पृष्ठवंशी प्राण्यांमधील एक महत्त्वाचे इंद्रिय. यकृत मनुष्याच्या शरीरातील आकारमानाने मोठी ग्रंथी असून त्याद्वारे अनेक गुंतागुंतीची कार्ये घडून येत असतात. मानवी शरीरात ते उदरगुहेच्या वर उजव्या भागात व मध्यपटलाखाली आणि जठर व आतडे यांच्यावर असते. यकृतावर आंतरांग उदरच्छदाचे आवरण असते. त्याचा रंग लालसर-करडा असून वजन पुरुषांमध्ये १.४–१.६ किग्रॅ., तर स्त्रियांमध्ये १.२–१.४ किग्रॅ. असते. त्याचे एकूण चार खंड असतात. त्यांपैकी दोन खंड मुख्य असून त्यांना उजवा खंड आणि डावा खंड म्हणतात. उजवा खंड डाव्या खंडांपेक्षा आकारमानाने मोठा असून उरलेले दोन खंड आकारमानाने लहान व ते उजव्या खंडाच्या मागे असतात. यकृताच्या खाली नासपती फळाच्या आकाराची पिशवी असते. तिला पित्ताशय म्हणतात.
यकृताचे खंड अनेक खंडिकांपासून बनलेले असतात. या खंडिका सामान्यपणे षट्कोनी असून यकृतात ५०,०००–१,००,००० खंडिका असतात. प्रत्येक खंडिकेत एक मध्यवर्ती शीर असून तिच्याभोवती यकृतपेशींपासून बनलेले गुच्छ असतात. खंडिकांच्या दरम्यान पोकळ्या असतात, त्यांना सुषिका म्हणतात. त्यांच्याद्वारे यकृत पेशींचे गुच्छ वेगवेगळे झालेले असतात. सुषिकांमुळे यकृताचा पोत स्पंजासारखा होतो आणि यकृतात अधिक रक्त साठून राहते. सुषिकांच्या भित्तिकांमध्ये खास पेशी अर्थात कुफर पेशी असतात. कुफर या वैज्ञानिकाने या पेशींची माहिती पहिल्यांदा करून दिली, म्हणून त्याचे नाव या पेशींना दिले गेले आहे. कुफर पेशी भक्ष्यपेशींसारखे कार्य करतात. प्रत्येक खंडिकेस सूक्ष्म वाहिन्या पित्तकोशिका असतात आणि त्या यकृत पेशींनी स्रवलेले पित्त वाहून नेतात. या वाहिन्या एकत्र येऊन त्यांपासून पित्तवाहिन्या तयार झालेल्या असतात. त्यांच्याद्वारे पित्त यकृताबाहेर वाहून नेले जाते. पित्तवाहिन्या यकृताबाहेर येताच एकत्र येऊन यकृतवाहिनी होते, जी पुढे जाऊन पित्ताशय वाहिनीला मिळते. पचनक्रिया चालू नसली तरी यकृत अविरतपणे पित्तनिर्मिती करत असते. अतिरिक्त पित्त पित्ताशयात साठविले जाते आणि गरज पडेल, तेव्हा वापरले जाते. यकृत आणि पित्ताशय यांतील पित्त पचनक्रियेसाठी यकृत-स्वादुपिंड सामाईक वाहिनीद्वारे लहान आतड्यात आणले जाते. यकृताचे नियंत्रण परिघीय चेतासंस्थेच्या कर्पर चेतांद्वारे आणि स्वायत्त चेतासंस्थेच्या अनुकंपी व परानुकंपी चेतांद्वारे होते.
