एक चिकाळ वनस्पती. रबर वृक्ष यूफोर्बिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव हेविया ब्राझीलिएन्सिस आहे. या वृक्षापासून मिळणाऱ्या चिकासारख्या पदार्थालाही रबर म्हणतात. एरंड ही वनस्पतीही यूफोर्बिएसी कुलातील आहे. रबर वृक्ष मूळचा दक्षिण अमेरिकेच्या ब्राझीलमधील ॲमेझॉन खोऱ्यातील असून त्याची लागवड भरपूर पर्जन्यमान असलेल्या उष्ण प्रदेशांत केली जाते. त्याच्यापासून मिळणाऱ्या नैसर्गिक रबराकरिता श्रीलंका, मलेशिया, थायलंड, भारत इत्यादी देशांत त्याची व्यापारी लागवड केली जाते. भारतामध्ये  केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, अंदमान व निकोबार, आसाम, मेघालय, नागालँड इ. राज्यांत रबर वृक्षांची लागवड करतात.

रबर वृक्ष (हेविया ब्राझीलिएन्सिस) : (१) वृक्षांची रांग, (२) पाने, (३) रबर वृक्षापासून भांड्यात गोळा झालेला चीक

रबर हा सदाहरित वृक्ष सु. ३० मी. पर्यंत उंच वाढतो. पूर्ण वाढलेल्या खोडाचा घेर सु. ४ मी. असू शकतो. साल जाड, गडद व तपकिरी असून त्याच्या आतील साल फिकट तपकिरी असते. सालीमध्ये चिकाच्या भरपूर वाहिन्या असतात. चीक पांढरा किंवा फिकट पिवळसर असतो. पाने लांब देठाची, संयुक्त व त्रिपर्णी असतात. पर्णिका लंबगोल व ३–५ सेंमी. लांब असतात. फुले अनेक व कक्षस्थ फुलोऱ्यात येतात. फुलोऱ्यात अतिशय लहान, अनाकर्षक हिरवट-पिवळसर व सुवासिक फुले असतात. फळे साधारणपणे आवळ्याएवढी परंतु स्पष्ट तीन भाग असलेली असतात. बिया एरंडाच्या बियांसारख्या असून त्यांपासून रोपे तयार करतात. वृक्षाची पाने वर्षातून एकदा गळतात. त्यांच्या वाढीसाठी २,०००–२,५०० मिमी. पर्जन्य, उष्ण आणि दमट हवामान लागते. रबर वृक्ष सु. २०० वर्षे जगू शकतो.

रबर वृक्षाच्या चिकापासून रबर नावाने ओळखला जाणारा कार्बनी पदार्थ मिळविला जातो. रबराच्या चिकात आयसोप्रिन या कार्बनी संयुगापासून तयार झालेले पॉलिआयसोप्रिन हे बहुवारिक मोठ्या प्रमाणात असते. रबर वृक्षाच्या सालीमधील विशिष्ट पेशींमध्ये हे संयुग तयार होते. खोडावर सर्पिल पद्धतीच्या चिरा पाडून रबराचा चीक भांड्यामध्ये गोळा करतात. रबराचा चीक स्थितिस्थापक असून जलरोधकही असतो. रबर जास्त तापमानाला मऊ पडते आणि थंड झाले की त्यातील स्थितिस्थापकत्व नाहीसे होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात रबराच्या वापरावर मर्यादा येत होती. चार्ल्‌स गुडइयर याने १८३९ मध्ये रबरात गंधक मिसळून मिश्रण तापविले असता रबर टिकाऊ बनते हे दाखवून दिले. या प्रक्रियेला व्हल्कनायझेशन म्हणतात. त्यामुळे औद्योगिक क्रांतीनंतर रबराचा वापर मोठ्या प्रमाणात विविध उद्योगांमध्ये होऊ लागला. विशेषत: वाहनांसाठी टायर व ट्यूब्ज बनविण्यासाठी रबराचा प्रचंड प्रमाणात वापर सुरू झाला. त्यासाठी रबर वृक्षांची लागवड सुरू झाली आणि ती वाढत गेली.

इ.स.१८७५ मध्ये ब्रिटिश सरकारने ब्राझीलमधून रबर वृक्षाच्या हजारो बिया इंग्लंडमधील सुप्रसिद्ध ‘क्यू बोटॅनिकल गार्डन’ मध्ये नेल्या व तेथे रोपे तयार केली. ती रोपे श्रीलंकेमध्ये पाठवून पहिल्यांदा तेथे रबर वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. २०१४ सालच्या माहितीनुसार थायलंड, इंडोनेशिया व मलेशिया हे देश रबराच्या उत्पादनात आघाडीवर असून भारत त्यांच्या खालोखाल आहे.

भारतात रबर वृक्षाची वेगळी एक जाती आढळते. ती मूळची भारतातील असून तिचे शास्त्रीय नाव फायकस इलॅस्टिका आहे. इंडिया रबर ट्री किंवा आसाम रबर ट्री असे तिला इंग्रजी नाव आहे. या वृक्षापासून हलक्या प्रतीचे रबर मिळत असून त्याची लागवड उद्यानांमध्ये केली जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा