देसाई, नीरा (Desai, Neera) : ( १९२५ – २५ जून २००९ ). प्रसिद्ध भारतीय समाजशास्त्रज्ञ. स्वतंत्र भारतामध्ये ज्या अनेक विदुषींनी स्त्रियांचा सामाजिक-आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी समर्पण भावनेने कार्य केले, त्यांमध्ये नीरा देसाई यांचे नाव आदराने घेतले जाते. नीरा देसाई यांचा जन्म अहमदाबाद येथे मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. त्यांच्या आई अनुसया आणि वडील भद्राजी बलदेव ध्रुव हे दोघेही उदार व प्रगतशील विचारांचे होते. त्यांच्या आईंनी त्यांना बाह्य जग पाहण्यासाठी प्रोत्साहित केले, तर वडीलांनी त्यांच्या शिक्षणावर भर दिला. त्या मुंबई येथील ‘थियोसोफिस्ट फेलोशीप स्कूल’मध्ये शिकत असताना त्यांच्यावर राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव पडला. तसेच त्या अ‍ॅनी बेझंट यांच्या विचारांनीही प्रभावित झाल्या. शालेय शिक्षण घेतानाच त्यांनी मंदाकिनी (कुन्नीकल नारायण) व उषा मेहता या वर्गमैत्रिणींसोबत महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या वानर सेना संघटनेमध्ये सहभाग घेतला होता. इ. स. १९४२ मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात स्त्री सक्षमीकरणासंदर्भात कार्य करणाऱ्या अनेक स्त्रियांशी त्यांचा संपर्क आला. पुढील काळात त्या अनुभवाचा उपयोग त्यांना स्त्रीवादी अभियानात महत्त्वाचा ठरला. ‘भक्ती चळवळीतील स्त्रियांचा सहभाग’ हा त्यांच्या एम. ए. या पदवी प्रबंधाचा विषय होता. नीरा देसाई यांनी इ. स. १९४७ मध्ये समाजशास्त्रज्ञ अक्षय रमनलाल देसाई यांच्याशी विवाह केला.

नीरा देसाई यांनी स्वतंत्र भारतात लोकशाही व्यवस्थेला संस्थीकृत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. स्त्रियांसंबंधित अभ्यास करण्यासाठी त्यांनी केवळ संस्था स्थापन केल्या नाहीत, तर स्त्री अभ्यासाला विद्यापीठीय शिक्षण आणि संशोधनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनविले. नीरा देसाई यांची १९५४ मध्ये मुंबई येथील एस. एन. डी. टी. विद्यापीठामध्ये समाजशास्त्र विभागात नियुक्ती झाली. त्यांनी तेथील अनेक विद्यार्थिनी या स्त्रियांच्या हक्कांबद्दल जागरूक नाहीत हे पाहिले आणि येथूनच त्यांना स्त्री प्रश्नाचे तार्किक विश्लेषण करण्याची प्रेरणा मिळाली. देसाई या भारतातील स्त्री चळवळीच्या अनेक प्रणेत्यांपैकी एक आहेत. समाजशास्त्रीय संशोधनात्मक अभ्यासात त्यांनी भारतातील स्त्रियांच्या आर्थिक, मानवशास्त्रीय आणि ऐतिहासिक भूमिकांचे विश्लेषण केले. त्यांचा १९५७ मध्ये प्रसिद्ध झालेला वुमन इन मॉडर्न इंडिया हा ग्रंथ भारतातील स्त्रियांचा दर्जा समजून घेण्यास महत्त्वाचा मानला जातो. १९५० च्या प्रारंभी नीरा देसाई यांनी जे लिखाण केले, त्या लिखाणास १९७० नंतर स्त्री हक्कांच्या चळवळींनी पूर्णत: सत्यात उतरविले आहे.

नीरा देसाई यांनी बौद्धीक क्षेत्र आणि कृतिशील सहभागीत्व या दोन्ही बाबींना वेगळे न करता त्यांच्यात समन्वय साधून स्त्री हक्कांच्या चळवळीत योगदान दिले आहे. त्यांच्या मते, ‘एक मुलगी शिक्षणाच्या माध्यमातून आत्मसन्मान, समजूतदारपणा, निपक्षता आणि ज्ञान या मूल्यांना आत्मसात करते. एक सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी, एक नागरिक म्हणून स्वत:चे अस्तित्व ओळखते. स्त्रीशिक्षण मुलींमध्ये सामाजिक ध्येयाची ओळख करून देते. त्यासोबतच सामाजिक आणि राष्ट्रीय विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठविण्यासाठी सक्षम व योग्य बनविते. विद्यापीठांनी स्त्रियांसाठी केवळ जीवन अथवा आयुष्य सुधारण्यासाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करू नये, तर देशात स्त्रियांची अवस्था कशी आहे, याबाबतचा अभ्यासक्रमही ठेवला पाहिजे.’

