आय-छिंग : प्राचीन चिनी अभिजात साहित्यातील पाच अभिजात साहित्यकृतीत एक महत्त्वपूर्ण ग्रंथ. यालाच बुक ऑफ चेंजेस, क्लासिक ऑफ चेंजेस असंही म्हंटल जातं. आय – छिंग हा जगातील प्राचीन ग्रंथांपैकी एक ग्रंथ आहे, जो चिनी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. चिनी इतिहासावर आय – छिंगचा मोठा प्रभाव आहे. आय – छिंग मुळे जगातील धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य आणि कला या गोष्टींना प्रेरणा मिळाली आहे. इसवी सन पूर्व ६ व्या शतका दरम्यान ताम्रयुगात आणि च्यौव राजवंशाच्या काळात आय-छिंग ग्रंथाची निर्मिती झाली. आय-छिंगच्या निर्मितीबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. काही अभ्यासकांच्या मते आय-छिंगची निर्मिती इसवीसन पूर्व १० व्या ते चौथ्या शतका दरम्यान झाली आहे.
चिनी अभ्यासकांसाठी आय- छिंग हा अतिशय पवित्र ग्रंथ असून तो चिनी इतिहासातील चार महत्त्वाच्या महात्म्यांनी लिहिला आहे. महात्मा कन्फ्यूशिअस, फुशी, सम्राट वन आणि सरदार चौ या चौघांनी आय-छिंगची निर्मिती केली. आय- छिंगचे चिनी भाषेतील रूपांतर शंग छिंग हे आहे. शंग म्हणजे पवित्र आणि छिंग म्हणजे उत्कृष्ट ग्रंथ. मूळचा भविष्यासाठी दिशादर्शक म्हणून वापरल्या जाणाऱ्या या ग्रंथात युद्धरत कालखंडात म्हणजेच इसवी सन पूर्व ४७५ ते २०१ दरम्यान तत्त्वज्ञान ही संकल्पना रूढ झाली. तत्त्वज्ञानावर आधारित असलेल्या या पुस्तकात वैश्विक ज्ञानचे वर्गीकरण करण्यात आले असल्याचे मानतात. तसेच हे पुस्तक म्हणजे जीवनात आचरण कसे असावे यासाठी मार्गदर्शक आहे, राज्यकर्त्यांसाठी नियमावली आहे आणि भविष्यासाठी दिशादर्शक आहे. हा ग्रंथ म्हणजे साहित्यिक आणि कलाविषयक टीका, नकाशा तयार करण्याचं शास्त्र, औषधशास्त्र आणि इतर विज्ञानाचं सार विशद करणारा विश्वासार्ह पुरावा मानला जातो. या पुस्तकावर आधारित कन्फ्यूशिअस, ताओ , बौद्ध धर्म आणि नंतरच्या काळात ख्रिस्त धर्माने निरंतर विवेचन केले आहे. चीन आणि पूर्व आशियाई देशांमध्ये कोणतीही समस्या सोडवण्यासाठी या पुस्तकाचा आधार घेतला जातो. पाश्चिमात्य देशांमध्ये ३०० वर्षांपूर्वी आय-छिंग ग्रंथ पोचला आणि १९५० नंतर सर्वाधिक मान्यताप्राप्त पुस्तक मानले जाते. आय – छिंगचा अमर्याद उपयोग आणि भाषांतर उपलब्ध असल्याने या पुस्तकाच्या तुलनेचे दुसरे पुस्तक नाही.
आय-छिंगचा मुख्य गाभा च्यौव राजवंशाच्या काळातील बदल हा आहे, त्यामुळे या ग्रंथाला च्यौव यी किंवा चेंजेस ऑफ च्यौव असेही म्हटले जाते. हे बदल म्हणजे प्राचीन काळी रेखाटण्यात आलेल्या आकृत्या, चित्र यांचे विवेचन आहे. अगदी सुरुवातीच्या काळात या ग्रंथाची भाषा साधी आणि सुलभ होती, पण हळूहळू ती क्लिष्ट होत गेली. त्यावेळी चिनी भाषेतील चित्राक्षर किंवा कॅरेक्टर्सची संख्या कमी होती. अनेक चित्राक्षरे ही दिसायला सारखी पण त्यांचे अर्थ वेगळे होते. तर दुसरीकडे काही अक्षरे दिसायला ही वेगळी पण त्यांचे उच्चरण सारखे होते, पण त्याचा उपयोग एकमेकाशी निगडित असा होता. त्यामुळे त्या मजकुराचे अनेक प्रकारे अनुवाद करणे शक्य होते. प्राचीन चिनी भाषेत कोणत्याही विराम चिन्हांचा वापर केला जात नव्हता. वाक्य कुठे संपते त्यावरून त्याचा अर्थ लावला जात असे. त्यामुळे चिनी अभ्यासकांना पण या ग्रंथामधील चित्रलिपी पूर्णपणे समजणे अवघड आहे.
