(कॅमॅलिऑन). एक सरपटणारा आणि झाडावर राहणारा प्राणी. सरडगुहिऱ्याचा समावेश सरीसृप वर्गाच्या डायॉप्सिडा उपवर्गाच्या स्क्वॅमेटा गणाच्या लॅसर्टीलिया उपगणात होतो. या उपगणात अनेक कुले असून त्यांपैकी शॅमिलिओनिडी कुलातील प्राणी सरडगुहिरा या नावाने ओळखले जातात. शॅमिलिओनिडी कुलात सु. ८० जातींचा समावेश होतो. उत्तर आफ्रिका, सिरिया, आशिया मायनर, मादागास्कर, दक्षिण स्पेन येथे सरडगुहिरा आढळतो. भारतात सामान्यपणे आढळणाऱ्या सरडगुहिऱ्याचे शास्त्रीय नाव शॅमिलिओ झेलनिकस असून, हीच जाती श्रीलंकेतही आढळते.

सरडगुहिरा (शॅमिलिओ झेलनिकस)

सरडगुहिऱ्याची लांबी सु. ४५–६० सेंमी. असते. शरीर दोन्ही बाजूंनी पसरट असून शरीराचे डोके, मान, धड व शेपूट असे भाग असतात. शरीराच्या त्वचेवर गाठी अथवा कण असतात. डोके बाजूने त्रिकोणी दिसते. डोक्यावर त्वचेच्या घड्या असतात, त्यांना शिखा म्हणतात. त्यामुळे डोके शिरस्त्राण घातल्यासारखे दिसते. कवटीची मागची हाडे मागील बाजूने जास्त उंच वाढल्यामुळे या शिखा तयार होतात. डोळे मोठे असून त्यावर एकजीव झालेल्या पापण्यांचे आच्छादन असते. पापणीच्या मध्यभागी एक छिद्र असते. दृष्टी एकनेत्री असते. हा प्राणी प्रत्येक डोळ्याने सर्व दिशांना स्वतंत्रपणे पाहू शकतो. मुखगुहेत जीभ असते. टोळ, रातकीटक, कोळी हे त्याचे अन्न आहे. एक डोळा वटारून तो भक्ष्य पाहतो, त्या वेळी दुसरा डोळा इतर वस्तू पाहात असतो. भक्ष्य दिसताच साधारणपणे एका सेकंदात तो आपली जीभ १५–१६ सेंमी. अंतरापर्यंत बाहेर फेकतो. जीभ लांब असून टोक चिकट व परिग्राही असते. जीभेने भक्ष्य पकडल्यावर जीभ मुखगुहेत परत खेचली जाते आणि जबड्यावर असलेल्या दातांच्या साहाय्याने भक्ष्याचे चर्वण करून ते गिळले जाते. आकारमानाने मोठे असलेले सरडगुहिरे पक्षीदेखील खातात.

सरडगुहिऱ्याच्या धडावर पुढच्या आणि मागच्या पायांची प्रत्येकी एक जोडी असते. प्रत्येक पायाला पाच बोटे असून त्यांना नख्या असतात. तीन बोटे वर आणि दोन बोटे खाली अशी एकमेकांपुढे येऊन चिमट्याप्रमाणे फांदीची घट्ट पकड ते घेतात. शेपटी लांब व परिग्राही असते. झाडाच्या फांद्यावर फिरताना तो पायांचा आणि शेपटीचा उपयोग करतो. शत्रू दिसल्यावर तो फिसकारतो. यासाठी तो फुप्फुसांलगत असलेल्या हवेच्या पिशव्यात हवा साठवून ठेवतो व एकदम बाहेर सोडतो.

सरडगुहिऱ्यात शरीराचा रंग बदलण्याची क्षमता असते. सरडगुहिऱ्याच्या त्वचेमध्ये एकावर एक असलेल्या दोन स्तरांद्वारे रंग आणि उष्णतानियमन या बाबी नियंत्रित होतात. या द्विस्तराच्या वरच्या स्तरात ग्वॉनिनची नॅनोस्फटिकांपासून जाळीसारखी रचना तयार झालेली असून ती रचना उद्दीपित झाली की, नॅनोस्फटिकांमधील अंतर कमीजास्त होऊ शकते. त्यानुसार विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश परावर्तित होतो अथवा शोषला जातो. जेव्हा जालिका उद्दीपित होते तेव्हा नॅनोस्फटिकांमधील अंतर वाढते आणि त्वचेतील नॅनोस्फटिकांद्वारे जास्त तरंगलांबीचे पिवळा, हिरवा, नारिंगी आणि लाल रंग परावर्तित होतात. जेव्हा त्वचा शिथिल असते तेव्हा या नॅनोस्फटिकांद्वारे कमी तरंगलांबीचे निळा व हिरवा रंग परावर्तित होतात. सरडगुहिऱ्याच्या त्वचेत पिवळ्या रंगाचीही काही रंगद्रव्ये असतात. त्वचा शिथिल असताना जेव्हा त्वचेद्वारे निळा रंग परावर्तित होतो, तेव्हा त्वचेतील पिवळ्या व निळ्या रंगांच्या संयोगातून सरडगुहिरा हिरवा दिसू लागतो. म्हणूनच बहुधा अनेक सरडगुहिरे शिथिल अवस्थेत असताना हिरवे दिसतात. हा छद्मरूपणाचा एक प्रकार आहे.

प्रजननाच्या काळात सरडगुहिऱ्याची मादी जमिनीवर येते. लहान खळगा करून २–४० अंडी घालते आणि खळगा मातीने झाकते. अंड्यातून पिले बाहेर येण्यासाठी चार-दहा महिने लागतात. तापमानाप्रमाणे हा काळ कमीजास्त होतो. सरडगुहिरे साधारणत: २ ते ७ वर्षे जगतात, मात्र काही मोठे सरडगुहिरे २५ वर्षांपर्यंत जगू शकतात.