(सी-हॉर्स). अस्थिमत्स्य वर्गातील एक मासा. सागरघोडा हा मासा जगाच्या उष्ण प्रदेशांतील उथळ समुद्रात तसेच काही समशीतोष्ण प्रदेशांच्या समुद्रात आढळतो. त्याच्या सु. ५४ जाती आहेत. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यालगत आढळणाऱ्या सागरघोड्याचे शास्त्रीय नाव हिप्पोकँपस केलॉगी आहे.

सागरघोडा (हिप्पोकँपस केलॉगी)

सागरघोड्याच्या शरीराचे डोके, धड आणि शेपूट असे तीन मुख्य भाग असतात. डोक्यापासून नळीसारखे गोल मुस्कट पुढे आलेले असून ते डोक्याशी काटकोनात असते. डोके घोड्याच्या डोक्यासारखे असून शरीर सरळ उभे असल्यामुळे त्याला घोडामासा असेही म्हणतात. त्यांची लांबी १.५ सेंमी. पासून ३५.५ सेंमी. पर्यंत असते. शरीर १०—२० अस्थिवलयांनी वेढलेले असते. मुख लहान असून त्यात दात नसतात. डोक्यामागील अंसपर, पाठीवरील पृष्ठपर आणि गुदद्वाराजवळील गुदपर आकाराने लहान असतात. तो उभा पोहतो. पृष्ठपराच्या आंदोलनांनी तो मंद गतीने पुढे सरकत राहतो. एका सेकंदाला सु. ३५ वेळा पृष्ठपर हालविला जातो. शेपटी लांब व लवचिक असते आणि ती निमुळती होत गेलेली असून ती घट्ट पकड घेणारी म्हणजे परिग्राही असते. शेपटीच्या साहाय्याने तो समुद्रातील वनस्पतींना घट्ट धरतो. त्याच्या शरीरात वाताशय असते. त्यांच्यात हवा भरून तो एका जागी स्थिर राहू शकतो.

सागरघोडा प्लवक, खेकडा, झिंगा व शेवंड यांसारख्या कवचधारी प्राण्यांना तोंडाने ओढून आत घेतो. सागरघोड्याच्या नराच्या उदरावर भ्रूणकोष्ठ असतो. प्रजननाच्या हंगामात नर व मादी एकत्र येतात. त्यांचे प्रणयाराधन अनेक दिवस चालू असते. शेपटीने एकमेकांना धरून ते पोहतात. त्यांचे हे प्रणयनृत्य साधारणपणे आठ तास चालते. नर भ्रूणकोष्ठ फुगवितो आणि भ्रूणकोष्ठाचे छिद्र उघडले जाते. फुगविलेल्या भ्रूणकोष्ठात मादी गुदपराच्या साहाय्याने १,५००—१,८०० अंडी घालते. त्याच वेळी नर भ्रूणकोष्ठात शुक्रपेशी सोडतो आणि अंड्यांचे फलन होते. भ्रूणकोष्ठात फलित अंडी ९—४५ दिवस असतात. भ्रूणकोष्ठात पोषकद्रव्ये साठविलेली असतात. नराची पीयूषिका ग्रंथी प्रोलॅक्टिन संप्रेरक स्रवते. त्यांमुळे अंड्यांची वाढ होऊन पिले तयार होतात. ४०—५० दिवसानंतर नराचा रंग बदलतो. भ्रूणकोष्ठाचे वारंवार आकुंचन होते आणि ६ सेकंदात सु. १,५०० पिले भ्रूणकोष्ठातून बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर पिले एकमेकांना धरून समूहाने वावरतात. पिलांच्या जन्मानंतर नर सागराच्या तळाशी जाऊन काही काळ विश्रांती घेतो आणि लगेचच पुन्हा प्रणयाराधन सुरू होते.

सागरघोडा आपला रंग बदलू शकतो. बदललेला रंग त्याच्या अधिवासाशी मिळताजुळता असल्यामुळे तो चटकन ओळखला जात नाही. ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या सागरघोड्याच्या एका जातीत अस्थिवलयांपासून लांब प्रवर्ध निघालेले असतात. त्यामुळे तो ज्या सागरी वनस्पतींबरोबर राहतो, त्यांच्या पानांसारखाच वाटतो. अधिवासात झालेली घट आणि शोभेसाठी ते पकडले जातात. त्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. परंतु जागतिक स्तरावर त्यांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न होत आहेत. बंदिवासात लहान जातीचे सागरघोडे साधारणपणे १ वर्ष जगतात, तर मोठ्या जातीचे सागरघोडे ३ ते ५ वर्षे जगतात.