्खलन वाहिनी, शिश्न आणि पुरस्थ ग्रंथी असतात. मादीच्या प्रजनन संस्थेत अंडाशय, अंडवाहिनी, गर्भाशय नलिका, कवच ग्रंथी (मेहलीस ग्रंथी) आणि पीतक ग्रंथी असतात. शिस्न आणि गर्भाशय नलिका जनन रंध्रांत उघडतात. प्रजनन हंगामात काही कालासाठी लाउरर नलिका अथवा योनिनलिका तयार होते. पित्तवाहिनीत दोन किंवा अधिक पर्णकृमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकांत परफलन घडते. कायटिनाचे कवच असलेली फलित अंडी मेंढीच्या पित्तवाहिनीतून पित्ताबरोबर अन्ननलिकेत जातात. तेथून ती मेंढीच्या लेंड्यांबरोबर बाहेर पडतात. या लेंड्या पाण्याच्या डबक्यात पडतात. पर्णकृमीच्या जीवनचक्रात अंडे आणि अनेक डिंभांची क्रममाला असते. पाण्यात पडलेली अंडी फुटून त्यातून पहिला डिंभ ‘मिरॅसीडियम’ बाहेर पडतो. हा डिंभ काही काळ पोहत राहतो व मध्यस्थ पोशिंदा असलेल्या लिम्निया प्रजातीतील गोगलगायीमध्ये शिरतो. गोगलगायीच्या शरीरात या डिंभाचे रूपांतरण ‘स्पोरोसिस्ट’ डिंभात होते. अलैंगिक प्रजननाने स्पोरोसिस्ट डिंभात दुसरा ‘रेडिया’ डिंभ तयार होतो. रेडिया डिंभापासून तिसरा ‘सरकॅरिया’ डिंभ तयार होतो. हा डिंभ गोगलगायीच्या शरीरातून बाहेर पडून पाण्यात शिरतो. तो काही काळ पोहत राहतो आणि शेवटी पाण्याच्या कडेला असणाऱ्या गवताच्या पात्याला चिकटतो. त्याचे रूपांतर ‘मेटासरकॅरिया’ डिंभात होते. याला अनेक भित्ती असून मेटासरकॅरिया म्हणजे एक पुटी असते. एका गवताच्या पानावर अशा अनेक पुटी असतात. मेंढी चरत असताना गवताच्या पात्याबरोबर या पुटी मेंढीच्या अन्ननलिकेत जातात. लहान आतड्यात स्रवणाऱ्या पाचक विकरांमुळे पुटीच्या भित्ती विरघळून जातात आणि नवजात पर्णकृमी तयार होतो. तो लहान आतड्यातून मेंढीच्या उदरगुहेत येतो आणि नंतर उदरगुहेतून यकृतात येतो. यकृतात यकृतपेशीतील पोषक द्रव्यावर त्याची ५-६ आठवड्यांत वाढ होऊन प्रौढ पर्णकृमी तयार होतो. यकृतातून पित्तवाहिनीत येऊन नवीन जीवनचक्र सुरू होते. पर्णकृमीमुळे मेंढीच्या यकृताचे कार्य बिघडते आणि मेंढीला ‘फॅसिओलिऑसिस’ म्हणजे ‘यकृत कूज’ हा रोग होतो. तसेच गोगलगायीच्या यकृत-स्वादुपिंड ग्रंथीचा नाश होतो. त्यामुळे मेंढ्या व गोगलगायी पर्णकृमीच्या संक्रामणाने मृत्यू पावतात. गोगलगायीप्रमाणेच काही वेळा मनुष्य, गाय, म्हैस, शेळी, ससा, कुत्रा, डुक्कर इ. प्राण्यांच्या शरीरात पर्णकृमी आढळून येतो.
माणसाच्या लहान आतड्यात आढळणाऱ्या आंत्र पर्णकृमीचे शास्त्रीय नाव फॅसिओलॉप्सिस बस्काय आहे. हा पर्णकृमी आकाराने इतर पर्णकृमींपेक्षा बराच मोठा आणि मनुष्याच्या शरीरांतील परजातींमध्ये सर्वांत मोठा असतो. तो २–७·५ सेंमी. लांब व २·५ सेंमी. रूंद इतका मोठा असू शकतो. तो मनुष्याच्या लहान आतड्याच्या वरच्या भागात आढळतो. मोठ्या प्रमाणात संक्रामण झाल्यास तो जठरात आणि लहान आतड्याच्या खालच्या भागातही आढळतो. या पर्णकृमीमुळे यकृत कूज हा पचन संस्थेचा विकार होऊ शकतो.