उजिश्युइ मोनोगातारी : जपानी कामाकुरा कालखंडामध्ये १३ व्या शतकाच्या सुरूवातीला उजिश्युइ मोनोगातारी लिहिले गेले. हे पुस्तक म्हणजे एक गोष्टींचा संग्रह आहे. ह्या संग्रहामध्ये १९७ गोष्टी असून त्याचे १५ खंड आहेत. ह्या कथा संग्रहाचे नाव उजिश्युइ मोनोगातारी ठेवण्याचे कारण म्हणजे उजि प्रांताच्या प्रमुख सल्लागार मिनामोतो नो ताकाकुनिने संकलित केलेल्या उजि दाइगोन मोनोगातारी मध्ये समाविष्ट न केलेल्या कथा ह्या संग्रहात दिसून येतात. हेइआन कालखंडात लिहिले गेलेल्या कोनज्याकु मोनोगातारी प्रमाणेच जपान, भारत आणि चीन मधल्या गोष्टी ह्या संग्रहामध्ये आढळतात. याच्या लेखकाबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. अनेक वेळा ह्या गोष्टींचे पुनर्लेखन झाले आहे. उजिचा प्रमुख सल्लागार मिनामोतो नो ताकाकुनिने संकलित केलेल्या काही गोष्टींमधल्या वेचक गोष्टी ह्या संग्रहामध्ये घेतल्या असे मानले जाते आहेत.
ह्या कथांमध्ये तीव्र भावना, मनोरंजकता आणि भीती ह्या गोष्टी दिसून येतात. विषयांमध्ये पण उपदेश, विलक्षण गोष्टी आणि विनोदी चुटक्यांचा समावेश आहे. बौद्ध धर्माच्या कथांमध्ये भ्रष्ट भिक्षू, आदरणीय भिक्षू, आध्यात्मिक ज्ञान, पुढचा जन्म याबद्दल लिहिले आहे. निधर्मी कथांमध्ये मजेशीर गोष्टी, चोर आणि प्राण्यांच्या गोष्टी, प्रेम कथांचा समावेश आहे. ह्या सर्व कथांमध्ये साम्राटापासून सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्व स्तरातील पात्रे येतात. गवताच्या काडीमुळे श्रीमंत झालेल्या वाराशिबे च्योज्याची गोष्ट ह्या संग्रहामध्ये आहे. बुद्धाने सांगितल्याप्रमाणे ऐकल्यामुळे एका गरीब तरुणाचा श्रीमंत माणूस कसा झाला हे ह्या गोष्टीमध्ये लिहिले आहे. सुझुमेनो ओनगाएशिमध्ये एका चिमणीने ऋणाची परतफेड कशी केली हे सांगितले आहे. तसेच चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते आणि वाईट कर्माचे वाईट असा उपदेश पण केला आहे.
जपानी संस्कृतीमध्ये पूर्वापार ऋणाची परतफेड ही महत्त्वाची मानली गेली आहे. ही चिमणीवर जिवापाड प्रेम करणारे आजोबा आणि चिमणी यांची गोष्ट आहे. आजींना मात्र चिमणीचा राग येत असतो. एकदा चिमणी भाताची खळ खाताना बघून त्यांना राग येतो आणि त्या तिची जीभ कापतात. वेदना असह्य होऊन चिमणी जंगलात उडून जाते. आजोबा संध्याकाळी घरी येतात तेव्हा त्यांना चिमणी दिसत नाही. तिच्या शोधत ते जंगलात जातात. तिथे त्यांना त्यांची लाडकी चिमणी भेटते. तिच्या नातेवाईकांचा पाहुणचार घेऊन परत निघालेल्या आजोबांना ती चिमणी दोन पेट्या दाखवते. एक मोठी आणि एक छोटी. त्यातली कोणतीही घेऊन जावी अशी विनंती करते. आजोबा लहान पेटी उचलून घरी येतात. उघडून पाहतात तर त्यात मौल्यवान दागिने, कपडे असतात. हे बघून आजीबाईंना पण मोह होतो आणि पत्ता विचारून त्या जंगलात चिमणीकडे जातात. चिमणी त्यांचे पण स्वागत करते. परंतु आजीबाईंना फक्त पेटीमध्येच रस असतो. त्यामुळे त्या चिमणीला मोठी पेटी घेऊन यायला सांगतात. ती पेटी घेऊन घरी येताना त्यांना पेटी उघडायचा मोह होतो कारण पेटी जड असते. उघडून पाहतात तर आत दगड, किडे, भुते असतात. आजीबाईंची फजिती होते. अशाच प्रकारची लोभी माणसाची कोबुतोरी जिइसान ही गोष्ट आहे. ही जपानी परिकथांमध्ये अतिशय प्रसिद्ध गोष्ट आहे. ह्या कथा संग्रहातील बटाट्याची पेज ह्या गोष्टी वरुन प्रेरणा घेऊन प्रसिद्ध लेखक आकुतागावा र्यूनोसुकेने एक लघुकथा लिहिली आहे. उजिश्युइ मोनोगातारीचे इंग्रजी मध्ये The Tales of Uji ह्या नावाने भाषांतर झाले आहे.
संदर्भ :
समीक्षण : निस्सीम बेडेकर