चांद्रमास आणि चांद्रवर्ष : दिवस, महिना आणि वर्ष ही कालगणनेसाठी वापरली जाणारी एकके आहेत. ही सगळी एकके नैसर्गिक आहेत. पृथ्वीची स्वत:च्या अक्षाभोवतीची एक फेरी म्हणजे एक दिवस. याला पृथ्वीचे परिवलन (Rotation) म्हणतात. तसेच पृथ्वीची सूर्याभोवतीची एक फेरी म्हणजे परिभ्रमण (Revolution) याला एक वर्ष म्हणतात. पृथ्वीची ही सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण व्हायला सरासरी ३६५ दिवस लागतात.  कालमापनासाठी १ दिवस ते १ वर्ष याच्या मधले कालमापनाचे नैसर्गिक एकक आहे चांद्रमास (Lunar Month).

मास म्हणजेच महिना. कालमापनाचे महिना हे एकक चंद्रावर आधारित आहे. चंद्राचा पृथ्वीभोवतीचा मार्ग किंचित लंबवर्तुळाकार आहे. चंद्राने पृथ्वीभोवती ३६० अंशाची एक फेरी पूर्ण करण्यासाठी घेतलेला वेळ म्हणजे एक महिना. यालाच चांद्रमास म्हणतात. चंद्राची पृथ्वीभोवतीची एक फेरी मोजण्यासाठी वेगवेगळे नैसर्गिक आरंभ बिंदू उपलब्ध आहेत. प्रत्येक आरंभ बिंदूनुसार चांद्रमास कालावधी बदलतो.

अ) युतीकालीन चांद्रमास (Synodic Month) : चांद्रमासाचे अचूक मापन करण्यासाठी चंद्राच्या कला वापरल्या जातात. या कलांना प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावास्या अशी नावे आहेत. यांना तिथी म्हटले जाते. चंद्रबिंबाचा दिसून येणारा प्रकाशित आकार रोज बदलतो. यालाच कला म्हटले जाते. या कला नुसत्या डोळ्यानी अनुभवता येतात आणि त्यावरून तिथी ओळखता येते. चंद्राची आकाशातली जागाही रोज बदलत असते. तो रोज नव्या तारकांच्या सोबत दिसतो. या तारकांच्या मांडणीला नक्षत्र म्हणतात. म्हणजेच चंद्र रोज वेगळ्या नक्षत्रात दिसतो.

आकाशातील कोणत्याही दोन गोलांमधले पूर्व-पश्चिम अंतर शून्य झाले, की त्यांची युती (conjunction) झाली असे म्हणतात. ज्या क्षणी सूर्य-चंद्राची युती होते, त्या क्षणाला अमावास्या ही तिथी संपते. ‘अमा’ म्हणजे एकत्र आणि ‘वस’ म्हणजे राहणे.  या शब्दावरून अमावास्या हा शब्द तयार झाला आहे. अमावास्या संपते आणि शुद्ध प्रतिपदा ही तिथी सुरू होते. या युतीबिंदूपासून चंद्राचा प्रवास १२ अंश झाला, की पुढची तिथी सुरू होते. अशा २९ तिथी संपल्या, की, परत अमावास्या सुरू होते. ती अमावस्या ज्या क्षणी संपते, त्या क्षणी सूर्य-चंद्राची परत एकदा युती होते. या काळाला युतीकालीन चांद्रमास म्हणतात. कालगणनेसाठी हा युतीकालीन चांद्रमास वापरला जातो. युतीकालीन चांद्रमास सरासरी २९.५३०५९ दिवस, म्हणजेच २९ दिवस १२ तास आणि ४४ मिनिटे असतो. परंतु, कालगणना सोपी होण्यासाठी हा चांद्रमास सरासरी ३० दिवसांचा धरला जातो.

