निर्णय पद्धती ही गणितशास्त्र आणि आधुनिक तर्कशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण पद्धती आहे. निर्णय घेण्याची पद्धती म्हणजे निर्णय पद्धती. परंतू निर्णय कशाचा ? वर्गीकरणाच्या प्रक्रियेमध्ये निर्णय पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जसे, एखादी ‘क्ष’ ही वस्तू किंवा पदार्थ अमुक एखाद्या वर्गातील आहे किंवा नाही, हे ज्या पद्धतीमुळे कळते त्याला सामान्यपणे निर्णय पद्धती असे म्हणतात.

तर्कशास्त्राच्या संदर्भात निर्णय पद्धती पुढीलप्रमाणे कार्य करते : आधुनिक तर्कशास्त्र भाषेतील विधानांच्या तसेच युक्तिवादाच्या तार्किक रचना किंवा आकाराचा अभ्यास करते. ज्या तर्कशास्त्रात सत्य (True) आणि असत्य (False) अशी दोनच सत्यातामूल्ये (Truth-values) स्वीकारलेली असतात अशा द्विमूल्यात्मक तर्कशास्त्रामध्ये विधाने एकतर सत्य किंवा असत्य असतात. यावरून संपूर्ण विधानाकारांचे सर्वतः सत्य किंवा उक्तवचनी (Tautologous), सर्वतः असत्य/व्याघाती (Contradictory) आणि नैमित्तिकतया/यादृच्छिकतया (Contingent) सत्यासत्य अशा तीन प्रकारे वर्गीकरण होते. त्याचप्रमाणे युक्तिवाद एकतर तार्किकदृष्ट्या युक्त किंवा अयुक्त असतो. अर्थात, सत्यासत्यता हा विधानांचा गुणधर्म आहे; तर युक्तायुक्तता हा युक्तिवादांचा गुणधर्म आहे. या पार्श्वभूमीवर एखादा विधानाकार सर्वतः सत्य आहे, सर्वतः असत्य म्हणजे व्याघाती आहे की नैमित्तिकतया सत्यासत्य आहे तसेच युक्तिवादाकार युक्त आहे की अयुक्त आहे अशाप्रकारचा निर्णय घेण्याची आवश्यकता तर्कशास्त्रात भासते. अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी तर्कशास्त्रामध्ये निर्णय पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणून “ज्या पद्धतीच्या साहाय्याने विधानाकारांच्या सत्यासत्यतेचा निर्णय घेऊन त्यांचे वर्गीकरण सर्वतः सत्य, सर्वतः असत्य/व्याघाती किंवा नैमित्तिकतया सत्यासत्य या प्रकारांत केले जाते, तसेच युक्तिवादांचे वर्गीकरण युक्त किंवा अयुक्त या प्रकारांत केले जाते, त्या पद्धतीला तर्कशास्त्रामध्ये ‘निर्णय पद्धती’ असे म्हणतात”.

आधुनिक तर्कशास्त्रामध्ये पुढील चार प्रकारच्या निर्णय पद्धती वापरल्या जातात : सत्यता कोष्टक पद्धती (Truth Table Method), लघु सत्यता कोष्टक पद्धती (Shorter Truth Table Method), सत्यता वृक्ष पद्धती (Truth Tree Method) आणि मानक आकार पद्धती : संधी आणि विकल्पात्मक (Normal Forms : Conjunctive and Disjunctive).

उपरोक्त निर्णय पद्धतींच्या साहाय्याने आपण तर्कशास्त्रातील निर्णय घेणार असू, तर कोणतीही निर्णय पद्धती ही परिणामकारक असणे अत्यंत आवश्यक आहे. परिणामकारक असणे म्हणजे ज्या प्रकारचा निर्णय घेण्यासाठी एखादी निर्णय पद्धती निर्माण केली जाते, त्या संदर्भातील सर्व उदाहरणांना ती निरपवादपणे आणि सहजरीत्या लागू करता आली पाहिजे. अन्यथा ती स्वीकारता येणार नाही. तेव्हा कोणतीही निर्णय पद्धती परिणामकारक आणि स्वीकारार्ह होण्यासाठी तिने काही अटी/उपाधींची पूर्तता करणे आवश्यक असते. त्या अटी/उपाधी खालीलप्रमाणे :