स्त्रिया मागे राहिल्या, तर समाज मागे पडत जातो याची जाणीव होऊन संयुक्त राष्ट्र संघाने १९७५ मध्ये सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करून त्याचेच पुढे महिला दशकात रूपांतरण केले. त्याचे औचित्य साधून भारत सरकारने १९७२ मध्ये भारतातील स्त्रियांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नीरा देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली. या समितीने १९७४ मध्ये भारतात प्रथमच स्त्रियांच्या परिस्थितीविषयक ‘समतेकडे वाटचाल’ (टूवर्ड्स इक्वॅलिटी) या नावाने अहवाल सादर केला. या अहवालामध्ये स्त्रियांच्या सामाजिक-आर्थिक दर्जाचे विस्तृत विश्लेषण केले आहे. याच बरोबर १९८८ मध्ये भारत सरकारमार्फत प्रकाशित झालेल्या ‘श्रमशक्ती अहवाला’मध्ये नीरा देसाई यांनी मोलाचे योगदान दिले. नीरा देसाई यांनी १९७४ मध्ये भारतातील शिक्षणात एका नव्या क्रांतीचा आरंभ केला. त्यांनी एस. एन. डी. टी. विद्यापीठात स्त्रियांसंबंधीत अभ्यास करण्यासाठी संशोधन केंद्र स्थापन केले. हे संशोधन केंद्र पुढे अनेक शैक्षणिक संस्थांसाठी प्रेरणास्रोत आणि अनुकरणीय ठरले.

नीरा देसाई यांनी १९८१ मध्ये स्त्री अभ्यासकांनी भरविलेल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. विद्यापीठीय पातळीवर स्त्री अभ्यासाला एका विशिष्ट ज्ञानशाखेच्या रूपात विकसित करण्यासाठी त्यांनी स्वत: त्याचा अभ्यासक्रम, अध्ययन सामग्री, मूलभूत शोधांची माहिती आणि स्त्रीवादी अध्यापनशास्त्र (फेमिनिस्ट पेडॉगॉगी) यांबाबत विषयाची माहिती तयार केली. त्यांनी या अभ्यासाला भारतीय चेहरा दिल्याने हा अभ्यासक्रम अमेरिका व यूरोपातील प्रस्थापित अभ्यासक्रमांपेक्षा वेगळा बनला. १९८२ मध्ये स्थापन झालेल्या ‘इंडियन असोसिएशन ऑफ वुमन्स स्टडीज’च्या नीरा देसाई या संस्थापक सदस्य होत्या. ज्ञान क्षेत्रातील प्रस्थापित संस्था आणि संरचनांना एकप्रकारे सैद्धांतिक आवाहन उभे करणारी अकादमिक क्षेत्रातील चळवळ म्हणून त्यांनी स्त्री अभ्यासाचा विचार केला. त्या अनुषंगाने स्त्री अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारची संस्थिकरणाची जणू चळवळच उभी केली होती. १९८८ मध्ये त्यांनी ‘स्पॅरो’ (साऊंड अँड पिक्चर आर्काइव ऑन वुमन) या संस्थेची मुंबई येथे स्थापना केली. या अद्वितीय संस्थेचा उद्देश स्त्रियांद्वारा लिखीत, मौखिक, फोटो, फिल्म इत्यादींचे संग्रहालय बनविणे होते. त्यामुळे स्त्रियांच्या इतिहासाला समजून घेणे सहज शक्य होणार होते.

नीरा देसाई यांनी भारतातील स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या तरुण बुद्धीजीवींना आभासी ज्ञानापेक्षा वास्तविक ज्ञानावर आधारित बौद्धीक संसाधनाची निर्मिती करण्याचा सल्ला दिला. ज्याचा उपयोग समाजाच्या वास्तविक ज्ञानाचे विश्लेषण करण्यास होईल, असे त्यांचे मत होते. स्त्री अभ्यासाचा विकास स्त्रियांच्या संवेदना, प्रवृत्ती आणि दृष्टीकोनाच्या अनुरूप करण्यासाठी त्यांनी शिक्षण, प्रशिक्षण, दस्तऐवज लेखन, संशोधन आणि अभियान या महत्त्वाच्या पाच तत्त्वांना महत्त्वपूर्ण मानले.

नीरा देसाई यांनी भारतातील स्त्री चळवळीच्या प्रारंभिक व अनिश्चिततेच्या काळात तरुण संशोधनकर्ता आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नर्मदा बचाओ आंदोलन, कामगार चळवळ आणि मानवी हक्कासाठीच्या चळवळी व संघटनांशी त्या संबंधित होत्या. भारतातील ग्रामीण समाजातील स्त्रियांना नवीन ज्ञानाची ओळख व्हावी म्हणून त्यांनी क्षेत्रीय भाषांतूनही लेखन व अनुवाद केले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजराती भाषेतील स्त्री अभ्यासश्रेणी नावाने स्त्री चळवळीच्या बाबतीतील ग्रंथांची मालिका होय. २००६ मध्ये लिहिलेला फेमिनिझ्म ॲज एक्सपिरिअन्स : थॉट्स अँड नरेटिव्ह्ज हा त्यांचा शेवटच्या काळातील महत्त्वाचा ग्रंथ होय. यात त्यांनी भारतातील वैविध्यपूर्ण स्त्रीवादी आवाजांचे ऐतिहासिक दस्तऐवजीकरण केले आहे.

नीरा देसाई यांचे मुंबई येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Chadha, Gita; M. T. Joseph, Re-imagining Sociology in India : Feminist Perspectives, 2018.
  • Desai, Neera, Women in Indian society, 2001.
  • Desai, Neera; Maithreyi, Krishna Raj, Women and society in India, 1987.
  • Desai, Neera, A Decade of women’s movement in India : collection of papers presented at a seminar organized by Research Centre for Women’s Studies, Mumbai, 1988.
  • Desai, Neera, Women in modern India, Mumbai, 1957.
  • Desai, Neera, Feminism as Experience : Thoughts & Narratives, 2006.
  • Poonacha, Veena, Reclaiming Neera Desai’s sociological legacy, 2018.
  • Rege, Sharmila, Sociology of gender : The challenge of feminist sociological thought, India, 2003.

समीक्षक : अनघा तांबे