या ग्रंथाचे मूळ लेखन हे अतिशय गूढ आहे. एक पौराणिक ग्रंथ म्हणून जर या पुस्तकाचा संदर्भ घेतला तर फु शी या पुराणातील नायकाने निसर्गाच्या विविध तऱ्हा आणि अवस्थांचा अभ्यास केला. प्राणी, पक्षी, दगड धोंडे यांचे चित्र विचित्र आकार, रंग, त्यांच्यावरील खुणा, आकाशातील ढगांच्या हालचाली, ग्रह ताऱ्यांची रचना याचा अभ्यास केला आणि त्या रचना आठ आकृत्यांमध्ये चित्रित केल्या. प्रत्येक आकृतीमध्ये तीन रेघा आहेत. संपूर्ण रेघ, मधेच तुटलेली रेघ अशा रेघांचा संचय आहे त्यातून यिन आणि यांग दर्शवण्यात आले आहे. या तीन रेषांपासून तयार केलेल्या आकृत्या म्हणजे स्वर्ग, तलाव, आग, मेघगर्जना, वारा, पाणी, पर्वत आणि पृथ्वीचे प्रतीक मानल्या जातात. संपूर्ण विश्व आठ आकृत्यांमध्ये बसवून फु शी ने संस्कृती, राजाचे प्रजेप्रती कर्तव्य, विवाहसंस्था, लेखन, नौकानयन, शेती असे सगळे पैलू या आठ आकृत्यांच्या माध्यमातून तयार केले.
हा ग्रंथ व आकृत्या भविष्यातील घडामोडी सांगणारा आणि त्यावर नियंत्रण ठेवणारा आहे असे मानले जाते. चौ वंशाच्या संस्थापक सम्राट वन याने तीन रेषांच्या आकृत्यांमध्ये बदल करून त्या सहा रेषांच्या आकृत्या तयार केल्या. अशा ६४ आकृत्या तयार केल्या. प्रत्येक आकृतीला क्रमांक दिले आणि नावे पण दिली. प्रत्येक आकृतीच्या तारतम्याबाबत स्पष्टीकरण पण लिहिले. या पुस्तकाला चौ-यी संबोधलं जाऊ लागले. या पुस्तकाची निर्मिती मौखिक परंपरेतून झाली. वन सम्राटाचा पुत्र, सरदार चौ हा एक कवी होता. त्याने प्रत्येक आकृतीच्या रेषेबद्दल म्हणींच्या स्वरूपात त्याचं भाषांतर केले.
पाचशे वर्षांनी महात्मा कन्फ्यूशिअस याने प्रत्येक आकृतीविषयी नैतिक दृष्टिकोनातून विवेचन लिहिलं. यालाच १० विभाग किंवा खंड असे पण म्हणतात. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात कन्फ्यूशिअस विचारांचा उदय झाला त्यावेळी महात्मा कन्फ्यूशिअस यांनी केलेलं विवेचन आणि चौ-यी हे पुस्तक एकत्र करण्यात आलं आणि चौ-यी जे भविष्यसूचक नियमावली होती, त्याचे रूपांतर तत्त्वज्ञानात करण्यात आले.
इसवी सन पूर्व १३६ मध्ये हान वंशाच्या सम्राट वू याने कन्फ्यूशिअसची पाच कायदेविषयक पुस्तके महत्त्वपूर्ण पुस्तके म्हणून जाहीर केली. त्यामध्ये आय-छिंगचा पण समावेश होता. च्यौ-यी असे जे या पुस्तकाचे नांव होते, ते आय-छिंग असे करण्यात आले. पुस्तकाचे स्वरूप आकृत्या आणि त्यावरील विवेचन असे जे स्वरूप ते तसेच ठेवण्यात आले. खरेतर महात्मा कन्फ्यूशिअस यांनी या पुस्तकात फारसे बदल केले नाहीत असे म्हंटले जाते, पण ते म्हणाले होते कि, जर मला अजून १०० वर्षांचं आयुष्य मिळाले तर मी त्यातील ५० वर्ष या पुस्तकाच्या अभ्यासासाठी व्यतीत करेन.
आय-छिंगचा उपयोग गेली दोन हजार वर्ष जगातील अत्यावश्यक मार्गदर्शक म्हणून करण्यात आला आहे. या पुस्तकातील ६४ आकृत्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांचं विवेचन करण्यात आले आहे. पुस्तकाच्या १० खण्डामध्ये राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. राज्यकारभार कसा चालवावा, यशस्वी आयुष्य कसे जगावे याचे पण मार्गदर्शन यामध्ये करण्यात आले आहे. भविष्यामध्ये कोणती गोष्ट पवित्र आणि अपवित्र असेल हे पण विषद करण्यात आले आहे. जगात शांती कशी नांदेल याचे देखील मार्गदर्शन करण्यात आले आहे. आय – छिंग ची पाश्चिमात्य देशांत अनेक वेळा भाषांतर करण्यात आले आहे. याशिवाय जपानी, कोरियन आणि इतर भाषांमध्ये पण भाषांतर करण्यात आले आहे. आय – छिंगची इंग्रजीमध्ये अनेक भाषांतरं उपलब्ध आहेत.
संदर्भ :
समीक्षण : चंदा कानेटकर