  • विश्वसनीयता : कोणत्याही परिणामकारक निर्णय पद्धतीची अत्यंत महत्त्वपूर्ण उपाधी/अट म्हणजे ती विश्वसनीय असली पाहिजे. निर्णय पद्धतीची विश्वसनीयता म्हणजे ज्या प्रकारचा निर्णय घेण्यासाठी ती तयार केलेली असते, त्या प्रकारचा निर्णय तिच्या साहाय्याने बिनचूक किंवा अचूकपणे घेता आला पाहिजे. एखाद्या निर्णय पद्धतीतील सूचना, व्याख्या आणि नियमांचे काटेकोर पालन करूनही जर आपल्याला अपेक्षित व अचूक निर्णय मिळत नसेल, तर ती निर्णय पद्धती विश्वसनीय आहे, असे म्हणता येणार नाही.
  • यांत्रिकता : कोणत्याही परिणामकारक निर्णय पद्धतीची दुसरी महत्त्वाची अट म्हणजे यांत्रिकता होय. निर्णय पद्धतीमध्ये सूचना, व्याख्या आणि नियमांचा निश्चित आणि सुव्याख्यित असा संच असला पाहिजे. त्यांचे यांत्रिकपणे म्हणजे तंतोतंत वा काटेकोर पालन केल्यास आपणास अचूक उत्तराप्रत/निर्णयाप्रत येता आले पाहिजे. अर्थात, अचूक निर्णयाप्रत येण्यासाठी निर्णय पद्धतीतील सूचना, तार्किक सूत्रे, नियम आणि व्याख्या यांचे काटेकोर पालन करणे एवढेच फक्त आवश्यक आणि पुरेसे असले पाहिजे. याव्यतिरिक्त आपली तर्कबुद्धी, कल्पनाशक्ती वा प्रतिभेची आवश्यकता नसते.
  • मर्यादितता : मर्यादितता म्हणजे कमी किंवा सीमित पायऱ्यांमध्ये अचूक निर्णयाप्रत येणे नव्हे, तर अचूक निर्णयाप्रत येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायऱ्यांची संख्या उदाहरणानुसार कमी किंवा अधिक असू शकेल; परंतु ती नेमकी व निश्चित असली पाहिजे.
  • टप्प्याटप्प्यांची प्रक्रिया : कोणत्याही निर्णय पद्धतीतील विहित नियम, तार्किक सूत्रे, व्याख्या आणि सूचनांच्या संचाच्या साहाय्याने आपणास पहिल्या पायरीपासून सुरुवात करून क्रमशः टप्प्याटप्प्याने शेवटच्या निर्णायक पायरीपर्यंत येता आले, तर ती निर्णय पद्धती स्वीकारार्ह असते.

थोडक्यात, उपरोक्त जी निर्णय पद्धती वरील सर्व अटी/उपाधींची पूर्तता करेल, ती निर्णय पद्धती ही परिणामकारक आणि स्वीकारार्ह असते.

https://www.youtube.com/watch?v=EaTZT9TpDzI&feature=youtu.be

संदर्भ :

  • Basantani, K. T. Elements of Formal Logic, Bombay, 1995.
  • Copy, I. M. Introduction to Logic, New York, 1953.
  • Copy, I. M. Symbolic Logic, New York, 1973.
  • Korade, Ashok; Sawant, Ankush, Elements of Logic, Mumbai, 1995.
  • जोशी, बी. आर.; कुलकर्णी, एस. व्ही.; मठवाले, इ. आर. तर्कविद्या १, परभणी, २००२.
  • देशपांडे, दि. य. सांकेतिक तर्कशास्त्र, नागपूर, १९७६.
  • बारलिंगे, सुरेंद्र; मराठे, मो. प्र. तर्करेखा, भाग १, पुणे, १९७२.

                                                                                                                                                                      समीक्षक : सुनील भोईटे