चौधरी, मैत्रेयी : ( २९ सप्टेंबर १९५६ ). प्रसिद्ध भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि स्त्री अभ्यासक. मैत्रेयी यांचा जन्म मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे वडिल डॉक्टर, तर आई गृहिणी होत्या. त्यांच्या आईला वाचन आणि शिकण्याची प्रचंड आवड होती. त्यांचे मूळ वडिलोपार्जित गाव बांग्लादेशमधील सिल्हेट जिल्ह्यात (पूर्वीचा पश्चिम बंगाल) आहे; परंतु आजोबांच्या कामानिमित्त त्यांचे कुटुंब शिलाँग (मेघालय) येथे स्थायिक झाले. मैत्रेयी यांच्यावर त्यांच्या मोठ्या भावाचा प्रभाव होता. आई आणि मोठ्या भावामुळे त्यांच्यामध्ये वाचन, मनन आणि लेखनाची आवड निर्माण झाली. मैत्रेयी यांचे सुरुवातीपासूनचे शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले. त्यांनी सेंट मेरी कॉलेज, उत्तर-पूर्व हिल युनीव्हर्सिटी, शिलॉन्ग येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून १९७९ मध्ये पदव्युत्तर पदवी, १९८१ मध्ये एम. फिल आणि १९८७ मध्ये पी. एचडी. या पदव्या संपादन केल्या. विद्यार्थीदशेतच त्यांच्यावर डाव्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्या स्टुडन्ट फेडेरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेमध्ये सक्रीय सहभागी होत्या. त्यांचे पुरोगामी चळवळींमधील योगदान उल्लेखनीय आहे.

मैत्रेयी यांनी त्यांच्या अध्यापन कार्याची सुरुवात १९८७ पासून जीजस अँड मेरी कॉलेज, नवी दिल्ली येथून केली. या अगोदर त्या तंत्रज्ञान आणि विकास संस्था, नवी दिल्ली येथे संशोधन समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. १९९० मध्ये त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये व्याख्याता म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर तेथेच स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक (२००६ – २००८), सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल सिस्टिम्सच्या अध्यक्ष (सीएसएसएस : २०१२ – २०१४) आणि ग्लोबल स्टडीज प्रोग्रॅमच्या (जीएसपी) समन्वयक (२००४-०५; २०१८) अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली.

आधुनिक भारतातील प्रभुत्ववादी सार्वजनिक चर्चाविश्वात लिंगभावाचे प्रतिनिधित्व तसेच या प्रतिनिधित्वाचा बदलत गेलेला प्रकार आणि मजकूर या विषयीची त्यांची मांडणी अत्यंत मूलगामी आहे. याबरोबरच त्यांनी समाजशास्त्राची ओळख, सिद्धांत, स्त्रीवाद, प्रसारमाध्यमे, लोकशाही इत्यादी विषय संशोधन लेखांच्या व व्याख्यानांच्या माध्यमांतून सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांपर्यंत सुलभ पद्धतीने पोहचविले आहे.

मैत्रेयी यांच्या अध्यापनातील आवड व नाविन्यपूर्ण प्रयोग यांमुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी एक नवीन अध्याय निर्माण केला आहे. विशेषत: सामाजिकशास्त्रांतील अध्ययन–अध्यापनाच्या व्यवहाराकडे अधिक विमर्शात्मकतेने पाहण्याचा दृष्टीकोन निर्माण केला आहे. त्यांच्या लिखाणातून सामाजिकशास्त्रांची लोकशाही समाजातील नागरीक घडविण्याची भूमिका समजण्यास मदत झाली आहे. त्यांच्या अध्ययन–अध्यापनाच्या प्रक्रियेतील प्रश्नांच्या सखोल ज्ञानाचा वापर करत त्यांनी राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (नॅशनल कौंसील फॉर एज्युकेशन, रिसर्च अँड ट्रेनिंग ऑफ इंडिया – एनसीइआरटी) पाठ्यपुस्तक विकास समितीच्या सक्रीय सदस्या म्हणून काम पाहिले. त्याच बरोबर त्यांनी शालेय शिक्षण आणि समाजशास्त्राचे शालेय पाठ्यपुस्तक लेखन यांवरती विशेष भर दिला. ज्यातून त्यांनी समाजशास्त्राला शालेय स्तरापर्यंत नेले.