यकृताला रक्तपुरवठा दोन रक्तवाहिन्यांद्वारे होतो; यकृत धमनी आणि यकृत प्रतिहारी शीर. यकृत धमनीपासून ऑक्सिजनयुक्त रक्त यकृतात येते. यकृत प्रतिहारी शीरेपासून येणाऱ्या रक्तात पचनमार्गात शोषली गेलेली पोषकद्रव्ये (ग्लुकोज, ॲमिनो आम्ले इ.) आणि प्लीहेपासून आलेल्या जुन्या तांबड्या पेशी व पित्तातील बिलिरुबीन यांचा समावेश असतो. यकृतातील रक्त यकृत शीरेवाटे बाहेर पडते आणि हृदयाकडे जाते.
यकृतामध्ये एखाद्या लहानशा रसायन प्रयोगशाळेप्रमाणे अनेक कार्ये अविरतपणे चालू असतात. यकृताच्या कार्यांची विभागणी सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे करता येते:
(अ) पित्तनिर्मिती : यकृतात दर चोवीस तासांत सु. ०·९५ लि. पित्त किंवा पित्तरस तयार होतो. पित्तामध्ये पाणी, पित्तरंजके (बिलीरुबीन, बिलीव्हरीडीन), पित्तक्षार (सोडियम टाउरोकोलेट, सोडियम ग्लायकोकोलेट), प्रथिने, अतिरिक्त कोलेस्टेरॉल व अकार्बनी क्षार असतात. रक्तातून येणाऱ्या तांबड्या पेशींचे अपघटन होऊन उत्पन्न होणाऱ्या ‘हीम’ या मूलकापासून पित्तरंजके तयार होतात. कोलेस्टेरॉलपासून पित्तक्षार बनतात. यकृत दर दिवशी ०·५ ग्रॅ. पित्तक्षार बनविते. पित्तक्षार आतड्यांतील मेद पदार्थांच्या शोषणासाठी तसेच मेदविद्राव्य जीवनसत्त्वांच्या शोषणासाठी गरजेची असतात.
(आ) कर्बोदकांच्या चयापचयाचे नियंत्रण : यकृत प्रतिहारी शीरेद्वारे यकृतात येणाऱ्या रक्तात ग्लुकोज व इतर एकशर्करा असतात. यकृत पेशी या सर्व पदार्थांचे शोषण करतात आणि ते पदार्थ अविद्राव्य अशा ग्लायकोजेनमध्ये साठवून ठेवतात. परिणामी यकृत महाशीरेत मिसळणाऱ्या रक्तामध्ये ग्लुकोज पातळी (प्रति १०० मिलि. रक्तात ८०–१०० मिग्रॅ.) कायम ठेवली जाते. ज्या वेळी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते, त्यावेळी ही पातळी कायम ठेवण्याकरिता यकृतात साठलेल्या ग्लायकोजेनचे विघटन चालू असते; या क्रियेला ‘ग्लायकोजेन विघटन’ म्हणतात. मेंदूमध्ये घडणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रियांची कार्यक्षमता ग्लुकोजवर अवलंबून असल्यामुळे ग्लुकोज नियंत्रण अतिशय महत्त्वाचे असते. दीर्घकालीन उपवासाच्या वेळी यकृतातील ग्लायकोजेनचा पूर्ण वापर झाल्यानंतर यकृत पेशींद्वारे ॲमिनो आम्ले व मेद पदार्थ यांच्या विघटनातून आवश्यक ऊर्जा निर्माण होते.
(इ) मेद चयापचय : यकृतात ३ —५% मेद पदार्थ असतात. यकृतात मेद चयापचयातील पुढील क्रिया घडून येतात: (१) मेदाम्लांचे विघटन बीटा-ऑक्सिडीभवनाने घडून येते. (२) मेदप्रथिनांची निर्मिती होते. (३) कोलेस्टेरॉल व फॉस्फोलिपीड यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आणि (४) न वापरलेली कर्बोदके व प्रथिने यांचे मोठ्या प्रमाणावर मेद पदार्थांत रूपांतर घडून येते.
