प्रोटिस्टा सृष्टीच्या प्रोटोझोआ संघाच्या फ्लॅजेलेटा वर्गातील एक प्रजाती. या प्रजातीतील यूग्लीना व्हिरिडिस ही जाती सर्वत्र आढळते. ती गोड्या पाण्यात, मचूळ पाण्यात किंवा चिखलात दिसून येते. पुढील वर्णनात याच जातीचे वर्णन यूग्लीना प्रजातीसाठी प्रातिनिधिक म्हणून दिलेले आहे. यूग्लीना व्हिरिडिस एकपेशीय असून तिचा रंग हिरवा असतो. गोड्या पाण्याचे तलाव, जलाशय, डबके यांत ती आढळते.

यूग्लीनाची शरीररचना

यूग्लीना सूक्ष्मदर्शीय असून त्याची लांबी सु. ६० मायक्रॉन असते व रुंदी सु. २० मायक्रॉन असते (१ मायक्रॉन= १०-६  मिमी ). शरीर शंकूच्या आकाराचे असून त्याचा अग्रभाग गोल, मध्यभाग फुगीर आणि पश्चभाग टोकदार असतो. यूग्लीनाला पेशीभित्तीऐवजी तनुत्वचा असते. ही तनुत्वचा प्रथिनांपासून बनलेली असून तिच्या नागमोडी पट्ट्यांनी शरीराला वेढून टाकलेले असते. पेशीच्या अग्रभागी पेशीमुख असून त्यानंतर नळीसारखी पेशीग्रसनी असते व तिच्याखाली वाटोळा पेशीआशय असतो. मुख व ग्रसनी यांचा उपयोग अन्नग्रहणाऐवजी पेशीआशयातील पदार्थ बाहेर टाकण्यासाठी होतो. पेशीआशयाच्या तळाशी दोन कशाभिका असतात. एक कशाभिका लांब व चाबकाच्या वादीसारखी असून ती पेशीमुखातून बाहेर आलेली असते. दुसरी कशाभिका आखूड असून ती पेशीआशयात सामावलेली असते. आखूड कशाभिका लांब कशाभिकेला जोडलेली असते.

पेशीद्रव्याचे बहिर्द्रव्य आणि आंतर्द्रव्य असे दोन भाग असतात. आंतर्द्रव्यात हरितलवके, पॅरामायलॉन कण, संकोचनशील रिक्तिका, नेत्रबिंदू, केंद्रक आणि पेशीअंगके असतात. हरितलवके लांब व अनेक असून ती मध्यभागी असलेल्या प्रथिनपिंड या भागापासून निघालेली असतात. त्यात अ आणि ब ही हरितद्रव्ये व बीटा कॅरोटीन असते. सूर्यप्रकाशात हरितलवकांच्या मदतीने यूग्लीना प्रकाशसंश्लेषणाद्वारे स्वत:चे अन्न तयार करतो. या प्रक्रियेत पॅरामायलॉन ही बहुशर्करा तयार होते. ते यूग्लीनाचे राखीव अन्न असते. या दृष्टीने यूग्लीना स्वयंपोषी आहे. सूर्यप्रकाश उपलब्ध नसतो, तेव्हा पाण्यातील अन्नद्रव्य पेशीपटलाद्वारे तो शोषून घेतो. या अन्नाचे विकराद्वारे पचन होते. या दृष्टीने तो परपोषी आहे. प्रकाशसंश्लेषणात तयार झालेले अन्न म्हणजे पॅरामायलॉन कण पेशीद्रव्यात विखुरलेले असतात. ते लहान किंवा मोठे असून आकाराने खोलगट कपासारखे, दांडीसारखे असतात. यूग्लीनामध्ये पेशीआशयाजवळ एक संकोचनशील ‍रिक्तिका असते. संकोचनशील रिक्तिका पेशीतील पाण्याचे नियमन करते व उत्सर्जनाचेही कार्य करते. पेशीद्रव्यात गॉल्जी यंत्रणा, आंतरद्रव्य जालिका, तंतुकणिका, रायबोसोम्स इ. पेशीअंगके असतात. पेशीआशयाच्या एका बाजूला नेत्रबिंदू असतो. त्याचा उपयोग कशाभिकेवर असलेला उंचवटा झाकण्यासाठी पडद्याप्रमाणे होतो. हा उंचवटा प्रकाशसंवेदी असतो. पेशीद्रव्यात एक केंद्रक असते. ते गोल असून पेशीच्या पश्चभागाजवळ असते. केंद्रकात ४५ गुणसूत्रे असतात.

यूग्लीना सँग्विनिया आणि त्यांच्या मोठ्या संख्येमुळे जलाशयाला आलेला लाल रंग

यूग्लीनाची हालचाल मोठ्या कशाभिकेमार्फत होते. श्वसनासाठी वेगळे अंगक नसते. पेशीपटल आणि तनुत्वचेतून ऑक्सिजन आत घेतला जातो व कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो. प्रजनन फक्त अलैंगिक असून त्यात पेशीच्या लांबीच्या दिशेने द्विभाजन होऊन दोन यूग्लीना निर्माण होतात. प्रतिकूल परिस्थितीत शरीराभोवती पुटी तयार होते व यूग्लीनाचे बहुविभाजन होऊन अनेक यूग्लीना तयार होतात. काही वेळा त्यांची संख्या एवढी प्रचंड वाढते की डबक्यातील पाणी हिरवे दिसू लागते. यूग्लीनाची यूग्लीना सँग्विनिया ही जाती असाच परिणाम घडवून आणते. हरितलवकांबरोबर त्यात ॲस्टाझँथीन हे कॅरोटीनयुक्त लाल रंगद्रव्य असते. या यूग्लीनाच्या जातीची संख्या वाढली की, जलाशयाचा पृष्ठभाग लाल दिसू लागतो. या लाल रंगद्रव्यामुळे हरितलवकांचे प्रखर प्रकाशापासून संरक्षण होते. प्रकाशाची तीव्रता कमी झाली की, या रंगद्रव्याचे कण केंद्रकाकडे एकत्रित येतात आणि यूग्लीना हिरवे दिसू लागतात. यूग्लीनाच्या युग्लीना ग्रासिलीस या जातीचा उपयोग प्रयोगशाळेत एक नमुना जीव म्हणून केला जातो.

यूग्लीनामध्ये काही लक्षणे वनस्पतींची तर काही प्राण्यांची दिसून येत असल्यामुळे पूर्वी त्याचा समावेश वनस्पतिसृष्टीत किंवा प्राणिसृष्टीत केला जात असे. आता यूग्लीनाचा समावेश प्रोटिस्टा या स्वतंत्र सृष्टीत केला जातो. (पहा: प्रोटिस्टा सृष्टी) यूग्लीनाच्या शरीरातील हरितलवकांवर तिहेरी पटल असते, तर वनस्पतीतील हरितलवकांवर दुहेरी पटल असते. उत्क्रांतीमध्ये दृश्यकेंद्रकी पेशीतील तंतुकणिका (मायटोकाँड्रिया) हे अंगक ज्या अंतर्सहजीवनाच्या प्रक्रियेने उद्भवले आहे त्याच प्रक्रियेतून हरितलवके यूग्लीनाच्या शरीरात सामावली गेली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा