अटल, योगेश (Atal, Yogesh) : (१ ऑक्टोबर १९३७ – १३ एप्रिल २०१८). प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ. अटल यांचा जन्म राजस्थानमधील उदयपूर या शहरात झाला. त्यांनी उदयपूर येथे बी. ए. ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी सागर विद्यापीठात प्रवेश घेऊन प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ श्यामा चरण दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक मानवशास्त्रात विद्यावाचस्पती ही पदवी संपादन केली. सागर विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ, आग्रा विद्यापीठ आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली येथे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.

अटल यांनी भारतातील खेड्यांमध्ये होत असलेल्या परिवर्तन आणि जातीसंबंधित अभ्यासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. जातिव्यवस्थेत होत असलेल्या क्षेत्रीय परिवर्तनास त्यांनी आपल्या द चेंजींग फ्रंटीअर्स ऑफ कास्ट या ग्रंथात अधोरेखित केले. त्यांनी १९६७ च्या निवडणुकीच्या काळात भारतातील निवडणुकांच्या अभ्यासासाठी प्रथम पॅनेल तंत्राचा वापर केला. या अभ्यासाकरिता परस्पर जोडलेल्या तीन समुदायांची निवड केली. उत्तरदात्यांच्या पॅनेलांची निवड करून त्यांच्याकडून दोन वेळा निवडणुकीच्या पूर्वी व एक वेळ निवडणुकीनंतर अशी मुलाखतीची प्रक्रिया तीन वेळा पूर्ण केली. या निवडणुकीच्या अभ्यासावर त्यांनी ‘लोकल कम्युनिटीज अँड नॅशनल पॉलिटिक्स’ हा प्रबंध प्रकाशित केला. या प्रबंधास राजकीय समाजशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते. या अभ्यासात त्यांनी खेडे आणि बृहद समाज यांमधील राजकीय दुवा, तसेच ग्रामीण समुदायाच्या एकाकीपणा तुटण्याच्या स्थितीमध्ये त्यांची भूमिका शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे राष्ट्रीय एकीकरणाचा अभ्यास करण्याची दिशा मिळाली. त्यांचे राष्ट्रीय एकीकरणाच्या प्रक्रियेत विद्युतरोधक (इन्सुलेटर्स) आणि छिद्र (अपर्चर्स) या दोन संकल्पनांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

अटल हे १९७२ ते १९७४ या काळात भारतीय सामाजिकशास्त्र संशोधन परिषदेचे संचालक होते. नंतर १९७४ ते १९७७ या काळात त्यांनी युनेस्कोमध्ये सामाजिकशास्त्राचे मुख्य संचालक म्हणून कार्य केले आहे. त्यानंतर त्यांनी भारतीय शिक्षण संस्था, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून भूमिका पार पाडली. मध्यप्रदेश सामाजिकशास्त्र शोध संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्य केले. ते राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेच्या नियामक मंडळावर होते. तसेच राजस्थान सरकारने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार मितीवर त्यांनी काम केले.

अटल यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये समान क्षमतेने सामाजिकशास्त्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ज्या काळात कोणताही भारतीय समाजशास्त्रज्ञ हिंदी भाषेत लेखन करीत नव्हता, अशा वेळी अटल यांनी विविध पत्र-पत्रिकांमध्ये आपल्या लेखन आणि भाषांतराद्वारे एका नव्या परंपरेची सुरुवात केली. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर शोध प्रशासक म्हणून युवा विद्यार्थी, विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन शिक्षकांसाठी लघु कालावधीसाठी शोध-तंत्राची निर्मिती केली. हे तंत्र अभ्यासक्रमात आजही प्रासंगिक आहे. भारतीय सामाजिकशास्त्र संशोधन परिषदेच्या संचालक पदावर असतांना त्यांनी मानवशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, लोकप्रशासन आणि भूगोल या विषयांच्या विकासासाठी बृहद साहित्य सर्वेक्षणाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी सामाजिकशास्त्राच्या विकासासाठी युनेस्कोच्या पदावरून भरीव कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वात विविध देशांत सामाजिकशास्त्राच्या स्थितीबाबत अभ्यास करण्यासाठी सामाजिकशास्त्राच्या सर्वेक्षणाचे कार्य सुरू झाले. या सर्वेक्षणातून त्यांनी सोशल सायन्सेस इन एशिया या ग्रंथाच्या चार खंडाचे प्रकाशन केले. त्यांमध्ये २१ देशांच्या सामाजिक शास्त्रज्ञांची माहिती संकलित आहे.