(ई) प्रथिन चयापचय : प्रथिन चयापचयाची पुढील कार्ये यकृतात होतात: (१) ॲमिनो आम्लांचे विघटन झाल्यानंतर (विॲमीनोकरण) वेगळा झालेला ॲमिनो गट आणि इतर ॲमिनो आम्ले यांपासून यूरिया तयार होतो. त्यासाठी आवश्यक विकरे फक्त यकृत पेशींमध्येच असतात. याला क्रेब्ज-हेन्सलेट यूरिया चक्र म्हणतात. (२) आतड्याच्या मार्गात जीवाणूंद्वारे सतत अमोनिया निर्माण होत असतो आणि तो यकृत प्रतिहारी शीरेतून यकृतात येत असतो. हा अमोनिया वृक्काद्वारे गाळला जातो आणि रक्ताचा सामू कायम राखला जातो. त्यामुळे रक्तद्रवातील अमोनियाचे प्रमाण वाढत नाही. अमोनियाचे प्रमाण वाढले, तर यकृतजन्य बेशुद्धी आणि मृत्यू संभवतो. (३) यकृतात ॲल्ब्युमीन, ग्लोब्युलीन, हिपॅरीन, प्रोथ्राँबीन, फायब्रिनोजेन ही प्रथिने आणि विकरे तयार होतात. दिवसाला ५० –१०० ग्रॅ. प्रथिन निर्मितीची क्षमता यकृत पेशींमध्ये असते. प्रथिनांचे प्रमाण घटल्यास आवश्यक ती प्रथिने यकृताद्वारे तयार केली जातात. (४) चयापचयासाठी शरीरास आवश्यक असलेल्या ॲमिनो आम्लांचे आंतर-रूपांतरण यकृताद्वारे होते. काही आवश्यक ॲमिनो आम्लांची निर्मिती यकृतात होते.
(उ) रक्तपेशी निर्मिती : भ्रूणावस्थेत तिसऱ्या महिन्यापासून यकृतात रक्तपेशी निर्माण होत असतात.
(ऊ) निर्विषीकरण : शरीरात रक्तावाटे आलेल्या अनेक विषारी पदार्थांची हानिकारकता यकृताद्वारे कमी केली जाते. यांखेरीज औषधांचे विघटनदेखील यकृतात होत असते.
(ए) जीवनसत्त्वे व खनिजांचा संचय : मेदविद्राव्य अ, ड, ई व के ही जीवनसत्त्वे आतड्यात शोषली जाऊन यकृत प्रतिहारी शीरेद्वारे यकृतात येतात आणि ती रक्तातून शरीरातील पेशींना पुरविली जातात. त्यापूर्वी ती यकृतात साठविली जातात. यकृतात एक ते दोन वर्षे पुरेल एवढे अ जीवनसत्त्व साठा असते. ड व ब १२ या जीवनसत्त्वांचा साठा काही महिने पुरेल एवढा असतो. आयर्न (लोह), झिंक (जस्त), कॉपर (तांबे), मॅग्नेशियम व मँगॅनीज इ.ची खनिजे यकृतात साठविली जातात.
तसेच संप्रेरकांच्या अवनतीचेही कार्य यकृत करते. अवटू ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी व प्रजनन ग्रंथी इ. संप्रेरके स्रवतात. त्यांचे नियमन करण्यासाठी प्रमाणापेक्षा अधिक असलेली संप्रेरके यकृत रक्तातून वेगळी करते व त्यांचे निष्क्रिय पदार्थात रूपांतर करते. उदा., इस्ट्रोजेन हे संप्रेरक यकृत पेशींमध्ये ग्लुकाेरॉनिक आम्लाबरोबर संयुग्मित होऊन जलविद्राव्य निष्क्रिय पदार्थ बनून मूत्रावाटे बाहेर टाकले जाते.