       ब) सांपातीय चांद्रमास (Tropical Month) : वैषुविकवृत्त (Celestial Equator) आणि आयनिकवृत्त (Ecliptic) म्हणजे सूर्याचा वार्षिक मार्ग, ही दोन वृत्ते एकमेकांशी २३.५ अंशाचा कोन करतात. त्यामुळे ही वृत्ते एकमेकांना २ बिंदूत छेदतात. सूर्य आयनिकवृत्तावर फिरताना ज्या बिंदूपाशी वैषुविक वृत्त ओलांडून त्याच्या उत्तरेकडे जातो त्या बिंदूला वसंत संपात (Vernal Equinox; First Point of Aries) बिंदू म्हणतात.  तर ज्या बिंदूपाशी तो आयनिक वृत्ताच्या दक्षिणेला जातो, त्या बिंदूला शरद संपात बिंदू (Autumnal Equinox) म्हणतात.

वसंत संपात बिंदूच्या पार्श्वभूमीवर चंद्राचे आगमन झाले की पुन्हा त्याच स्थानी येण्यासाठी चंद्राला जो कालावधी लागतो, तो सांपातीय चांद्रमास म्हणून ओळखला जातो. याचा कालावधी २७.३२१५८ दिवसांचा आहे.

       ) नाक्षत्रिय चांद्रमास (Sidereal Month) : विशिष्ट नक्षत्र पार्श्वभूमीवर असताना चंद्राचे मार्गक्रमण सुरू झाले, की पुन्हा तेच नक्षत्र पार्श्वभूमीवर येण्यासाठी चंद्राला जो काळ लागतो, त्याला नाक्षत्रिय चांद्रमास असे म्हणतात. याचा कालावधी २७.३२१६६२ दिवस आहे.

       ) उपभूवीय चांद्रमास : चंद्राची कक्षा लंब वर्तुळाकार असल्याने तो कधी पृथ्वीपासून किमान अंतरावर असतो. याला उपभू (Perigee) स्थिती म्हणतात. ज्या वेळी तो कमाल अंतरावर असतो त्याला अपभू (Apogee) स्थिती म्हणतात. आपल्या कक्षेत पृथ्वीभोवती भ्रमण करीत असताना एकदा चंद्र उपभू बिंदूपाशी म्हणजेच पृथ्वीपासून न्यूनतम अंतरावर आला की पुन्हा त्याच बिंदूपाशी येण्यासाठी चंद्राला जो कालावधी लागतो तो उपभूवीय चांद्रमास म्हणून ओळखला जातो. हा कालावधी २७.५५४५५० दिवस आहे.

       इ) उर्ध्वसांपातीय चांद्रमास : सोमवृत्त (चंद्राची पृथ्वीभोवती परिभ्रमण करण्याची कक्षा) आणि आयनिकवृत्त यात ५ अंश ८ मिनिटे एवढा कोन आहे. त्यामुळे हे मार्ग एकमेकांना २ बिंदूत छेदतात.  ज्या बिंदूपाशी चंद्र आयनिकवृत्ताच्या उर्ध्व दिशेला म्हणजेच उत्तरेला सरकतो, त्या बिंदूला राहू बिंदू म्हणतात. ज्या बिंदूपाशी चंद्र आयनिकवृत्ताच्या दक्षिणेला सरकतो त्या बिंदूला केतू बिंदू म्हणतात.

चंद्राने राहूपासून मार्गक्रमणेला प्रारंभ केला की पुन्हा त्याच बिंदूपाशी येण्यासाठी त्याला जो कालावधी लागतो त्याला उर्ध्वसांपातीय चांद्रमास असे नाव आहे. याचा कालावधी २७.२१२२२१ दिवस आहे. 

       चांद्रवर्ष : पृथ्वीची सूर्याभोवतीची एक फेरी सुमारे ३६५ दिवसात पूर्ण होते. या कालावधीत चंद्राच्या पृथ्वीभोवती १२ फेऱ्या पूर्ण होतात.  म्हणजेच युतीकालीन चांद्रमास १२ होतात. या कालावधीला एक चांद्रवर्ष म्हणतात.

युतीकालीन चांद्रमास सरासरी २९.५ दिवसांचा असल्याने, एक चांद्रवर्ष = २९.५ × १२ = ३५४ दिवसांचे होते.

समीक्षक : आनंद घैसास