मैत्रेयी यांनी समाजशास्त्रीय व स्त्रीवादी सिद्धांताना दैनंदिन व्यवहारामध्ये, शिकण्या-शिकविण्याच्या प्रक्रियेमध्ये आणण्याचे काम केले. विशेषत: भारतातील समाजशास्त्र  या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी समाजशास्त्र या ज्ञानशाखेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समाजशास्त्र नेमके काय आहे ? कसे शिकले पाहिजे ? सामाजिक सिद्धांताचा अभ्यास कसा करायचा ? अशा मूलभूत प्रश्नांच्या माध्यमातून समाजशास्त्र समजून सांगितले. समाजशास्त्राला स्वतःच्या ज्ञानशाखेत मर्यादित न करता मैत्रेयी यांनी त्याला विविध ज्ञानशाखा आणि विद्यापीठांशी जोडून आंतरविद्याशाखीयता प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. तसेच सिद्धांत आणि व्यवहार यांमध्ये संवाद साधण्याचे त्यांनी काम केले. याचेच पुढचे पाऊल म्हणजे त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर ‘समाजशास्त्र शिकताना’ (डुइंग सोशलॉजी) हा ब्लॉग सुरू केला आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून वेगवेगळ्या विचारांना अवकाश मिळाले आहे. तसेच यातून त्यांनी नवी पिढी आणि तंत्रज्ञानाबरोबर राहून वेगवेगळ्या सामाजिक विचारांना व्यासपीठ मिळवून दिले आहे.

मैत्रेयी यांनी २०१५ मध्ये मॅकगिल युनिव्हर्सिटीमधील पहिल्या प्रोफेसर इंडिया चेअर या पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. २००३ मध्ये जर्मनीतील अल्बर्ट लुडविग युनिव्हर्सिटी, फ्रीबर्गमध्ये डीएएडी अभ्यागत प्राध्यापक आणि १९९५-९६ मध्ये हार्वर्ड विद्यापीठ तसेच व मॅसॅचूसेट्स युनिव्हर्सिटी, संयुक्त राज्य येथेही अभ्यागत फेलो असण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.

मैत्रेयी यांनी समाजशास्त्रीय सिद्धांत, स्त्रीवाद, माध्यमे, शिक्षण आणि अध्ययन–अध्यापन पद्धती इत्यादींवर व्यापकपणे लेखन केले आहे. त्यांच्या प्रमुख प्रकाशनांमध्ये द वुमेन्स मूव्हमेंट इन इंडिया : रिफॉरम ​​अँड रेव्हिव्हल (१९९९); द प्रॅक्टिस ऑफ सोशलॉजी (२००३); फेमिनिझम इन इंडिया (२००४ – संपा); सोशलॉजी इन इडींया : इन्टेलेक्चुअल ॲण्ड इनस्टिट्युशनल ट्रेंड्स (२०१० – संपा); रिफॅशनिंग इंडिया जेंडर, मीडिया ॲण्ड पब्लिक डिसकोर्सेस (२०१७); डुइंग थेअरी (२०१८ – सहसंपा) इत्यादींचा समावेश होतो.

सध्या मैत्रेयी या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथील सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल सिस्टम्स (सीएसएसएस) मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

संदर्भ :

  • Chaudhuri, Maitrayee, The practice of sociology, 2003.
  • Chaudhuri, Maitrayee, Sociology in India : Intellectual and institutional practices, 2010.
  • Fernandes, Leena, Routledge handbook of gender in South Asia, US, 2014.

समीक्षक : मधुरा जोशी