यकृतात एकूण पेशींपैकी सु. २०% पेशी एककेंद्रकी पेशी व कुफर पेशी असतात. कुफर पेशी क्षीण तांबड्या पेशी व सूक्ष्मजीव यांच्या भक्षणाचे आणि प्रतिक्षमनाचे कार्य करतात. तसेच यकृत प्रतिहारी शीरेतून यकृतात आलेल्या निरनिराळ्या प्रतिजनांचे भक्षण या पेशी करतात व शरीराचे रक्षण करतात.
यकृत अनेक जीवनावश्यक कार्ये करत असल्यामुळे ते रोगग्रस्त झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. यकृताचे कार्य थांबले तर मृत्यू ओढवतो. यकृताचे अनेक रोग सुरुवातीच्या काळात वेदनारहित असतात आणि सहजासहजी लक्षात येत नाहीत. यकृताच्या अनेक रोगांमध्ये कावीळ होणे, हे मुख्य लक्षण असते. जेव्हा रक्तातील बिलीरुबीन वाढते तेव्हा कावीळ उद्भवते. वाढलेल्या बिलीरुबीनमुळे त्वचा पिवळसर दिसू लागते आणि डोळ्याची बुबुळे पिवळी दिसू लागतात. जर यकृत पेशी रक्तातील बिलीरुबीन वेगळे करू शकल्या नाहीत, तर कावीळ होते. काही वेळा, पित्तखड्यांमुळे यकृत-स्वादुपिंड सामाईक पित्तवाहिनीचा मार्ग बंद होतो. परिणामी, पित्तामध्ये बिलीरुबीन उत्सर्जित होण्याची क्रिया रोखली जाते आणि कावीळ होते.
यकृताच्या दाहाला यकृतदाह (हिपॅटिटिस) म्हणतात. विषाणू किंवा जीवविषामुळे यकृतदाह होतो आणि त्याची तीव्रता वाढल्यास मृत्यू ओढवतो. काही वेळा निरोगी यकृत पेशींच्या जागी घट्ट व कठीण ऊती तयार होतात, याला यकृत काठिण्यता (लिव्हर सिरॉसीस) म्हणतात. त्यामुळे यकृताची कार्ये करण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाऊन मृत्यू येतो. अतिमद्यपान हे यामागील मुख्य कारण असते. यकृत पेशींमध्ये मद्यातील अल्कोहॉलाचे रूपांतर ॲसिटाल्डिहाइडमध्ये होते आणि ते यकृतात साठून राहते. साठलेले ॲसिटाल्डिहाइड यकृत पेशींसाठी घातक असते. त्यामुळे यकृत काठिण्यता उद्भवते.
मनुष्याच्या इंद्रियांपैकी यकृत हे एकमेव इंद्रिय असे आहे की ज्यामध्ये हानी किंवा रोगग्रस्त झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी तयार होतात आणि यकृत पुन्हा कार्य करू शकते. यकृताच्या रोगाची तीव्रता वाढू लागल्यास डॉक्टर रुग्णाच्या यकृताचा बाधित भाग शस्त्रक्रियेने काढून टाकतात आणि एखाद्या दात्याच्या निरोगी यकृताचा भाग त्याजागी जोडतात. उदा., एखाद्या बालकाचे यकृत रोगग्रस्त झाल्यास डॉक्टर एखाद्या निरोगी प्रौढ व्यक्तीच्या यकृताचा लहान भाग काढून बालकाच्या यकृतावर प्रतिरोपण करू शकतात. प्रौढाच्या यकृताची वाढ वेगाने होऊन ते मूळच्या आकारमानाइतके वाढते, तर बालकाचे नवीन यकृत त्याच्या वयानुसार वाढते.
यक्रताबद्दल योग्य माहिती मिळाली धन्यवाद.
यकृताचे कार्य समजले आभारी आहे पण ओळयाला आजार होऊ नये म्हणून यकृताची काळजी कशी घ्यावी हे ही वाचायला आवडेल
khup chan mahiti milali dhanyavaad.