अटल यांनी ‘कनिष्ठ स्तरावर अंतर्विवाही समूह म्हणजे जात’ अशी जातीची व्याख्या केली. त्यांनी मूलभूत वैशिष्ट्य, पर्याप्त प्रासंगिक वैशिष्ट्य आणि परिघीय (गौण) वैशिष्ट्य असे जातिव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचे वर्गीकरण करून त्याचे विश्लेषण केले. त्यांनी गैर हिंदूंतील जाती आणि अस्पृश्यता यांवर विस्ताराने लेखन केले आहे. त्यांच्या मते, जातिव्यवस्था संरचनात्मक रूपात अनेक समाजात दिसून येते. तसेच जातीचे कप्पेबंदीकरण (सोपानीकरण) करणे कोणत्याही समाजशास्त्रज्ञाला सोपे नाही. त्यांनी राजस्थान आणि मध्यप्रदेशातील खेड्यांच्या अभ्यासासाठी मॅकीम मेरीयटनी सांगितलेल्या पद्धतीचा वापर करून जातींना सोपानीकृत करण्याचा प्रयत्न केला; पण हे स्तरीकरण धार्मिक क्षेत्रापर्यंतच सीमित राहिले. जाती एककांमधील परस्पर आंतरक्रियांना समजून घेण्यासाठी जातीचा अभ्यास एका क्षेत्राच्या स्तरावर अधिक उपयोगी होतो, असे अटल यांनी मान्य केले होते. अटल यांनी सर्व कनिष्ठ जातींना ‘अस्पृश्य’ वा ‘दलित’ मानले नाहीत; कारण त्यांनी अस्पृश्यतेच्या संकल्पनेस सापेक्ष मानून अस्पृश्यतेचे अनेक प्रकार असल्याचे म्हटले.

अटल यांनी प्रभावी जाती आणि वोटबँक या संकल्पनेवर विस्ताराने लेखन केले. अपेक्षापुर्तीसाठी तयार केलेली रणनीती आणि त्यांचे प्रतिफळ यांमध्ये अंतर करण्याची आवश्यकता ते दर्शवितात. चुकीच्या आधारे जातीद्वारा निवडणूक परिणामांचे विश्लेषण करून किंवा जातींना वोटबँकची संज्ञा देवून निवडणूक परिणामांचे योग्य विश्लेषण करणे शक्य नाही. राजकीय क्षेत्रामध्ये परिघीय वैशिष्ट्यांच्या आधारे जातीची ओळख होत आहे आणि पर्याप्त प्रासंगिक व मूलभूत वैशिष्ट्यांचा बळी दिला जात आहे. जातीच्या नावावर बनविलेले क्षेत्रीय किंवा अखिल भारतीय संघटन वस्तुत: वर्णाच्या स्तरावर असल्याचे ते मानत. जातीमध्ये स्तरीकरण केवळ धार्मिकतेच्या चौकटीत नाही, तर धन आणि शक्तीच्या आधारेही होत असते. या दृष्टिकोणातून जाती वर्गीकृत होत आहेत आणि एकाच वर्गातील लोक आंतरजातीय स्तरावर नवीन आंतरक्रियांशी जोडले जात आहेत. आजच्या जातींना समजून घेण्यासाठी शास्त्रीय मीमांसा उपयोगी पडत नाही, तर समाजशास्त्रीय विश्लेषणासाठी वस्तुस्थितीचे निरपेक्ष अध्ययन करणे आवश्यक आहे.

अटल यांनी भ्रष्टाचार आणि त्याच्या समाजशास्त्रीय दृष्टिकोणावर विचार मांडले आहेत. त्यांच्या मते, सामाजिकशास्त्रात अशा साहित्याचा अभाव आहे, ज्याद्वारे भ्रष्टाचाराचा उदय आणि प्रसाराच्या प्रक्रियांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. वास्तविक पाहता भ्रष्टाचार आणि त्याचे पोषण करणारी गुंतागुंतीची प्रक्रिया सामान्यपणे समाजशास्त्रीय विचारांच्या केंद्रस्थानी राहिली नाही. म्हणून समाजशास्त्राला नव्या तंत्राचा विकास करणे आवश्यक आहे. त्यांनी सर्वेक्षण पद्धतीला भ्रष्टाचाराच्या अभ्यासासाठी उपयोगी मानले असून भ्रष्टाचाराच्या संदर्भात संशोधन करण्याकरिता सर्वांगीण दृष्टिकोणाच्या अभावाला अधोरेखित केले आहे.

अटल यांना अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्युटने आशियातील सामाजिकशास्त्राच्या वाढीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल १९९० चा ‘मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार आणि मेवाड फाऊंडेशनने ‘महाराणा मेवाड पुरस्कार’ प्रदान केला आला.

अटल यांनी आदिवासी भारत (१९६५), चेंजींग फ्रन्टिअर्स ऑफ कास्ट (१९६८), सोशियल साइन्सेस : द इंडियन सीन (१९७६), बिल्डिंग अ नेशन (१९८१), इंडियन सोशियालॉजी : फ्रॉम व्हेयर टू व्हेयर (२००३), अंडरस्टँडिंग द सोशियल स्पिअर, द व्हिलेज अँड बियांड (२००५), चेंजींग इंडियन सोसायटी (२००६), एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट (२००७), एंटरींग द ग्लोबल व्हिलेज (२००८), कोम्बॅटिंग करप्शन (२०१४), इंडियन ट्राइब्स इन ट्रांझिशन (२०१५) अशा महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखन केले आहे.

संदर्भ : गुप्ता, सुरेंद्र (संपा.), इमर्जिंग सोशियल सायन्स कंसर्न्स, नई दिल्ली, २००४.

समीक्षक : संदीप चौधरी